शिर्डीचे अधिवेशन आटोपल्यावर अजितदादांनी तीन महिन्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला तेव्हा कार्यालय चिटणीसांनी दिलेली माहिती ऐकून ते उडालेच! इतक्या कमी कालावधीत एवढी सदस्यसंख्या? हा दणदणीत विजयाचा परिणाम की बोगस नोंदणीचा? राज्यात स्वच्छ प्रतिमेची माणसे एवढी वाढली की काय? त्यांच्या डोक्यात काहूर माजले. नक्की काही तरी काळेबेरे आहे, असे म्हणत त्यांनी नवीन सदस्यांची जिल्हानिहाय पडताळणी करा असे आदेश दिले. समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक होती. अनेक जिल्ह्यांत भ्रष्ट, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना सर्रास पक्षात प्रवेश दिला होता. मलिन प्रतिमेच्या लोकांना घेऊ नका, असे सांगूनही हा प्रकार घडलाच कसा असा संताप व्यक्त करत त्यांनी तातडीने सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली. ती सुरू होताच दादांनी आरंभीच नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा :लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण?
‘‘आपल्याला सेनेच्या वाटेने जायचे नाही. जरी भाजपशी हातमिळवणी केली तरी सद्वर्तनी लोकांचा पुरोगामी पक्ष अशीच प्रतिमा तयार करायची आहे. हे ठाऊक असूनही या गणंगांना तुम्ही प्रवेश दिलाच कसा?’’ बैठकीत सन्नाटा पसरला. अखेर ‘‘तुमच्या मनात जे असेल ते बोला, मी रागावणार नाही,’’ असे ते हसत म्हणाल्यावर एकेक अध्यक्ष बोलू लागले. पहिला म्हणाला ‘‘दादा, आजकाल स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारणात येण्यास इच्छुक नाहीत. आम्ही खूप प्रयत्न केले पण बहुतेकांनी पाठ फिरवली. वैचारिक बैठक असलेल्या काहींना विचारले तर तुमच्या पक्षाचा विचारांशी काय संबंध, असे म्हणत त्यांनी ऑफर धुडकावली. (भुजबळ जोरात हसतात). शेवटी टार्गेट पूर्ण करायचे असल्याने बदनाम लोकांना घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.’’ आता थोडी भीड चेपल्याने दुसरा उभा राहिला. ‘‘दादा, आम्ही पक्षप्रवेशासाठी नोंदणी सुरू करताच भ्रष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनीच गर्दी केली. हे केवळ सत्तेचे संरक्षण मिळावे म्हणून येत आहेत असे लक्षात आले. म्हणून त्यांना तुमच्या भाषणाचा संदर्भ देत नकार दिला तर वाद घालू लागले. (साऱ्यांचे कान टवकारतात) म्हणाले, हाच निकष असेल तर धनंजय मुंडे तुमच्या पक्षात कसे? जशी त्यांची पाठराखण करता तशी आमचीही करा, पक्षाला वैभव मिळवून देऊ. हे ऐकल्यावर माझा निरुपाय झाला.’’ मग तिसरा उभा झाला. ‘‘एवढेच नाही दादा, आमच्या इथे तर भ्रष्टाचाराच्या आरोपात आकंठ बुडालेल्या एकाने स्वच्छ प्रतिमेचा एवढाच पुळका आला असेल तर तुरुंगवारी करणारे भुजबळ तुम्हाला कसे चालतात असे म्हणून जबरीने सदस्य पावती फाडायला लावली.’’ हे ऐकताच व्यासपीठावरील साऱ्यांनी माना खाली घातल्या. नेमकी हीच संधी साधून चौथा म्हणाला, ‘‘आमच्याकडे तर कहरच झाला. तुमच्या दादा, पटेल, तटकरेंवरसुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. हे सारे प्रमुख पदावर व आम्हाला मात्र प्रवेश नाही. याला न्याय कसा म्हणता येईल. एकतर यांची हकालपट्टी करा अन्यथा आम्हाला पक्षात घ्या, असा युक्तिवाद करून अनेक भ्रष्टांनी एकत्र येऊन वाद घातला. माझ्याकडे उत्तर नसल्याने शेवटी नोंदणी करून घ्यावी लागली.’’
हेही वाचा :तत्व-विवेक : प्लेटोचा उडणारा मासा आणि हेगेलचं घुबड
हे ऐकल्यावर पाचवा बोलू पाहताच दादांनी त्याला खाली बसवले. ‘‘बस्स झाले. आता चर्चा नको, ज्या भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेतले त्यांना आता निदान पदे तरी देऊ नका. दिली असतील तर तात्काळ बाजूला करा,’’ असे बजावून ते तडक बाहेर पडले तसे पटेल, तटकरे, मुंडे त्यांच्यामागे धावले. व्यासपीठावर शिल्लक उरलेले एकटे भुजबळ तेवढे हसत होते.