शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये, असे न्यायाचे तत्त्व असल्याचे सांगितले जाते. पण न्यायव्यवस्थेबाहेरील व्यक्ती, यंत्रणा एखाद्याला आपले निरपराधित्व सिद्ध करण्याची संधीही न देता दोषी ठरवतात आणि नरकयातना भोगायला लावतात तेव्हा त्या व्यक्तीने काय करायचे असते? नेमके तेच रिया चक्रवर्तीने केले आणि आता ती निर्दोष असल्याचा अहवाल सीबीआयकडून आला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीच कशी जबाबदार आहे, असा अवतीभवती सुरू असलेला गदारोळ, पैसा आणि अमली पदार्थांचे आरोप, कुटुंबीयांनाही लक्ष्य केले जाणे, भावासह २८ दिवसांचा तुरुंगवास या सगळ्यातून लढत राहणे ही अजिबातच सोपी गोष्ट नव्हती. पण आपला तोल ढळू न देता पोलीस, सीबीआय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, न्यायालय या सगळ्यांना सामोरे जात न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत पाच वर्षे रिया चक्रवर्तीने केलेला संघर्ष आता तिला एका नव्या उमेदीच्या वळणावर घेऊन आला आहे.
तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात त्याप्रमाणे समाजमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पसरलेल्या खोट्या कथनांमुळे रियाला तिची काहीही चूक नसताना २८ दिवस तुरुंगात घालवावे लागले आणि अपरिमित दु:ख सहन करावे लागले. ते म्हणतात ते तसे आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन सांगायचे तर पाच वर्षांत वाट्याला आलेले अपमान, मनस्ताप, ताणतणाव, आर्थिक नुकसान आणि मुख्य म्हणजे वाया गेलेला अत्यंत अनमोल असा पाच वर्षांचा वेळ आणि त्याचा तिच्या करिअरवर झालेला परिणाम याची किंमत कोण मोजणार? आता ते सगळे कसे भरून येणार आहे? आणि कोण भरून देणार आहे? रियाच्या या सगळ्या दुष्टचक्राची सुरुवात झाली ती १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हापासून. त्याच्या साधारण सहा दिवस आधीच त्याच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहणारी रिया नाते संपवून निघून गेली होती, असे सांगितले जाते. पण बिहारमध्ये राहणाऱ्या सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी सुशांतची आत्महत्या नाही, तर रियाने केलेली हत्या आहे, असा आरोप करत तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि नंतरची चक्रे अशी काही फिरली की त्यात रिया चक्रवर्तीचे आयुष्य भिरभिरत गेले. इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेने सुशांत सिंग राजपूतला काहीही समज नसलेले कुकुले बाळ ठरवले आणि रियाला त्याच्या जिवावर उठलेली कैदाशीण. त्याने मिळवलेला पैसा हडप करू पाहणाऱ्या या चेटकिणीने म्हणे त्याला अमली पदार्थांचे व्यसन लावले आणि त्याला आत्महत्या करायला भाग पाडले, त्याच्यावर जादूटोणा केला अशा रसभरीत कहाण्या समाजमाध्यमांमधून, टीव्ही माध्यमांमधून फिरू लागल्या.
त्या दोघांच्या नात्यामध्ये एकेकाळी जी काही कोवळीक असेल तिचा रोजच्या रोज चव्हाट्यावर कोळसा होत गेला. पुरुषाच्या आयुष्यातील एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी स्त्रीला जबाबदार धरणे ही काही नवी गोष्ट नव्हती, ती अगदीच नेहमीची सोपी मांडणी. पण ती करताना आपण त्या पुरुषाचाही अपमान करतो आहोत, याचेही भान कोणीही बाळगले नाही. त्या काळात रोजच्या रोज माध्यमांमधून दिसणारा तमाशा केवळ बिहारच्या (कारण सुशांत सिंग राजपूत बिहारचा होता) निवडणुकींसाठी घडवून आणला जात आहे, असे सांगितले जात होते, हे तर अविश्वसनीय होते. त्याला असलेल्या टीआरपीमुळे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनीही आपण एका आयुष्याशी खेळतो आहोत याचा विचार न करता आपले उखळ पांढरे करून घेतले. हे प्रकरण बिहार पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवले गेले.
पुढे रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी झाली. त्यात काहीही सापडले नाही. मग तिला आणि तिच्या भावाला एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. २८ दिवसांनंतर तिला जामीन मिळाला. पुढे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी विषबाधा आणि गळा आवळून हत्या केल्याची शक्यता नाकारली. त्यामुळे आता सीबीआयने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू ही हत्या नसून आत्महत्या होती असे म्हणत पाच वर्षांनी हे प्रकरण फाइलबंद करत असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. रियानेही ‘सॅटिस्फाइड’ या गाण्याच्या ओळी समाजमाध्यमांवर टाकत आपली नेमकी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालय त्यावर आता काय द्यायचा तो निर्णय देईल, पण पाच वर्षांपूर्वी तिच्यावर बेफाम आरोप करणाऱ्या, आपणच तिचा निवाडा करणार आहोत, अशा थाटात वावरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे, समाजमाध्यमांचे काय? एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल त्याची माफी मागणे हे त्यांचे कर्तव्य नाही का?