सरकारी सेवेत असूनही प्रामाणिक मतप्रदर्शन आणि स्पष्टवक्तेपणाचा त्याग न केलेले विद्यामान हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग अलीकडच्या अनेक सैन्यदल प्रमुखांच्या तुलनेत निराळे ठरतात. सध्या बेंगळूरुत एरो इंडिया हे भव्य प्रदर्शन सुरू आहे. जगभरातील देशांनी या प्रदर्शनात त्यांच्याकडील लढाऊ आणि प्रवासी विमाने त्यांची क्षमता व करामतींसह सादर केली आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या तेजस भरारीची चर्चा देशभर झाली. परंतु तेजसमधून भरारी घेतली असली, तरी प्रकल्प अजूनही ‘जमिनी’वरच आहे याचे भान हवाईदल प्रमुखांना पुरेसे आहे. त्यामुळेच प्रदर्शनाच्या उत्सवी कलकलाटात आणि सरकारी औपचारिकतेतही तेजसचे निर्माते हिंदुस्तान एरॉनॉटिक्सला चार खडे बोल सुनवायचे ते थांबले नाहीत. हे त्यांचे विचार अर्थातच जाहीर भाषणातून मांडले गेले नव्हते. एका प्रशिक्षक विमानाच्या कुपीमध्ये बसून त्यांनी हिंदुस्तान एरॉनॉटिक्सच्या तंत्रज्ञ व अधिकाऱ्यांसमक्ष जे मतप्रदर्शन केले तेच समाजमाध्यमांवर प्रकटले. अर्थात याविषयी खुलासा किंवा सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही अशी आशा. अमरप्रीत सिंग यांनी यापूर्वी अनेकदा या मुद्द्यावर जाहीर मतप्रदर्शन केलेले आहेच. तेजस ही हलकी लढाऊ विमाने भारतीय हवाईदलाचा कणा ठरतील, अशी वक्तव्ये अनेकदा करून झालेली आहेत. तेजसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बऱ्याच प्रमाणात देशी बनावटीचे आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आदी सरकारपुरस्कृत मोहिमांची यशोगाथा म्हणूनही त्याचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. अशांपैकी बहुतांना तेजस हे लढाऊ विमान आहे यापलीकडे फारशी माहिती नाही. तेजस प्रकल्पाचे गेले कित्येक वर्षांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या विमानांच्या निर्मितीस व ती हवाईदलात दाखल होण्यास झालेला अक्षम्य विलंब. १९८४ मध्ये प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली. १७ वर्षांनी म्हणजे २००१मध्ये पहिले विमान उडाले. त्याहीनंतर १६ वर्षांनी म्हणजे २०१७ मध्ये ही विमाने दाखल होण्यास सुरुवात झाली. ती आहेत ‘तेजस मार्क वन’ या उपप्रकारातली. याबरोबरीने ‘तेजस मार्क वन ए’ या उपप्रकाराच्या निर्मितीस सुरुवात होणे अपेक्षित होते. पण २०२५ साल उजाडले, तरी या विमानांची पहिली तुकडी अजूनही आपल्याला मिळालेली नाही. येत्या मार्च महिन्यात ११ विमाने हवाईदलात दाखल होणे अपेक्षित होते, ती तारीखही पुढे ढकलावी लागणार अशी स्थिती आहे. कारण फेब्रुवारीच्या मध्यावर एकही विमान हाताशी आलेले नाही. ‘हिंदुस्तान एरॉनॉटिक्सविषयी मला भरवसा वाटत नाही. तुम्ही मिशन-मोडमध्ये आहात असे वाटतच नाही’, असा त्रागा हवाईदल प्रमुखांनी त्यामुळेच व्यक्त केला.
‘तेजस मार्क वन’ या प्रकारातील ४० पैकी ३६ विमानेच हवाईदलात दाखल झाली आहेत. चार अजूनही प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जीई एरोस्पेसकडून तेजस मार्क वन ए या विमानांची इंजिने मिळण्यास विलंब होत होता. ही इंजिने या वर्षी एप्रिलपासून मिळणार आहेत. हिंदुस्तान एरॉनॉटिक्सने याचा दाखला दिलाच. शिवाय तेजस प्रकल्प नेहमीच कसा अडथळ्यांमध्ये अडकत होता हे दाखवण्यासाठी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. सुनील यांनी थेट पोखरण – २ अणुचाचण्यांनंतरच्या अमेरिकी निर्बंधांचा दाखला दिला. विलंब आपल्यामुळे नव्हे, तर इतर बाह्य घटकांमुळे होत आहे असे सांगून वेळ मारून नेण्यातलाच हा प्रकार. तो हवाईदल प्रमुखांनी बरोबर ओळखला आणि योग्य जागी, योग्य वेळी त्याबद्दल भाष्य केले. ते केवळ हिंदुस्तान एरॉनॉटिक्सचे वाभाडे काढणारे नाही, तर सरकारसमोरही काही प्रश्न उपस्थित करणारे ठरते. तेजस विमाने मिग – २१ या विमानांची जागा घेणार आहेत. ती विमाने जुनाट झाली पण हाती नवीन विमाने आलेली नाहीत. ही केवळ हलक्या लढाऊ विमानांची परिस्थिती. मध्यम क्षमतेच्या विमानांबाबतही घोळ कसा सुरू आहे हे राफेलच्या निमित्ताने समोर येतच आहे. विमाने देशी बनावटीची वापरायची तर सरकारी कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे. ती परदेशी कंपन्यांकडून घ्यायची तर मुत्सद्देगिरी आणि पारदर्शी व्यवहारांची आवश्यकता असते. या सर्व आघाड्यांवर होणारा विलंब हे अंतिमत: कुण्या एका कंपनीचे नव्हे, तर सरकारचेच अपयश ठरते.