‘अ र्सिजट नॉर्थईस्ट : नॅरेटिव्ह्ज ऑफ चेंज’ या पुस्तकाचे लेखक आशीष कुंद्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीतून ‘अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश केडर’मध्ये दाखल होऊन, पहिल्यांदा मिझोरममध्ये निघाले. तेथून गोवा, दमण आदी बदल्यांनंतर बऱ्याच वर्षांनी, २०१६ मध्ये त्यांची बदली पुन्हा अरुणाचल प्रदेशात झाली. सध्या दिल्ली परिवहन आयुक्त असलेल्या कुंद्रा यांनी एकंदर आठ वर्षे ईशान्येकडील दोन राज्यांत काढली. त्या अनुभवांना अभ्यासाची जोड देऊन कुंद्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
विसाव्या शतकाची अखेरची पाच वर्षे ही त्या प्रदेशात केवळ इंटरनेट नसलेलीच नव्हे, तर बरीच अभावग्रस्त होती आणि मिझो शांतता कराराला तोवर दहा वर्षे पूर्ण झाली असूनही ‘बाहेरच्यां’कडे संशयाने पाहण्याची या राज्यातील रहिवाशांची सवय सरली नव्हती. अशा काळात अन्य राज्यांचीही स्थिती काय होती, याचे वर्णन पहिल्या काही प्रकरणांत आहे. त्या मिषाने पं. नेहरूंपासूनच्या ईशान्यविषयक धोरणांचा धावता आढावाही येतो. पण पुस्तकाचा भर आहे तो आज ईशान्य भारत कशी प्रगती करतो आहे, इथले लोक कसे आत्मविश्वासाने व्यवसायांत उतरत आहेत, त्यांना इंटरनेटची कशी साथ मिळते आहे आणि सरकारी धोरणेही कशी लोकाभिमुख आहेत, हे सांगण्यावर. बदल घडला हो घडला, हे या पुस्तकाचे ‘नॅरेटिव्ह’ आहे. हे आशादायी चित्र रंगवताना लेखक अनेक उदाहरणे देतो, पण सामाजिक बदलांच्या या कथा सांगताना कुणाच्या व्यक्तिचित्रांवर हे पुस्तक रेंगाळत नाही. याला तुटकपणापेक्षा तटस्थपणा म्हणावे लागेल, हे लेखकाची येथील महिलांच्या स्थितीबद्दलची निरीक्षणे वाचताना लक्षात यावे. मेघालयसारख्या राज्यातून अस्तंगत होणारी स्त्रीप्रधान कुटुंबपद्धती, ‘नागा मदर्स’ना प्रतिष्ठा असूनही नागालँडच्या स्थानिक राजकारणात त्यांचे दुय्यम स्थान, असे वास्तव लेखकाने टिपले आहे.
ईशान्य भारत आज ‘नवा’ आहे, असे सांगणाऱ्या या पुस्तकात जाता जाता, अस्मितावादाच्या आव्हानाचा उल्लेख आढळतो. ‘यंग मिझो असोसिएशन’सारख्या संघटना या नागरी संघटनाच, पण त्यांचा नको इतका पगडा सामाजिक-राजकीय जीवनावर असल्याचे लेखक सूचित करतो. अशा निसटत्या उल्लेखांमुळे कदाचित हे आशादायी चित्र शब्दांतून साकार होत असतानाही, मणिपूर हिंसाचारासारखे ओरखडे का दिसताहेत याची काहीएक कल्पना येऊ शकते. ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केलेल्या या २३६ पानी पुस्तकाची किंमत आहे ३९९ रुपये.