डॉ. उज्ज्वला दळवी

वयपरत्वे विसरभोळेपणा म्हणजे डिमेन्शिया नव्हे. अल्झायमर्सला थोडी आनुवंशिक प्रवृत्ती आहे, मात्र अनेक गोष्टी टाळता येणं शक्य आहे.
‘मला डिमेन्शिया तर झाला नाही ना?’ सुकुंदाताईंनी काळजीने डॉक्टरांना विचारलं. ‘हल्ली बोलताबोलता पुढचे शब्दच सुचत नाहीत. घाईघाईने स्वयंपाकघरात गेल्यावर कशासाठी गेले, तेच आठवत नाही. कधी भाजीत दुप्पट मीठ पडतं, तर कधी विस्तव तसाच चालू राहातो. काल बँकेतून आले, पण लॉकर बंद केला की नाही तेच आठवेना. १ तारीख येऊन गेल्याचं कळलंच नाही, म्हणून वीज बिल भरायचं राहिलं. चुका होऊ नयेत म्हणून फार जपावं लागतं. काय झालंय मला?’

importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
Loksatta  kutuhal Synthetic Intelligence Many Unanswered Questions
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता : अनेक अनुत्तरित प्रश्न
Idiopathic Pulmonary Fibrosis (IPF), lung disease, Zakir Hussain
विश्लेषण : झाकिर हुसेन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस’ विकार काय आहे? त्यावर अजून ठोस उपाय का नाही?
People get money and wealth after the age of 35 years
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा
Loksatta kutuhakl Difference between synthetic intelligence and artificial intelligence
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतला फरक

व्यवस्थित तपासणी करून डॉक्टरांनी सुकुंदाताईंची बुद्धी नॉर्मल असल्याचं सांगितलं, ‘वय आणि व्याप यांच्यामुळे आलेला थोडासा विसराळूपणा म्हणजे डिमेन्शिया नव्हे. डिमेन्शियाने सारासार विचार करायची क्षमता घटते, चार माणसांत प्रसंगानुरूप वागायची रीतही कळेनाशी होते. रोजच्या जगण्यात गोंधळ उडतो.’ तरीही दिवसभराच्या ओढाताणीत काही महत्त्वाचं काम विसरून राहिलं की, ‘हा डिमेन्शिया तर नाही ना?’ या विचाराने अनेक वडीलधाऱ्यांना धडकी भरते. जगभरात पंचाहत्तरी-शंभरी गाठणाऱ्यांची संख्या गेल्या चार दशकांत वाढत गेली आहे. पण वयानुसार मेंदूसकट सगळीच इंद्रियं थकतात; न-कळतेपणा वाढतो. त्यामुळे त्या वडीलधाऱ्यांची आणि त्यांच्या जवळच्या माणसांची परवड होते. ती जवळून बघणाऱ्या प्रत्येकाचं देवाकडे एकच मागणं असतं, ‘‘मला शेवटपर्यंत कळतं ठेव.’’

दर शनिवारी मंदिरात ज्ञानेश्वरीचं उत्तम निरूपण करणारे हरितात्या एका शनिवारी दुपापर्यंत निजून राहिले. बळेच उठवल्यावर त्यांनी मुलाला ओळखलंच नाही. त्याने आणलेल्या चहाच्या कपात चष्मा ठेवला. ‘भूक लागली’ म्हणून धोशा लावला, पण उपम्याचा घास तोंडात घालणं, धड बोलणं-चालणं काहीच जमेना. मुलाने रुग्णालयात नेलं. न्यूमोनियाचं निदान झालं. आठवडाभर अँटिबायोटिक्स घेतल्यावर सारं मूळ पदावर आलं. पंधरवडय़ाने निरूपण जमलं. तो बरा होणारा, तात्पुरता बुद्धिभ्रंश होता. दुसऱ्याच कुठल्या तरी, बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराची ती सूचना होती.साधा सर्दीताप, लघवीचं इन्फेक्शन, न्यूमोनिया, नैराश्य, औदासीन्य वगैरे पूर्ण बरे होणारे आजारही साठीनंतर बुद्धी नाठी करायला पुरेसे ठरतात. थायरॉईडचे आजार, ‘ब’ किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, रक्तातलं साखरेचं, सोडियमचं प्रमाण कमीजास्त होणं, काही औषधांचे दुष्परिणाम यामुळेही मज्जासंस्था सैरभैर होते. पण त्यावर इलाज असतात. श्रवणयंत्र, चष्मा हट्टाने न लावणाऱ्या घारुअण्णांचा न-कळतेपणा वाढत गेला. बर्वेकाकांनी ते उपाय वेळीच स्वीकारले. आकलन लख्ख राहिलं. मुला-सुनेकडे ठणठणीत असलेल्या शरयूताई गंमत म्हणून, शेजारच्याच घरी, लेकीकडे राहायला गेल्या. केवळ जागा बदलल्यामुळे भ्रमिष्टासारख्या वागू लागल्या.

