‘आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला सरकार तयार आहे’ हे पेपरातले देवेंद्रभाऊंचे विधान वाचून सोलापुरातील लग्नाळू तरुणांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गेल्या डिसेंबरमध्ये मोर्चा काढला. त्यालाही आता तीन महिने होत आले, पण सरकारी पातळीवर कुणी दखलच घेतली नाही. निवेदन घेणाऱ्या प्रशासनाने तर हे सरकारचे काम नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. या पार्श्वभूमीवर ही आशा पल्लवित करणारी बातमी वाचून या मोर्चात नवरदेवाच्या वेशात घोडय़ावर बसून सामील होणारे तरुण उल्हसित होत एकमेकांना फोन करू लागले. शेवटी सारे एकत्र येत मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या रमेशभाऊंकडे गेले. आता थेट मुंबई गाठायची व सरकारने लग्नाची जबाबदारी घेतल्याशिवाय मंत्रालय सोडायचेच नाही असा निर्धार भाऊंकडच्या बैठकीत केला गेला. मुंबईत मोर्चा काढायची वेळ आली तर घोडे कुठून आणायचे यावर बराच खल झाला. शेवटी लग्नासाठी जमवलेल्या पैशातून थोडे खर्च करायचे असे सर्वानुमते ठरले. तेवढय़ात भाऊंनी मुंबईत घोडय़ाचे भाडे किती हेही विचारून घेतले. ‘अरे पण देवेंद्रभाऊ गमतीत बोलले’ अशी शंका एकाने काढताच साऱ्यांनी त्याला गप बसवले.
‘गमतीत का असेना, सभागृहात जे बोलले जाते त्यावर अंमल करावाच लागतो. तसेही भाऊ जे गमतीत बोलतात तेच खरे असते’ असे एकाने निदर्शनास आणून देताच साऱ्यांनी माना डोलवल्या. मग ठरले. नवरदेवाचा पोशाख बॅगेत टाकून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघायचे. सोलापुरात वापरलेले फलक आता परिस्थिती बदलल्याने मुंबईत कामात येणार नाही हे लक्षात येताच नवे फलक तातडीने तयार करण्यात आले. ‘कुणी मुलगी देता का?’ ऐवजी ‘सरकारने मुलगी शोधून लग्न लावून दिलेच पाहिजे’ ‘जो न्याय आदित्यला, तोच न्याय सर्वाना’ अशा नव्या घोषणा त्यावर होत्या. ठरलेल्या दिवशी मोर्चा निघाला. त्या वेळी वाहिन्यांवर बातम्यांची मारामार असल्याने मोर्चाला जबर प्रसिद्धी मिळू लागली. हे बघून सरकारही हरकतीत आले. शेवटी तिघांच्या शिष्टमंडळाला भाऊंच्या भेटीची परवानगी मिळाली.
‘हे बघा, माझे ते वाक्य मिश्कीलपणे होते. त्यामागचे राजकारण तुमच्या लक्षात येण्याचे काही कारण नाही, पण तुमची समस्या गंभीर आहे हे मी या ठिकाणी मान्य करतो. तरुणांची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याने एक खास यंत्रणा राबवून तुम्हाला वधू मिळवून दिल्या जातील. लग्नाचा खर्चसुद्धा आम्ही करू. फक्त अपेक्षा एवढीच की त्यानंतर तुम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून देशसेवेसाठी स्वत:ला झोकून द्यायला हवे.’ भाऊंचे हे सकारात्मक उद्गार शिष्टमंडळाने मोर्चेकऱ्यांसमोर सांगताच प्रचंड जल्लोष झाला. सारे परत निघण्याच्या तयारीत असताना एकाने टूम काढली. ‘आपण आदित्यंना भेटायला हवे. ते लग्नाच्या वयाचे असल्यामुळेच केवळ आपला प्रश्न मिटला’ साऱ्यांना हे पटले. मग सर्वजण थेट मातोश्रीवर गेले. ‘तुमची समस्या त्यांनी सोडवली हे चांगलेच झाले, पण भाऊ सभागृहात हेही बोलले होते की लग्न झाले की तोंड बंद होते. तेव्हा तुम्हाला असे ‘बंद तोंडा’चे कार्यकर्ते व्हायचे आहे का? मीही तुमचा प्रश्न मार्गी लावून देतो, पण आम्हाला बोलणारे कार्यकर्ते हवे आहेत. आहे का तयारी तुमची?’ आदित्यच्या या प्रश्नावर तरुणांमध्ये चलबिचल सुरू झाली. शेवटी जे ठरवायचे ते सोलापुरात ठरवू असे म्हणत सारे परतीच्या मार्गाला लागले.