दिवसभर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून थकलेले अब्दुलभाई परतले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. घरात प्रवेश करण्याआधी शिरस्त्याप्रमाणे खुराडय़ात डोकावले. त्यांचा लाडका कोंबडा डोळे मिटून बसलेला होता. अलीकडे नेतृत्वबदलाच्या चर्चाना उधाण आले तरी हा नेहमीप्रमाणे संकेत का देत नाही म्हणून भाई अस्वस्थ होते. पहाटे ४च्या सुमारास कोंबडय़ाने अचानक बांग द्यायला सुरुवात केली तसे ते धडपडत उठले. खुराडा उघडून त्यांनी ‘राम राम सलाम जय भीम जय महाराष्ट्र’ असा परवलीचा शब्द वापरताच कोंबडा आणखी आरवायला लागला. विजेरीच्या प्रकाशात त्यांनी त्याचे मुंडके व चोच कोणत्या दिशेने आहे याचे बारकाईने निरीक्षण केले. हा प्रवरानगरच्या दिशेने बघून ओरडतोय हे लक्षात येताच आनंदित होत ते तयारीला लागले. आता बस्स झाली ठाण्यावरची निष्ठा. लगेच राधाकृष्णांना गाठून त्यांना खूश करून टाकायचे असे म्हणत ते निघाले.
काँग्रेसमध्ये असताना याच पाटलांवर आपण ‘पक्ष चालवायला पैसेच काय साधे झेंडेही देत नाही’ अशी टीका केल्याचे त्यांना आठवले व हसू आले. राजकारणात जुन्या गोष्टी कुणी लक्षात ठेवत नाही म्हणून आपल्यासारख्याचे फावते असे म्हणत त्यांचा ताफा सुभेदारीकडे वळला. खरे तर मागच्याच सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आपण भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून थेट देवेनभाऊंच्या जनादेश यात्रेतच शिरलो, दाजींनाही शब्द टाकायला लावला, पण सिल्लोड सेनेच्या कोटय़ात असल्याने नाइलाजाने तिकडे जावे लागले. आता राधाकृष्णांकडे नेतृत्व आले तर पक्षप्रवेश व मंत्रीपद कायम राखण्यासाठी हीच योग्य संधी. त्यामुळे या भेटीत त्यांची ‘जमके’ तारीफ करायची. असे एखादे वाक्य वापरायचे की ते राज्यभर चर्चिले जाईल. तसेही ते साधे आहेत. गुणगौरवाने लवकर हुरळून जातील. एकदा या भेटीला प्रसिद्धी मिळाली की लगेच त्यांचा सिल्लोड दौरा आयोजित करायचा. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करण्यासाठी वीस हजार लोक तयारच आहेत आपल्याकडे. यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री झाल्याचा ‘फील’ येईल.
तुमच्या हाती नेतृत्व येईपर्यंत डोक्यावर केस ठेवणार नाही, टोपीच घालेन ही आधी ठाणेकरांना दिलेली शपथ पुन्हा जाहीरपणे घेऊन त्यांना खूश करून टाकायचे. काही अडचण आलीच अथवा त्यांच्या मनात काही किंतु परंतु दिसलाच तर दाजींना पुन्हा मध्ये टाकायचे. काहीही झाले तरी ही संधी सोडायची नाही असे मनसुबे रचत ते ठिकाणावर पोहोचले. पाटलांना तयार व्हायला थोडा वेळ आहे हे दिसताच त्यांनी साहाय्यकांना कामाला लावून साऱ्या मीडियाला बोलावून घेतले. त्यातला कोण मुख्यमंत्री पदाबाबतचा प्रश्न विचारणार हेही ठरवून टाकले. मग थोडय़ा वेळात कॅमेऱ्यांच्या लखलखाटात दोघांची भेट झाली. वार्तालाप सुरू झाल्यावर ते ‘तो’ प्रश्न कधी येतो याची वाटच बघत होते. तो विचारला जाताच भाई उद्गारले, ‘राधाकृष्णांनी मुख्यमंत्रीच काय त्यापेक्षा मोठय़ा पदावर जावे. माझी छाती चिरून दाखवली तर हृदयात राधाकृष्णच दिसतील.’ या एका वाक्याने वार्तालापाचा नूरच पालटला. वाहिन्यांवर ‘ब्रेकिंग’ म्हणून ते झळकू लागताच अब्दुलभाई सुखावले. भेट आटोपून परतताना त्यांना ठाण्याहून सारखे फोन येऊ लागले, पण त्यांनी दुर्लक्ष केले. याला प्रतिसाद आता उद्या सकाळी कोंबडय़ाचा कल घेतल्यावरच असे मनाशी ठरवत ते पुन्हा पाहणीसाठी निघाले.