‘मार्क्सवादाचे भवितव्य’ शीर्षक लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १५ ऑगस्ट, १९४९ च्या ‘नवशक्ती’मध्ये लिहिलेला आहे. त्यात त्यांनी निकोलो मॅकिआव्हेलीला (१४६९-१५२७) ‘कामगारांचे राज्यशास्त्र सांगणारा’ असे संबोधले आहे. मॅकिआव्हेली हा इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार, कवी. त्याने संघर्षशून्य समृद्ध समाजाची संकल्पना विशद केली आहे. मॅकिआव्हेलीवर तर्कतीर्थ लिखित मराठी विश्वकोशाच्या तेराव्या खंडातील नोंद. या लेखाइतकीच वाचनीय आहे. तर या लेखात विरोधविकासवादास तीर्कतीर्थांनी मार्क्सवादाचा प्राण म्हटले आहे. हा विरोधविकासवाद प्रथम हेगेलने मांडला. तो जर्मन तत्त्वज्ञ. त्याने अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानास वांझ म्हटले होते. हेगेलचा विरोधविकासवाद इतिहासाला चांगला लागू होतो. त्याच्या विचारानुसार एका ऐतिहासिक परिस्थितीतून दुसरी जन्म घेते. त्याचे कारण, पहिल्या परिस्थितीतच तिच्याविरोधाची बीजे असतात. त्यातूनच नवीन परिस्थिती व विचार जन्म घेतो. साधारणपणे असे सिद्धांत कोणीही मान्य करावे असेच असतात. कारण, ते तार्किकाधारित असतात शिवाय वस्तुनिष्ठही.
केवळ विरोधविकास मानून समाजातील नेमकी कोणती शक्ती विरोध करून विकास करणारी आहे, हे निश्चित करता येत नाही. ही कल्पना वांझ नाही. तिच्यात विपर्यासाचेही सामर्थ्य आहे. संधिसाधूपणाला त्यात वाव आहे. वाटेल ती साधने सूक्तासूक्त विचार न करता विरोधातून विकास होतो म्हणून वापरता येतात. कोणत्याही तर्कदुष्ट कल्पनेचे समर्थन विरोधविकास सिद्धांताच्या सहाय्याने तिचे समर्थक पक्ष करू शकतात. विरोधविकास ही किमया आहे. मार्क्सवाद्यांचा तो एक लोखंडाचे सोने करणारा परिस आहे. कामगारांच्या हुकूमशाही राज्यातून परिपूर्ण मानवी स्वातंत्र्याचे युग येईल, ही कल्पना मार्क्सने उराशी बाळगली होती. याचे कारण हाच वाद होता. भौतिक दमन सामर्थ्य व आर्थिक साधने, हेच जीवनाचे अंतिम सत्य मार्क्सवादाने सांगितले. दलित कामगारवर्गाला न्याय मिळणार, तो आध्यात्मिक व नैतिक औदार्याने नव्हे. माणसाचा समंजसपणा ही काही शक्ती नव्हे, तिला जीवनात दुय्यम स्थान आहे. मार्क्स हा कामगारवर्गाचे राज्यशास्त्र सांगणारा मॅकिआव्हेली झाला.
कार्ल मार्क्सने पूर्वयुगातील सर्व ध्येयवाद (नीती, कला, धर्म इत्यादी) एक तत्कालिक कल्पनामय आभास ठरविला होता, असे तर्कतीर्थ या लेखात स्पष्ट करत सांगतात की, मार्क्सने सर्व चिरंतनमूल्यवादी तत्त्ववेत्त्यांना वेड्यात काढले. माणूस बदलण्याची जरुरी नाही. आर्थिक परिस्थिती बदला म्हणजे माणूस आपोआप बदलेल, असे त्याने सांगितले. त्याचा परिणाम आज रशियात पाहावयास मिळतो. मार्क्स सर्व ध्येयवाद्यांना धिक्कारणारा कठोर तत्त्ववेत्ता झाला. लेनिन हा सर्व इतर क्रांतिवाद्यांना, इतर पक्षांना मूर्खात काढणारा निष्ठावंत मार्क्सवादी क्रांतिस्थापक झाला. स्टॅलिनसारखा निष्ठावंत कठोर मार्क्सवादी रशियाचा राज्यधुरंधर झाला आहे, हे तर्कतीर्थांचे त्या काळातील निरीक्षण होते.
रशियात राज्यकर्त्यांचा वर्ग वरिष्ठ सत्ताधारी वर्ग म्हणून अस्तित्वात आला आहे. राज्याचा तो मालकच आहे. राज्याकडे सर्व जमिनींची, खाणींची, कारखान्यांची व बँकांची मालकी आहे. त्या राज्यकर्त्या वर्गाच्या जड जोखडाखाली एकजुटीने खपणाऱ्या कामगारांचे ते राज्य आहे. व्यक्तिश: प्रत्येक कामगार व नागरिक त्या कामगार राज्याचा दास आहे. राज्याचे दास्य एवढाच हक्क तिथल्या नागरिकाला आहे. ते राज्य म्हणजे मार्क्सच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांची समाधी आहे, या तर्कतीर्थांच्या उद्गारात व्यक्तिस्वातंत्र्य संकोचाचे शल्य दडलेले दिसते.
मार्क्सने खुल्या व्यापाराच्या तत्त्वाचे जुने अर्थशास्त्र मर्यादित व चुकांचे ठरविले आणि गतियुक्त अर्थशास्त्राला जन्म दिला, हे त्याचे ऋण मनुष्यजातीने मान्य केले पाहिजे. सामाजिकशास्त्रज्ञांनी आर्थिक उत्पादन पद्धती व तज्जन्य मानवी संबंध ध्यानात घेतले पाहिजेत, हे मार्क्सने जगाला शिकविले. मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद बाधित झाला आहे. विरोधविकास संदिग्धता व अस्पष्टता यांनी दूषित आहे. मात्र, कामगार व दलित, दरिद्री माणसांना त्याने जागे केले. याकरिता प्रत्येक माणूस त्याचा कृतज्ञ राहील. समतेच्या स्थापनेनेच त्याचे ऋण फिटेल. तर्कतीर्थांनी या लेखातून मार्क्सवादाच्या गुणदोषांवर प्रकाश टाकून मार्क्सचे वैश्विक योगदान अधोरेखित केले. तर्कतीर्थ भौतिक संपन्नतेपेक्षा मानवी मूल्य व चारित्र्यास महत्त्वाचे मानतात, हेही या लेखातून स्पष्ट होते. drsklawate@gmail.com