बरे न होणारे बुद्धिभ्रंशही असतात. हंटिंग्टन कोरियासारखे क्वचित आढळणारे आनुवंशिक आजार, इंग्लंडच्या मॅड-काऊ-डिझीझसारखे संसर्गजन्य आजारही वाढत जातात.जगद्विख्यात बॉक्सर माईक टायसनच्या डोक्याला बॉक्सिंगमध्ये सतत मार लागला. त्याला कायमचा बुद्धिभ्रंश झाला. करिअर संपलं. पुन:पुन्हा पडून डोकं आपटल्यानेही तोच परिणाम होतो. अशा वाढतच जाणाऱ्या बुद्धिभ्रंशाची जगभरातली दोन प्रमुख कारणं म्हणजे ‘अल्झायमर्स’ आणि ‘स्ट्रोक’.

गणिताच्या प्राध्यापिका असलेल्या उपाध्येकाकू निवृत्तीनंतर नातवंडांना मजेत गणित शिकवत. एके दिवशी चौथीतल्या नातीने विचारलेलं गणित त्यांना येईचना! मुलगा त्यांना तडक डॉक्टरांकडे घेऊन गेला. तिथे घेतलेल्या बुद्धिपरीक्षेत काकूंना त्र्याण्णवातून सात वजा करता येईनात; म्हणींचे अर्थही नीटसे उमगेनात; शिवाय त्यांना कॉफीच्या आणि हिंगाच्या वासांतला फरक कळेना! डॉक्टरांनी रक्ताचे तपास, हृदयाचा ईसीजी, मेंदूचा ईईजी आणि पेट-स्कॅन करून घेतला. बुद्धिभ्रंशाची सुरुवात असल्याचं निदान झालं. जुन्या कढईवर तेलाची चिकट पुटं जमतात. तसेच एका विकृत, चिकट प्रोटीनचे थर अल्झायमर्समध्ये मेंदूच्या गाभ्यातल्या, स्मृती घडवणाऱ्या भागात आणि सर्वात बाहेरच्या, विचार करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या महत्त्वाच्या भागात पेशींवर बसतात. पेशींच्या आत वेगळय़ा विकृत प्रोटीन्सची गुंतवळ जमते. त्या पुटांमुळे, गुंत्यामुळे पेशींच्या कामात गोंधळ उडतो. विस्मरण होतं; भावनांवरचा ताबा जातो; गोष्टींतली विसंगती समजत नाही; हालचाली सुरळीत राहत नाहीत.

तो गोंधळ मेंदूतल्या विद्युत-आलेखात म्हणजेच ईईजीत दिसून येतो. प्रोटीनचे थर पेट-स्कॅनमध्ये दिसतात. मेंदूची कुवत घटली की तिथली महत्त्वाची रसायनं कमी पडतात. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांमधलं रासायनिक दळणवळण तुटतं. ती रसायनं औषधांनी वाढवली तर थोडा फरक पडतो. डॉक्टरांनी काकूंना तशाच डोनेपेझिल नावाच्या गोळय़ा लिहून दिल्या, पण समईतलं तेल सरल्यावर फक्त वात सारून ज्योत जशी तात्पुरती मोठी होते तसाच तो फरक अल्पावधीत संपतो.

काही महिन्यांतच उपाध्येकाकूंना हिशेब करणं, जेवण रांधणं जमेना; स्वत:ची औषधं घेतानाही त्यांचा गोंधळ उडू लागला. तारीख/ वेळ कळेना; पोशाख करताना कुठला कपडा आधी, कुठला नंतर हे उमगेना; स्वयंपाकघर कुठलं, न्हाणीघर कुठलं काहीच समजेना. त्या तासन्तास घुम्यासारख्या बसून राहात. भोवतालच्या वातावरणात, जेवण्याखाण्यात त्यांना रस वाटेना. मग त्यांना आजूबाजूच्या माणसांबद्दल भलते संशय येऊ लागले. एके दिवशी त्या घरातल्यांच्या नकळत बाहेर गेल्या; वाट चुकून भलतीकडेच भटकत गेल्या.

