दिल्लीवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेतील ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल यांचा वरिष्ठ सभागृहातील प्रवेश लक्षवेधी होता. खासदारपदाची शपथ घेतानाच त्यांनी घोषणाबाजी केली होती. सभापतींनी त्यांची शपथ नामंजूर केली. त्यांना परत शपथ घ्यावी लागली होती. दुसऱ्या वेळी मात्र मालीवाल यांनी लिहून दिलेलं वाचलं. शपथ घेताना घोषणाबाजी वा स्वत:चे शब्द शपथपत्रात घालायचे नसतात. शपथेचा विहित नमूना ठरलेला असतो, त्याव्यतिरिक्त कोणताही शब्द ग्राह्य धरला जात नाही. लोकसभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली, सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तींची, नेत्यांची नावे घेतली. वरिष्ठ सभागृहात असे प्रकार फारसे होत नाहीत पण, मालीवाल उत्साहात होत्या. त्यांना सभागृहात अस्तित्व दाखवायचं असेल, म्हणून त्यांनी घोषणाबाजी केली. पण, थोड्याच दिवसांमध्ये चित्र पालटलेलं दिसलं. केजरीवालांच्या खासगी सचिवाने त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मालीवाल आता ‘आप’च्या राहिलेल्या नाहीत. खरंतर त्या बिनपक्षाच्या खासदार झाल्या आहेत. संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. पण, त्या एकट्याच मागच्या आसनावर बसलेल्या दिसल्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेत विरोधकांकडून गोंधळ घातला जाणार याची मालीवाल यांना कल्पना होतीच. विरोधक आक्रमक झाल्याचे दिसताच मालीवाल सभागृहाच्या बाहेर निघून गेल्या. मालीवाल यांची खासदारकीची सहा वर्षे बाकी आहेत. मग, त्या सदस्यत्वाचा राजीनामा कशाला देतील? नाहीतर त्यांना राजीनामा देऊन भाजपमध्ये जावं लागेल. भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली तर त्या राज्यसभेच्या खासदार होतील. तसं करायचं नसेल तर त्यांना बिनापक्ष सदस्यत्व टिकवून ठेवावं लागेल. संसदेच्या आवारातही त्या एकट्याच वावरताना पाहायला मिळतं. पत्रकारांनीही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, मी मीडियाशी आता काही बोलणार नाही असं म्हणून त्या निघून गेल्या. ‘इंडिया’ आघाडीतील कोणी त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि भाजपमध्ये गेल्याशिवाय सत्ताधारीही बघणार नाही अशी मालीवालांची कोंडी झाल्याचे अधिवेशनामध्ये पहायला मिळाले.

हेही वाचा >>> भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!

मी जरा जास्तच वाकतो…

लोकसभा असो वा राज्यसभा, सभागृहात काय चाललंय हे संसद टीव्हीवर दिसत नाही. कारण, कॅमेरे सतत लोकसभाध्यक्षांवर वा सभापतींवर खिळलेले असतात. विरोधी पक्षांच्या सदस्यांचे काय चाललंय हे फक्त तुम्ही सभागृहाच्या कक्षांमध्ये असाल तरच समजेल. सभागृहातील गोंधळाचा आवाज ऐकू येईल पण, कोण काय करतंय हे कळणार नाही. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू होतं. पीठासीन अधिकारी आसनस्थ झाले होते. मोदी काही तरी बोलले, विरोधकांच्या बाकांवरून गोंधळ सुरू झाला. खरंतर माइक सुरू नसला तरी, विरोधी पक्षनेत्यांचं बोलणं पीठासीन अधिकाऱ्यांना ऐकू येतं. इतरवेळी ते सातत्याने त्यांना खाली बसवत असतात. ते बोलायला लागले की, त्यांना अडवून सभागृहाच्या प्रतिष्ठेचं भान दिलं जातं. पण, मोदी बोलायला लागले आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी मान उजवीकडं वळवली ती भाषण संपेपर्यंत! स्वत: खरगे आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. त्यांनी आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे हात वर करून बोलण्याची परवानगी मागितली. बराच वेळ ते पीठासीन अधिकाऱ्यांकडे विनवणी करत होते. पण, मान उजवीकडे ठेवून ते मोदी काय म्हणतात हे तल्लीन होऊन ऐकत होते. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यानेे प्रवचन ऐकावं त्याप्रमाणं ते गुंगून गेले होते. मग, विरोधकांचा गोंधळ वाढत गेला. हे सगळं होत असताना मोदींनी दोन-तीन वेळा तरी पाणी पिऊन घेतलं असेल. या पाणी पिण्यात बहुधा पीठासीन अधिकाऱ्यांची तंद्री मोडली असावी. त्यांचं लक्ष विरोधकांकडं गेलं पण, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. एखाद्या लहान मुलाला खाली बसवावं तसं विरोधी सदस्यांना त्यांनी हातानंच खाली बसण्याचा आदेश दिला आणि पुन्हा ते भाषण ऐकण्यात मग्न झाले. हा सगळा प्रसंग संसद टीव्हीवर लोकांना पाहायला मिळाला असेलच असं नाही. बराच वेळ कॅमेरा मोदी आणि पीठासीन अधिकाऱ्यांवरच असल्यानं विरोधक दिसतच नाहीत. ही घडामोड होण्याआधी एक दिवस हेच पीठासीन अधिकारी विरोधी सदस्यांवर भडकले होते. ते बरंच काही बोलले पण, अचानक म्हणाले की, मी जरा जास्तच वाकतो असं लोक म्हणतात हे मला माहीत आहे… राज्यसभेतील हे पीठासीन अधिकारी सदस्यांपेक्षा स्वत:च जास्त बोलतात असं कधी कधी दिसतं. यावेळी ते खरोखरच जास्त बोलून गेले.

