ब्रिटिश विचारवंत आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड (१८६१-१९४७) लिहितो की प्लेटोनंतरची पाश्चात्त्य परंपरा म्हणजे प्लेटोला वाहिलेल्या तळटीपा. व्हाइटहेडच्या या विधानात समग्र पाश्चात्त्य परंपरेचा संकोच प्लेटोप्रणित चिद्वादी प्रवाहात झालेला दिसतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची अडीच हजार वर्षांची वाटचाल जणूकाही अखंडपणे वाहात येणारी महाकाय चिद्वादी नदीच. मात्र वास्तवात पाश्चात्त्य तत्त्वज्ञान बहुजिनसी, बहुप्रवाही आणि द्वंद्वात्मक आहे. त्यात खंडितपणा आणि चढउतार आहेत. त्यामुळे व्हाइटहेडचं विधान पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला प्रभुत्वशाली चिद्वादी दृष्टिकोन प्रतिबिंबित करणारं आहे असं म्हणता येईल. चिद्वादी प्रवाहाच्या दबदब्यामुळे, प्लेटोच्या विराट चिद्वादी सावलीत पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची वाटचाल झाली आहे असं चित्र निर्माण झालेलं दिसतं. पण प्लेटो, ऑगस्टिन, देकार्त, लायबनित्झ, हेगेल यांच्या चिद्वादापुढे भौतिकवादाचं कडवं आव्हान वेळोवेळी होतं. चिद्वादानं भौतिकवादाविषयी कधी समन्वयाची, तर कधी सामावून घेण्याची आणि कधी स्पष्टपणे द्वंद्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे चिद्वादाचा अपरिवर्तनीय दावा कालौघात परिवर्तित होताना दिसतो. परिणामी, चिद्वादाला स्वत:च स्वरूप बदलत नागमोडी वळणानं प्रवास करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लुई अल्थुसरच्या पद्धतीशास्त्रानुसार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा विचार केला तर ‘चिद्वाद विरुद्ध भौतिकवाद’ हे द्वंद्व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं मध्यवर्ती सूत्र राहिलं आहे. या द्वंद्वात्मक सूत्राच्या मदतीनं पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची उभी विभागणी करून विविध तत्त्वज्ञांची मांडणी करता येते. हे द्वंद्व समजून घेण्यासाठी इथं चिद्वादाची चर्चा करताना आपण पाहणार आहोत की चिद्वादांतर्गत वेगवेगळ्या छटा आहेत. तत्त्वज्ञ म्हणजे ‘एकाकी’ ज्ञाता/द्रष्टा हे लक्षण या छटांतला समान धागा म्हणता येईल.

चिद्वाद म्हणजे नेमकं काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर चिद्वाद म्हणजे भौतिक जगापेक्षा जगाविषयीच्या कल्पनेलाच प्राथमिकता आणि श्रेष्ठत्व देणारा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन किंवा मानसिक कल. जणूकाही कल्पना, विचार, चैतन्य इत्यादींचा आधार भौतिक जग नसून दिक्-कालातीत भौतिकतेतर स्वयंपूर्ण, स्वयंभू विश्व किंवा परतत्व असावं. उदाहरणार्थ प्लेटोला जर विचारलं की दिक्कालसापेक्ष ( spatio- temporal) सुंदर गोष्टी सत् असतात की सौंदर्याची कल्पना? प्लेटोनुसार सौंदर्याची कल्पना सत् आणि श्रेष्ठ आहे. सुंदर गोष्टी दिक्कालसापेक्ष असल्यानं त्या अपुऱ्या, क्षणभंगुर, नश्वर, सुखदु:खमिश्रित असतात. मात्र सौंदर्याची कल्पना दिक्कालातीत असल्यानं अॅब्सोल्यूट, निर्भेळ, परिपूर्ण, शाश्वत असते. त्यामुळे चिद्वादी प्लेटो भौतिक जगाच्या ‘गुहाजीवना’तल्या क्षणभंगुर सुंदर गोष्टींच्या मोहात पडणं अज्ञानाचं लक्षण ठरवून शाश्वत परिपूर्ण, अपरिवर्तनीय सौंदर्याच्या कल्पनेचं चिंतन श्रेयस्कर ठरवेल. रने देकार्त देखील res extensa ऐवजी res cogitans ला ज्ञानाचं आधारभूत तत्त्व मानतो.

मागच्या लेखांत नमूद केल्याप्रमाणं दैनंदिन जीवनातही ‘तत्त्वज्ञेतरांचा’ कल गतिशील भौतिकवादाऐवजी स्थितीशील चिद्वादाकडे असतो. गतिशील, विखुरलेल्या- अनेकदा अनाकलनीय वाटणाऱ्या भौतिक जगापेक्षा जगाविषयी तयार केलेली स्थितिशील कल्पना सोयीची वाटते. विशेषकरून भावविश्वात ‘wishful thinking’ आधारित चिद्वाद प्रकर्षानं जाणवतो. उदा.- समोरच्या हाडामासाच्या गतिशील व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीविषयीची कल्पना सोयीची, जवळची, सुरक्षित आणि त्यामुळे ‘खरी’ वाटते. ती हाडामासाची व्यक्ती आपल्या कल्पनेशी अनुरूप वाटत नसेल आणि आपण आपल्या कल्पनेला प्रश्नांकित न करता व्यक्तीलाच दुय्यम ठरवत असू तर आपणही चिद्वादी ठरतो.

