भारतीय आणि जागतिक बुद्धिबळविश्वात आर. प्रज्ञानंदचे नाव गेली काही वर्षे गाजतेय. एक पोरसवदा कुमार बाराव्या वर्षीच ग्रँडमास्टर होतो काय आणि अल्पावधीत बुद्धिबळातील रथी-महारथींशी टक्कर घेतो काय, हे सारेच अद्भुत होते. प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशालीदेखील उत्तम बुद्धिबळपटू. प्रज्ञानंदच्या बरोबरीने तीदेखील बुद्धिबळ जगतात चमक दाखवू लागली होती. पण सुरुवातीस प्रज्ञानंदची भरारी मोठी असल्यामुळे प्रकाशझोत त्याच्याकडे वळला. वयाच्या दहाव्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर आणि बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर बनलेल्या प्रज्ञानंदने पुढे त्या वेळच्या जगज्जेत्या आणि अजूनही जगातील अग्रमानांकित ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला ऑनलाइन स्पर्धेत सलग तीन वेळा हरवून दाखवले. माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदनंतर विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला तो दुसराच भारतीय बुद्धिबळपटू. या सगळया कालखंडात प्रज्ञानंदपेक्षा चार वर्षांनी मोठया असलेल्या वैशालीची वाटचाल अनेक अर्थानी आव्हानात्मक होती. बुद्धिबळविश्वात प्रगती तर करायची होतीच. पण वैशालीसमोर प्रमुख आव्हान होते, ‘प्रज्ञानंदची मोठी बहीण’ या(च) ओळखीची चौकट भेदण्याचे. या आव्हानाचा यशस्वी सामना तिने कसा केला, याकडे वळण्यापूर्वी वैशालीने अलीकडच्या काळात केलेल्या कामगिरीची दखल घेणे आवश्यक ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुकमार्क : लोकशाही वर्षभर वाचली; पण..

गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाची शिखरे वैशालीने सर केली. नोव्हेंबर महिन्यात फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकून तिने प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स स्पर्धेत स्थान निश्चित केले. जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी आव्हानवीर निश्चित करण्यासाठी ही स्पर्धा खेळवली जाते. त्यानंतर काही दिवसांनीच स्पेनमध्ये झालेल्या एका स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून वैशालीने २५०० एलो गुणांचा टप्पा पार केला. त्यामुळे ती ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठी पात्र ठरली. वैशाली अशा प्रकारे भारताची ८४ वी ग्रँडमास्टर ठरली. पण अशी कामगिरी करणारी ती केवळ तिसरी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. याआधी कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांनाच इथवर मजल मारता आलेली आहे. यानिमित्ताने वैशाली आणि प्रज्ञानंद हे दोघे कँडिटेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आणि ग्रँडमास्टर किताब पटकावलेले बुद्धिबळ इतिहासातील पहिली बहीण-भाऊ जोडी ठरले. यापैकी प्रज्ञानंदच्या प्रवासाविषयी बहुतांना बरेच काही ज्ञात आहे. त्या तुलनेत वैशालीच्या वाटचालीकडे काहीसे दुर्लक्षच झाले. पण ही वाटचाल कमी प्रेरणादायी अजिबातच नाही. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे, या मार्गातील सर्वात अवघड टप्पा ‘प्रज्ञानंदची बहीण’ ही दुय्यम ओळख पुसून काढण्याच्या दिशेने झाला. या प्रवासाची परिणती ‘ग्रँडमास्टर वैशाली’ ही प्रधान ओळख निश्चित करण्यात झाली.

हेही वाचा >>> बुकमार्क : कामगार संघटना आजही हव्या!

प्रज्ञानंदचे सतत कौतुक व्हायचे, त्या वेळी आपल्याला सुरुवातीस वाईट वाटू लागले, हे तिने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने कबूल केले. त्या वेळी आपली वागणूक फार आदर्श नव्हती, हेही तिने सांगून टाकले. तिच्या आई-वडिलांनी याविषयी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा सुरुवातीस फार उपयोग झाला नाही. खरे म्हणजे वैशाली-प्रज्ञानंदच्या निमित्ताने एका व्यापक सामाजिक आणि भावनिक प्रश्नाची चर्चा होणे गरजेचे आहे. ‘प्रज्ञानंदची बहीण असल्याबद्दल काय वाटते?’ असा प्रश्न वैशालीला सर्वाधिक अस्वस्थ करून जाई. यशस्वी व्यक्तीच्या आजूबाजूच्यांना – विशेषत: तिच्या भावंडांना – स्वत:चा अवकाश, स्वत:ची ओळख असू शकते हे आपल्याकडे बऱ्याचदा नजरेआड केले जाते. या दुर्लक्षाचा कडू घोट गिळून वैशालीसारखी एखादीच किंवा एखादाच पुढे स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करतो. बाकीचे कित्येक नैराश्याच्या गर्तेत भरकटतात. या नैराश्यपर्वात वैशालीला अखेर बुद्धिबळाच्या पटानेच आधार दिला. ‘वुमन ग्रँडमास्टर’ हा किताब पटकावल्यानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला. पुढे प्रज्ञानंद आणि तिचे नाते अधिक घट्ट बनले आणि दोघे परस्परांचे सल्लागार बनले. आशियाई स्पर्धेत चीनच्या संघाविरुद्ध एक मोक्याचा डाव गमावल्यानंतर वैशाली अतिशय निराश झाली. त्यानंतरची स्पर्धा – कतार मास्टर्स – खेळण्याचा निर्णय तिने रद्द केला. प्रज्ञानंदने तिची समजूत घातली. वैशाली स्पर्धेत खेळली आणि जिंकलीही. ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असा तिसरा नॉर्म तिला त्या स्पर्धेतून मिळाला. आज ही दोन्ही भावंडे स्वतंत्र प्रतिभेचे बुद्धिबळपटू बनले आहेत. दोघांचा मार्ग स्वतंत्र आणि भविष्य उज्ज्वल आहे. ग्रँडमास्टर बहीण-भाऊ असणे, हा दोहोंसाठी केवळ परिस्थितीजन्य योगायोग आहे. मात्र दोहोंच्या वाटचालींमध्ये वैशालीचा प्रवास निश्चितच अधिक खडतर आणि म्हणून अधिक कौतुकपात्र ठरतो. जगाने आपली बाजू समजून घ्यावी या माफक अपेक्षेवर ती थांबली नाही. जगाने आपली दखल घेतलीच पाहिजे, या ईष्र्येने ती पुढे सरकली. त्यातूनच दोन ग्रँडमास्टर भावंडांपैकी थोरली म्हणून ओळखली जाऊ लागली!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After r praggnanandhaa sister vaishali moves to challenge world chess champion zws