या वर्षातील अनेक महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचाही उल्लेख सातत्याने होत असे. तो का, याची प्रचीती गेल्या काही दिवसांत आली. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या अश्वेत सरकारच्या स्थापनेला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु या मुहूर्तावर, वर्णद्वेषी राजवटीविरोधात खंबीर लढा देऊन सत्तारूढ झालेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला यंदा उतरती कळा लागल्याचे नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी दाखवून दिले. ४००-सदस्यीय नॅशनल असेम्ब्लीमध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस अर्थात ‘एएनसी’ने १५९ जागा जिंकल्याचे तेथील निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केले. तीस वर्षांत पहिल्यांदाच या पक्षाने स्पष्ट बहुमत गमावले. गेल्या खेपेस या पक्षाला २३० जागा मिळाल्या होत्या. एएनसीचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक अलायन्सला ८७ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे सत्तास्थापनेसाठी दोन्ही प्रमुख पक्षांसमोर आघाड्या जुळवण्याचे आव्हान आहे. भ्रष्टाचाराबद्दल राजीनामा द्यावा लागलेले माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्या ‘स्पीअर ऑफ द नेशन’ (एमके) या नवथर पक्षाने ५८ जागा जिंकून अनपेक्षित यश मिळवले. इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्स या अतिडाव्या विचारसरणीच्या पक्षाने ३४ जागा जिंकल्या. आम्ही कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्यास तयार आहोत, असे एएनसी नेते आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी म्हटले आहे. अशी वेळ या पक्षावर पूर्वी कधीही आलेली नव्हती. १९९४मध्ये नेल्सन मंडेला यांच्या स्फूर्तिदायक नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पहिली ‘सर्ववर्ण’ निवडणूक झाली, त्यावेळी एएनसीने ६२.६५ टक्के मते मिळवली होती. आजतागायत कधीही या पक्षाला ५० टक्क्यांच्या खाली मते मिळालेली नव्हती. यावेळी मात्र प्रथमच असे घडले. एएनसीला ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक मतदारांना आता या पक्षाविषयी तितके ममत्व राहिलेले नाही. परंतु हा बदल जोखण्यात या पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले हे उघड आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा