‘एका जुन्या श्लोकात भूगोलातली एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की सूर्य कुठल्या दिशेच्या अधीन राहून उगवत नाही. तो ज्या दिशेला उगवतो ती दिशा पूर्व होते. याच प्रकारे जो उच्च कोटीतला सरकारी अधिकारी असतो तो कामकाजासाठी दौऱ्यावर निघत नाही, तो जिकडे निघतो तिकडे त्याचा दौरा सुरू होत असतो.’
‘जर आम्ही खूश राहिलो तर गरिबी आम्हाला दु:खी करू शकत नाही आणि गरिबी हटवण्याची खरी योजनाच अशी आहे की आम्ही बरोबर खूश राहिलं पाहिजे.’
अशी वाक्यं ‘राग दरबारी’च्या पानोपानी आढळतात. धारदार उपहासाच्या शैलीत संपूर्ण कादंबरी ही गोष्ट सोपी नाही. एखाद्या साहित्यकृतीत आपल्याला असा उपहास क्वचित प्रसंगात आढळतो पण संपूर्ण कादंबरीच या अंगाने पुढे जाते हे अक्षरश: अफाट आहे. या कादंबरीला रूढ असं कथानकही नाही. त्यामुळे वाचक ती कुठूनही वाचू शकतो. ती घडते ना धड शहर ना धड खेडं असलेल्या शिवपालगंज या गावात. त्या अर्थाने हे गाव रम्य नाही आणि लेखकाचा दृष्टिकोनही भाबडा नाही. हे गाव देशाच्या नकाशात शोधूनही सापडणार नाही पण वास्तवात शोधायचं झालं तर ते तुमच्या आजूबाजूलाही असू शकतं. २०१८ यावर्षी ‘राग दरबारी’ला ५० वर्षे पूर्ण झाली होती. तेव्हा या कादंबरीवर अनेक ठिकाणी चर्चा घडल्या. माध्यमांवर वेगवेगळ्या पद्धतीने ही पन्नाशी अधोरेखित करण्यात आली. श्रीलाल शुक्ल यांनी १९६२ ते १९६७ या वर्षात ही कादंबरी लिहिली. कादंबरीची काही प्रकरणं त्यांनी सात- सात वेळा लिहिलेली आहेत पण या कादंबरीचं बलस्थान आहे ती भाषा. खडी बोली, अवधी, भोजपुरी मिश्रित हिंदी अशी भाषेची रूपे या कादंबरीत दिसून येतात. कुठेही शब्दांचे फुलोरे नाहीत. कृत्रिम नटवेपण नाही, प्रतिमा- प्रतिकांचा सोस नाही. जे सांगायचंय ते अगदी थेट, कसलाही आडपडदा न ठेवता. कादंबरीत पात्रांची बजबजपुरी नाही. वैद्याजी, रुपन बाबू, बद्री पहेलवान, रंगनाथ, छोटे पहेलवान अशी काही ठळक नजरेत भरणारी पात्रे. अर्थात कादंबरीत स्त्री व्यक्तिरेखा मात्र नाहीत. क्वचित अपवादात्मक एखादं पात्र आलं आहे आणि काही समीक्षकांनी यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलेलं आहे.
श्रीलाल शुक्ल यांच्या अन्यही कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. ‘सीमाएँ टूटती है’ ही त्यांची कादंबरी एका गुन्हेगारी कथेचा उलगडा करते. दुर्गादास नावाच्या व्यक्तीला एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेप झालेली आहे. येथून ही कादंबरी सुरू होते. हत्या तर घडलेली आहे पण पुढे मानवी संबंधांचाच कसा खून होतो आणि या प्रयत्नात हे मानवी संबंध कसे पणाला लागतात त्याचे दर्शन या कादंबरीत घडते. या परिमाणामुळे ही कादंबरी केवळ गुन्हेगारी कथा न राहता सहजपणे मानवी जीवनातल्याच खोल डोहात वाचकाला घेऊन जाते. त्यांची आणखी एक कादंबरी आहे ‘मकान’. प्रत्येक माणसाला स्वत:चं घर हवं असतं. कोमल प्रवृत्तीच्या कलाकाराला केवळ घरच नव्हे तर त्याच्या मनाला निवाराही हवा असतो. नारायण बॅनर्जी एक सितारवादक आहेत आणि उदरनिर्वाहासाठी ते जुन्याच शहरात परत आले आहेत. नगरपालिकेत नोकरी आहे, पण राहण्यासाठी सरकारी निवासातील सोय झालेली नाही. घरासाठी वणवणत आश्रय शोधणारे नारायण आपली जुनी शिष्या श्यामा आणि नवी शिष्या सिम्मी या दोघींमध्ये मानसिक निवारा शोधण्याचा प्रयत्न करतात. यातली श्यामा मरते तर सिम्मीपर्यंत पोहोचण्याचा नारायण यांचा प्रयत्न अधुराच राहतो. मध्येच एका हिंसक कृत्यात त्यांचा बळी जातो. संपूर्ण कादंबरीला संगीताची पार्श्वभूमी आहे. अशा अगदीच काही वेगळ्या कादंबऱ्याही श्रीलाल शुक्ल यांनी लिहिल्या पण ते मुख्यत्वे परिचित आहेत ते ‘राग दरबारी’मुळे. या कादंबरीचे भारतीय भाषांसह परदेशी भाषेतही अनुवाद झाले आहेत.
