दिल्लीवाला

संसदेपासून फिरोजशहा रोड फार लांब नाही, या रस्त्यावर दिल्लीची निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचंड राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. दिल्लीचं मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल फिरोजशहा रोडवर राहायला आलेले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीचे दिवस आहेत, आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून जुंपलेली असते. मग, भाजपचे नेते-कार्यकर्ते थेट फिरोजशहा रोड गाठतात आणि केजरीवालांच्या घराबाहेर निदर्शनं करतात. ८ फेब्रुवारीला निकाल लागेपर्यंत बहुधा हा रोड राजकारणाचा अड्डा बनणार असं दिसतंय. मोर्चेबाजी आणि केजरीवाल यांच्यामुळं या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्तही वाढलेला आहे. खरंतर फिरोजशहा रोड सुरू होतो त्या मंडी हाऊस भाग दिल्लीचं मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र आहे. पण, आता ते राजकीय केंद्र बनलंय. फिरोजशहा रोडच्या मागच्या बाजूला असलेल्या पं. रविशंकर शुक्ल मार्गावरील बंगल्यामध्ये ‘आप’चं मुख्य कार्यालयही आहे. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांना या मार्गावर नवं कार्यालय दिलं गेलं. इथं आधी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय होतं. तेव्हा या कार्यालयात फारशी हालचाल नसायची, हे कार्यालय सुशेगात असायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत आले तरी या कार्यालयात फार कमी वेळा येत असत. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी मात्र गर्दी होत असे. शरद पवारांचं राजीनामानाट्य झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय बैठक दिल्लीतल्या याच कार्यालयात झाली होती. या संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवार काळा गॉगल घालून बसले होते. बैठक संपल्यावर तातडीने निघूनही गेले होते. मग, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गेला. त्यामुळं दोन्ही गटांना हे कार्यालय सोडावं लागलं. अजित पवारांचं कार्यालय आता नॉर्थ अॅव्हेन्यूमध्ये आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय खान मार्केटच्या आसपास असलेल्या लोधी इस्टेटमध्ये स्थलांतरित झालेलं आहे. शुक्ला मार्गावरील या बंगल्यामध्ये आप नावाचा नवा ‘भाडेकरू’ आलेला आहे. आप हा दिल्लीचा पक्ष असल्यामुळे आणि निवडणुकीचे दिवस असल्यामुळे हा बंगला ओथंबून वाहू लागलेला आहे. एकेक खोली विधि विभाग, माध्यम विभाग, संशोधन विभाग, समाजमाध्यम विभाग अशा विभागांतील लोकांनी भरून गेलेली असते. नेते-कार्यकर्त्यांची रेलचेल आहेच, शिवाय दररोज वेगवेगळे कार्यक्रम, पत्रकार परिषदा, बैठका होत असल्यामुळे राबता आणखी वाढत जाईल. बंगल्यानं पक्षांतर केलं आणि त्याचे दिवस पालटून गेलेत…

हेही वाचा >>> बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…

पुन्हा फॉर्मात…

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार जाता जाता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेले दिसले. राजीवकुमार पुढील महिन्यामध्ये निवृत्त होणार आहेत, त्याआधी त्यांनी अखेरची पत्रकार परिषद घेतली असं म्हणता येईल. दिल्लीची विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना त्यांनी तुफान बॅटिंग केली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची फटकेबाजी कमी झालेले दिसली. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखा घोषित करताना उशीर केला होता, जेमतेम मुदतीत महाराष्ट्रात निवडणुकीचा निकाल लागला होता. दोन-दोन फुटलेले पक्ष, त्यांचा निवडणूक चिन्हावरून होत असलेला संघर्ष अशा सगळ्या कारणांमुळे राजीवकुमारांनी तारखांची घोषणा करून पत्रकार परिषद संपवलेली होती. नाही तर ते भरपूर वेळ देतात, शेरोशायरी करतात, विरोधकांना शेर सांगून प्रत्युत्तर देतात. या वेळी मात्र ते खुशीत दिसले. तसंही शेवटी ती निवडणुकीसाठीची पत्रकार परिषद होती. त्यांनी शेरोशायरी करून साजरी केली. अलीकडच्या दहा वर्षांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना दबाव खूप असतो. त्यामुळे शेरोशायरी करून निवडणूक आयुक्त तणावमुक्त होण्याचा प्रयत्न करत असावेत. राजीवकुमार निवृत्त झाल्यावर चिंतन-मनन करण्यासाठी हिमालयात निघून जाणार आहेत. अर्थात कायमचे नव्हे, काही काळ ध्यानधारणा करून पुन्हा संसारी जगात परत येणार आहेत. शिक्षकी पेशात शिरण्याचा त्यांचा मनोदय आहे, मुलांना शिकवणं, नव्या पिढीशी जोडून घेणं असं नवं काही करण्याचा त्यांचा बेत असावा. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील नगरपालिकेच्या शाळेत ते शिकले होते. त्यामुळे होतकरू मुलांना मदत करण्याची त्यांची इच्छा कुठून आली असावी हे समजू शकतं. अलीकडच्या काळात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त वादग्रस्त ठरले, राजीवकुमारही त्याला अपवाद ठरले नाहीत. लोकसभा असो वा विधानसभा निवडणुका विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंचे पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रारी घेऊन धावतात. दिल्ली विधानसभा निवडणूक घोषित होईपर्यंत भाजप आणि आप निवडणूक आयोगाकडे तक्रारी घेऊन गेले होते. दिल्लीतील निवडणूक विनाविघ्न पार पाडली की राजीवकुमारांच्या डोक्यावरील ओझं उतरेल हे नक्की!