प्रेक्षक कक्षात मायलेकी

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेची सुरुवात भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी केली. ठाकूर नेहमीच आक्रमक भाषण करतात, तसंच ते इथंही करत होते. ठाकूर काँग्रेसला फोडून काढत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. सत्ताधारी पक्षाकडून पहिलं भाषण सुरू असताना विरोधीपक्ष नेत्याने हजर असणं अपेक्षित होतं. पण, त्याचं उत्तर दुपारी मिळालं. त्याच दिवशी राहुल गांधींनी लोकसभेत तडाखेबंद भाषण केलं. कदाचित त्याच्या तयारीसाठी ते सभागृहात आले नसावेत. राहुल गांधींच्या भाषणाची उत्सुकता काँग्रेसच्या नेत्यांना होती त्याहून अधिक सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना होती असं दिसलं. त्यादिवशी प्रियंका गांधीही सकाळीच संसदेत आलेल्या होत्या. सोनिया गांधी आता लोकसभेच्या सदस्या नाहीत, त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. राहुल गांधींचं भाषण सुरू होण्याआधी सोनिया आणि प्रियंका दोघीही प्रेक्षक कक्षामध्ये येऊन बसलेल्या होत्या. तास-दीड तासाचं भाषण झाल्यावर दोघीही निघून गेल्या. पुढच्या वेळी कदाचित प्रियंका गांधींना प्रेक्षक कक्षात बसण्याची गरज भासणार नाही. वायनाडमध्ये पोटनिवडणुकीत त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या विजयी झाल्या तर भाऊ-बहीण दोघेही एकत्र लोकसभेत दिसतील. लोकसभा निवडणुकीत प्रियंकांच्या भाषणांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. प्रत्यक्ष सभागृहात त्यांच्या कामगिरीकडं सगळ्यांचं लक्ष असेल.

करेक्ट गेम…मुख्यमंत्री एकनाथ 

शिंदे ‘करेक्ट कार्यक्रम’ करता करता ‘करेक्ट गेम’ कसा काय करतात हे कळत नाही. पण प्रत्येक वेळी गेम यशस्वी होतोच. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटावर भाजपने फार दबाव आणला होता. भाजपने अजित पवार गटाला चार जागा देऊन बोळवण केली, शिंदे गटाचंही त्यांना बहुधा तेच करायचं असावं. जितक्या कमी जागा शिंदे गटाला मिळतील तेवढं बरं असा गेम होता. पण, शिंदेंनीच प्रदेश भाजपच्या नेत्यांचा करेक्ट गेम करून टाकला. दिल्लीत फेऱ्या मारून मारून शिंदेंनी आपल्या वाट्याच्या जागा एक-एक करत वाढवत नेल्या. दादांना चार आणि शिंदे आठ, बाकी जागा भाजपच्या वाट्याला, अशी चर्चा होत होती. पण, अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस येईपर्यंत शिंदेंनी आपल्या झोळीत १५ जागा गोळा केल्या होत्या. खरंतर प्रदेश भाजपच्या नेत्यांनी शिंदेंना वैताग दिला होता. भाजपनं कुठलं सर्वेक्षण केलं होतं, त्यात शिंदे गटातील काही खासदारांच्या जागा जिंकणं अशक्य आहे, तिथले उमेदवार बदला नाही तर त्या जागा भाजपला द्या, अशी मागणी होत होती. अखेर शिंदेंनी नमतं घेतलं. त्यामुळं भावना गवळींच्या हातून यवतमाळ-वाशिम, कृपाल तुमानेंच्या हातून रामटेक आणि हिंगोली हेमंत पाटील यांच्या हातून निसटलं. शिंदे गटाचं म्हणणं होतं की, या तीनही जागा जिंकता येतील, उमेदवार बदलण्याची गरज नाही. पण, भाजपनं ऐकलं नाही. उमेदवार बदलला आणि त्या जागांवर शिंदे गट पराभूत झाला. मग, शिंदेंनी विधान परिषदेत करेक्ट कार्यक्रम करून गवळी आणि तुमानेंना आमदार बनवलंच. शिंदेंशिवाय महायुती नाही हेच खरं.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap mp swati maliwal oath in rajya sabha uproar in parliament session rahul gandhi speech in lok sabha zws
Show comments