‘राग दरबारी’ आजही टवटवीत वाटते. गावातलं सडत चाललेलं राजकारण, निवडणुकीतले जातीपातींचे डावपेच, कळाहीन शिक्षणक्षेत्राचं मूर्तिमंत उदाहरण असणारं ‘छंगामल विद्यालय इंटरमीडिएट कॉलेज’, गावाला सुधारण्यासाठी शहरातून येऊन भाषणं देत आपलं कर्तव्य पार पाडणारी माणसं, पदोपदी जाणवणारी ढोंगबाजी, तिचा धारदार शैलीत केला जाणारा दंभस्फोट, प्रगतीच्या, विकासाच्या नावाखाली आखल्या गेलेल्या योजना आणि या योजनांना आलेली विकृत फळं, प्रचंड बोकाळलेल्या स्वार्थाने पछाडलेली मोक्याच्या ठिकाणावरची माणसं, त्यांना जराही न वाटणारी नीतिमूल्यांची चाड असं काय काय आपल्याला या कादंबरीत दिसत राहतं. केवळ एक ‘व्यंग्य कथा’ एवढंच या कादंबरीचं स्वरूप नाही. एका मूल्यहीन दलदलीचं शब्दाशब्दांत ठासून भरलेलं सटीक वर्णन ही कादंबरी वाचकाला घडवते. म्हणूनच ती ‘कालजयी’ मानली जाते. आजही या कादंबरीच्या किमान पाच हजार प्रति दरवर्षी विकल्या जातात. कादंबरी प्रसिद्ध झाल्यापासून आजवरच्या खपाचा आकडा काही लाखात असेल.
सनदी अधिकारी म्हणून काम केलेल्या श्रीलाल शुक्ल यांना आपल्या अनुभवांचा, सेवाकाळात भेटलेल्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचा नक्कीच या कादंबरीसाठी उपयोग झाला असणार. परिस्थिती गरिबीची होती पण घरात साहित्यिक वातावरण होतं. वडील संस्कृतचे पंडित होते. शालेय वयातच त्यांनी भरपूर वाचन केलं होतं. ‘सुनी घाटी का सुरज’ ही त्यांची पहिली कादंबरी. समाजजीवनातील विसंगती, आंतर्विरोध आणि ते अचूक हेरणारी नजर ही त्यांची वैशिष्ट्ये. ‘राग दरबारी’ दृश्य माध्यमातूनही आली पण तिची खरी गंमत आहे तिच्या अफाट भाषिक कौशल्यात. आपल्या सर्वच व्यवस्थांना असलेला मुखवटा उतरविण्याचे काम या कादंबरीने केले. लोकशाहीच्या नावाखाली जे जे चाललेले आहे, त्याचे तळपातळीवर कोणते परिणाम दिसून येतात याचे अत्यंत प्रभावी अर्कचित्र ‘राग दरबारी’त दिसते. व्यवस्थेतल्या माणसांमध्ये आलेले निर्ढावलेपण, बेमुर्वतखोरपणा आणि अशा स्थितीत अधिकच हास्यास्पद ठरवला जाणारा सामान्य माणूस हा या कादंबरीचा विशेष आहे. ३५० पानांच्या या कादंबरीची सर्वात जमेची बाजू म्हणजे ती कमालीची वाचनीय आहे. एका अर्थाने हा भारतातल्या गाव खेड्यांचा ‘एक्स-रे’ आहे. गावपातळीवर आधुनिकतेच्या काही खाणाखुणा दिसतात पण मानसिकता सगळी मध्ययुगीन आहे हेच ही कादंबरी प्रकर्षाने ठसवते.
या कादंबरीतला हा एक प्रसंग…तर एक दिवस असेच एक ‘महापुरुष’ दुपारी चार वाजता भरधाव वेगानं वाहनाद्वारे एका गावाच्या दिशेने धावू लागतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर त्यांची नजर जाते आणि ते स्वत:लाच मनोमन धन्यवाद देतात. मागच्या वर्षी त्यांनी गावात केलेल्या एका भाषणामुळे यावर्षी रब्बी हंगामातलं पीक जोमदार येणार असं त्यांना वाटू लागलंय. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच शेतकरी शेती करू लागले होते. शेती कसावी लागते आणि खताबरोबरच बियाणंही मातीत टाकावं लागतं हेही शेतकऱ्यांना त्यांच्यामुळेच आता कळू लागलंय. महाविद्यालयासमोरून भरधाव वेगात गाडी फर्लांगभर पुढे जाते तेव्हा या ‘महापुरुषा’च्या असं लक्षात येतं की त्यांनी गेल्या ४८ तासांत तरुणांसाठी एकही व्याख्यान दिलं नाही. मग त्यांनी स्वत:चाच मनोमन धिक्कार केला. या देशात जन्माला येऊन एवढा वेळ आपण तोंड कसं बंद ठेवलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. गाडी वळवून ते कॉलेजमध्ये आले. तोवर कॉलेज सुटलेलं होतं. तरीही उरल्यासुरल्यांसमोर ‘महापुरुषा’ने भाषण ठोकलंच. मुलांना उपदेशाच्या काही गोष्टी सांगितल्या, ज्या मुलंही त्यांना सांगू शकली असती. शेवटी समन्वय, एकता, राष्ट्रभाषेवरचे प्रेम या सगळ्या गोष्टींवर बोलून हे ‘महापुरुष’ रवाना झाले. त्यानंतर गुरुजी आणि मुलं ‘भाईयों और बहनों’ अशी नक्कल करत आपापल्या घरी निघून गेली. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी मग मागे केवळ कॉलेजमध्ये बागकाम करणारे, सेवक, मजूर एवढेच उरले. (पृष्ठ. १६१)… तर अशी ही श्रीलाल शुक्ल यांची शैली… आणि कुठल्याही काळाला लागू पडणारं हे आशयद्रव्य. कादंबरी प्रसिद्ध झाली त्याला ५६ वर्षे उलटून गेली. आणखी एक औचित्य म्हणजे हे वर्ष श्रीलाल शुक्ल यांच्या जन्मशताब्दीचं आहे !