सार्त्र, काफ्का आणि अगदी हेमिंग्वेवरही ते ‘समाजवादी विचारांचे’ आणि म्हणून ‘कम्युनिस्टांना जवळचे’ असल्याचा शिक्का कधी ना कधी लागलेला आहे. अर्थात, मानवतेबद्दल साहित्यिकांना वाटणारे ममत्व आणि राजकीय डावेपणा यांची गल्लत या तिघांच्याही बाबतीत चुकीचीच ठरली. नेमके या तिघांचे साहित्य इस्माइल कादरे यांनी वयाची विशीही ओलांडली नसताना वाचले आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला, तोही त्या काळच्या सोव्हिएत रशियात! झाले असे की, अल्बानियातल्या काव्यस्पर्धेत १७ व्या वर्षी बक्षीस मिळवल्याने, इस्माइल यांना सोव्हिएत रशियाने शिष्यवृत्ती दिली. अल्बानियासारख्या भूमध्यसागरी, तत्कालीन कम्युनिस्ट देशांना आपल्या पंखाखाली घेण्याचा हा सोव्हिएत प्रकार. पण ‘जनवादी’- खरेतर कम्युनिस्ट किंवा रशियावादीच- साहित्यिक घडवू पाहणाऱ्या रशियन अभ्यासकाळात काफ्का, हेमिंग्वे वाचल्याने इस्माइल यांच्यासाठी नव्या खिडक्या उघडल्या.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : बेमुर्वतखोर वृत्ती चेचायलाच हवी!

‘महाकवी होमर आमचाच’ असा दावा नेहमी करणाऱ्या अल्बानियात लोकसाहित्याने ‘गोष्ट सांगण्या’ची जी मौखिक परंपरा टिकून होती, तिला इस्माइल यांनी आधुनिक कथनतंत्रात बसवले. पुस्तकांवर मायदेशातल्या कम्युनिस्ट राजवटीने बंदी घातली तेव्हा, अहंमन्य राजवटीला आपल्या कथा-कादंबऱ्यांतली टीका कळूच नये अशा प्रकारच्या साहित्यिक युक्त्या इस्माइल कादरे वापरू लागले. गतकाळ आणि वर्तमानाची सरमिसळ, पात्रांबद्दल संदिग्धता, थेट नैतिक भाष्य टाळूनही वाचकाला नीतिनिर्णय करता यावा अशी रचना, कथानक एकरेषीय वा सलग न ठेवता ते खंडित करणे अशा या क्लृप्त्या. त्यामुळे कादरे यांचे साहित्य ‘चटकन भिडत नाही’ अशी प्रतिक्रिया जरी अनेकपरींच्या वाचकांनी दिली असली तरी त्यांची १९९० पर्यंतची पुस्तके अशाच प्रकारची होती. ऐन कम्युनिस्ट राजवटीत अल्बानियात राहून अल्बानियन भाषेतच ते लिहित होते. प्रसंगी ‘यावर बंदी येणार’ हे ओळखून, वाइनच्या बाटल्यांत आपले लिखाण लपवून सीमापारच्या प्रकाशकांना धाडत होते. १९९० मध्ये पत्नी, दोन मुलींसह ५४ वर्षांचे इस्माइल कादरे फ्रान्सच्या आश्रयाला गेले, तेव्हाही इतकीच नाट्यमय गोपनीयता त्यांना पाळावी लागली होती. अशा इस्माइल कादरे यांचे निधन १ जुलै रोजी पॅरिसमध्ये झाले, त्यानंतर आपण काय गमावले याची मोजदाद इंग्रजी वाचनप्रेमींनीही सुरू केली. जर्मन, फ्रेंच आणि इटालियन भाषांतही अनेक पुस्तकांचे अनुवाद होऊनसुद्धा इंग्रजीत २००० नंतरच त्यांची पुस्तके अधिक आली. पहिलेवहिले ‘इंटरनॅशनल बुकर’ (अनुवादित इंग्रजी साहित्यासाठी) २००५ मध्ये कादरे यांना मिळाल्यावर इंग्रजीने त्यांची खरी दखल घेतली. पण तोवर ‘काफ्का आणि जॉर्ज ऑर्वेलचा उत्तराधिकारी’ म्हणून कादरे यांची ख्याती युरोपभर झालेली होती!

Story img Loader