असा कायमस्वरूपी बुद्धिभ्रंश झाला की मेंदूची विचार करायची, गोष्टींची कारणं समजून घ्यायची, आठवायची आणि नीटनेटके बेत आखायची कुवत हळूहळू कमी होत जाते; रोजची आपल्या जिवाची कामं करणंही कठीण होतं; तोल जाऊन पडझड होते; वागणं आणि व्यक्तिमत्त्वही बदलून जातं. पण काकूंना सर्वात अधिक त्रास झाला तो भेडसावणाऱ्या विचारांचा आणि भासांचा. दुखरा गुडघा, वाढत चाललेला बहिरेपणा, डोळय़ांतला मोतीिबदू ही सारी दुखणी काकूंच्या ‘अजाणत्या’ विश्वात अक्राळविक्राळ भासांचं रूप धारण करत. त्यांनी त्या बेभान होत, आकांडतांडव करत. त्यासाठी मात्र डॉक्टरांनी दिलेल्या वेगळय़ा औषधाचा त्यांना फायदा झाला.

आता अल्झायमसर्वंरती आदूकानुमॅब नावाचं नवं, माफक उपयोगी औषध आलं आहे. ते प्रोटीनचे चिकट थर खरवडून काढतं. पण त्यासाठी ते सततच घेत राहावं लागतं. एक वर्षांसाठी तसे उपचार घेतले तर ५६०००/- डॉलर म्हणजे सुमारे ४१ लाख रुपये खर्च येतो! कुणाला परवडणार?
स्ट्रोक हे डिमेन्शियाचं दुसरं मोठं कारण. कुठल्याही कारणाने मेंदूकडचं रक्ताभिसरण कमी झालं की स्ट्रोक होऊ शकतो. अनेकदा मोठा स्ट्रोक न होता मेंदूतले अनेक छोटेछोटे, विखुरलेले भाग प्राणवायूविना नाश पावतात. त्यांच्या एकत्रित परिणामाने मेंदूची सरसकटच ताकद घटते. त्यामुळे अर्धाग झाला नाही तरी हळूहळू बुद्धी क्षीण होत जाते. तसा बुद्धिभ्रंश बरा होत नाही, वाढतच जातो. हृदयाच्या स्नायूंना रक्ताभिसरण अपुरं असलं तर त्यासाठी काही औषधं सर्रास दिली जातात. संशोधकांनी तीच औषधं त्या विखुरलेल्या स्ट्रोक्सच्या रुग्णांना देऊन पाहिली. बुद्धिमांद्य वाढायची क्रिया मंदावली किंवा थांबली, पण तेही तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे.

कुठल्याही कारणाने बुद्धिमांद्याचा जम बसला की त्या सिंदबादच्या म्हाताऱ्याला मानगुटीवरून उतरवणं अशक्य असतं. जमलं तर त्याला आपल्याकडे फिरकूही न देण्यात शहाणपणा आहे. अल्झायमर्सला थोडी आनुवंशिक प्रवृत्ती आहे. पण अनेक गोष्टी टाळणं आपल्या हातात असतं. मेंदूकडचा रक्तपुरवठा कमी व्हायला, अल्झायमर्समधली प्रथिनांची विकृती वाढायला रक्तातला मोकाट, नाठाळ, रिकामटेकडा प्राणवायू कारणीभूत ठरतो. वाढलेला रक्तदाब, कह्यात नसलेला मधुमेह, धूम्रपान-मद्यपान-लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, प्रदूषित वातावरण यांनी त्या हानीकारक, मोकाट प्राणवायूचं रक्तातलं प्रमाण वाढतं. त्यातल्या रक्तदाब-मधुमेह-लठ्ठपणा यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तर घ्यायलाच हवा. पण सोबत आपणही जाणीवपूर्वक हातभार लावला तर त्या शत्रूंना नमवणं चांगलं जमतं. रंगीबेरंगी भाज्या-फळं, तेलबिया, ऑलिव्ह तेल, तिळेल- गोडं तेल, काळय़ा पाठीचे मासे वगैरेतले फ्लॅवानॉइड्स- पॉलिफेनॉल्स- ओमेगा ३ स्निग्धाम्लं हे घटक त्या मोकाट प्राणवायूवर मात करतात. त्यांचा आहारात समावेश करावा.मेंदू बुद्धिमान असतो. त्याची उपेक्षा केली की तो रुसतो. आपण त्याच्याकडे फार दुर्लक्ष करतो. त्याच्याशी सतत संवाद साधला तर तो अधिक उत्साहाने काम करतो. ते कसं साधायचं ते पुढल्या लेखात पाहू.

Story img Loader