मंत्र्यांचा उपक्रम…

राज्या-राज्यांची खासियत असणारे पदार्थ खाण्याची संधी दिल्लीतील पत्रकारांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढाकार घेतलेला आहे. पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितलं आहे की, केंद्राच्या वेगवेगळ्या योजना, निर्णय, धोरणं यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवताना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा संदेशही पोहोचवला पाहिजे, त्यासाठी विशेष प्रयत्न करा. त्याअंतर्गत राज्या-राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वादही लोकांना घेता आला पाहिजे. वैष्णव यांनी मंत्रालयाच्या स्तरावर हा प्रयत्न सुरू केला आहे. दर आठवड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर वैष्णव पत्रकारांना राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये पत्रकार परिषदेत सरकारी निर्णयांची सविस्तर माहिती देतात. गेल्या आठवड्यामध्ये वैष्णव म्हणाले की, मला तुम्हाला माहिती द्यायची आहे पण, हा काही सरकारी निर्णयाचा भाग नव्हे. तरीही मी सांगतो… मग, त्यांनी, या आठवड्यामध्ये बिहारच्या ‘लिट्टी-चोखा’ची चव चाखा असं म्हणत पत्रकार परिषद संपवली. त्यामुळे आता कदाचित दर आठवड्याला वेगवेगळ्या राज्यातील चवदार पदार्थ खाण्याची संधी मिळू शकेल असं दिसतंय. मंत्र्यांकडून असा उपक्रम राबवला जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल? हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी जिलेबी निर्यातीवर भाष्य केलं होतं. तर हरियाणा जिंकल्यावर वैष्णव यांनी जिलेबी वाटून भाजपचं यश साजरं केलं होतं.

अंतराळातील गप्पा

विज्ञान-तंत्रज्ञानभूविज्ञान, अणुऊर्जा अशा महत्त्वाच्या मंत्रालयांचा स्वतंत्र कारभार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे आहे. पंतप्रधान मोदींचं या खात्यांकडे विशेष लक्ष आहे. शिवाय, नजीकच्या काळात या सर्व खात्यांकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाताळले जाणार आहेत. नुकतीच स्पेस डॉकिंग मोहीम यशस्वीरीत्यापूर्ण केली गेली. गगनयान मोहिमेसाठी व्योममित्र रोबो तयार केला आहे, त्याची अंतराळयात्रा ???हील. पुढच्या वर्षी मानवयुक्त गगनयान मोहीम असेल. २०३५ मध्ये भारत अंतराळ केंद्र उभे करेल. २०४५ मध्ये भारताचे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. या सगळ्या लक्षवेधी योजना आहेत. जितेंद्र सिंह यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या सरकारी निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. दरवर्षी ते पत्रकारांशी असा संवाद साधत असतात. त्यांचं म्हणणं होतं की, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचा वेगाने विस्तार केला जातोय, त्यामध्ये केंद्र सरकारच नव्हे तर खासगी क्षेत्राची मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे. पुढच्या काळात ही गुंतवणूक अधिकाधिक वाढेल. तशी धोरणं केंद्र सरकारकडून आखली जात आहेत. हे क्षेत्र जितकं खासगी क्षेत्रासाठी खुलं होईल तितकं व्यापकही होईल. त्यामुळे नियामक व्यवस्थाही उभी करावी लागेल. चांद्रयानाची मोहीम यशस्वी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानविषयक घडामोडींकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जातं आणि वृत्तांकनाचं प्रमाणही वाढलं आहे. ‘स्पेस’साठी वृत्तपत्रांमध्ये आता ‘स्पेस’ मिळू लागली आहे ही चांगली बाब आहे, असं जितेंद्र सिंह गमतीने म्हणाले. मग विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अंतराळातील गप्पांना विराम देत पत्रकार आणि मंत्री दोन्हीही काश्मिरी पदार्थांचा स्वाद लुटण्यात मग्न झाले.

Story img Loader