चिद्वाद आणि आयडियलिझम्

खरंतर, चिद्वाद हा शब्द पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील आयडियलिझम् ( idealism) या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून मराठीत रूढ झाला आहे. मराठीतील चिद्वाद या जोडशब्दापैकी ‘चित्’ या शब्दात ‘बुद्धी’, ‘चैतन्य’, ‘प्रज्ञा’, ‘हृदय’, ‘मन’, ‘आत्मा’, ‘ब्रह्म’ इत्यादी अर्थछटा दडलेल्या आहेत. मात्र पाश्चात्त्य परंपरेतील आयडियलिझम् या शब्दाच्या मुळाशी ‘idein’ अर्थात ‘पाहणं’ हे ग्रीक क्रियापद आहे. चिद्वाद आणि आयडियलिझम् यांच्यातला समान धागा म्हणजे त्यांचा भौतिक जगाविषयी असणारा दुय्यमत्वाचा किंवा निहिलिस्टिक दृष्टिकोन.

प्लेटोच्या आणि ऑगस्टिनच्या आयडियलिझम् मधल्या ‘पाहण्याच्या’ कृतीचे विषय भौतिक जगातले नसून त्यापलकडली अमूर्त तत्त्वं अर्थात युनिव्हर्सल्स असतात. फ्रेंच क्रियापद ‘voir ’ आणि इंग्रजी क्रियापद ‘ see ’ यांचा अर्थ देखील ‘पाहणं’ असा होतो. त्यामुळे ‘दिव्यदृष्टी’ लाभलेल्यांना फ्रेंचमध्ये ‘voyant’, तर इंग्रजीत ‘seer’ म्हणतात. थोडक्यात, ‘idein’, ‘voir’, ‘see’ या क्रियापदांतल्या या अर्थछटा लक्षात घेतल्या तर आयडियलिझम्मध्ये अल्थुसर म्हणतो त्याप्रमाणे धार्मिकतेचे अवशेष शिल्लक दिसतात. मुळात आयडियलिझम्मधलं ‘पाहणं’ सर्वसाधारण पाहणं नसून बुद्धीच्या, मनाच्या, चित्ताच्या, आत्म्याच्या, हृदयाच्या चक्षूंनी अमूर्त गोष्टींना पाहणं असतं. त्यामुळे इथं शारीरिक डोळ्यांचा तसा संबंध नाही. उलट आयडियलिझम् प्रणीत पाहण्याच्या कृतीत शरीराची सक्रियता आणि गतिशीलता अडथळा निर्माण करते असं समजलं जातं. चित्त शांत ठेवून, डोळे बंद करून, शारीरिक हालचाल शून्यावर आणून, ‘निष्क्रिय’ होऊन ध्यान (मेडिटेशन) अवस्थेत आत्मदृष्टी जागृत होते आणि सत् जगाचा बोध होतो, असं आयडियलिझम् मध्ये गृहीत धरलं जातं. आयडियलिझम् मध्ये मौन धारण करण्याच्या कृतीला ज्ञानात्मक प्रक्रियेचं लक्षण समजलं जातं. डोळे बंद करून ध्यान लावून ज्ञानाचा शोध घेणाऱ्यांना काही चिद्वादी विचारप्रवाहांमध्ये mystic म्हणतात. मिस्टिक हा शब्द ‘ mein’ या ग्रीक क्रियापदापासून आलेला आहे; त्या क्रियापदाचा शब्दश: अर्थ ‘डोळे, ओठ बंद करणं’ असा होतो.

थिअरी ही संकल्पनादेखील मुळात आयडियलिझमशी संबंधित आहे. पुढल्या लेखात भौतिकवादाविषयी चर्चा करताना थिअरी आणि प्रॅक्सिस यांच्यातला गुंतागुंतीचा ऐतिहासिक संबंध अधोरेखित केला जाईल. उत्पत्तीशास्त्रानुसार ही संकल्पना ‘t heõrein’ या ग्रीक क्रियापदापासून आलेली आहे. याही क्रियापदाचा अर्थ ‘पाहणं’ असाच होतो, पण या मेडिटेटिव्ह पाहण्याचा विषय ‘ theon’ अर्थात ईश्वरी, दिव्य, अतीतत्व आहे.

थोडक्यात, आयडियलिझम् म्हणजे अशी तत्त्वपरंपरा जी ‘दृष्टी’ला (idein, theõrein) ज्ञानप्रक्रियेचं प्रमुख साधन समजते; जिचे विषय नामरूपात्मक जग नसून अमूर्त, अपरिवर्तनीय, शाश्वत तत्त्वांचं विश्व असतं. आयडियलिझम्मध्ये आत्मदृष्टीची सक्रियता शारीरिक इंद्रियांच्या निष्क्रियतेवर अवलंबून असते. सत् जगाचा बोध भौतिक जगाकडे पाठ फिरवून, डोळे मिटून आणि ओठ बंद ठेवून होतो. लक्षणीय गोष्ट म्हणजे आयडियलिझम्मधली ‘पाहण्याची’ प्रक्रिया एकाकी दिसते. चिद्वादी चौकटीत सत् जगाचा साक्षात्कार एकाकी द्रष्ट्या माणसाला होतो असं समजलं जातं. उदा.- मध्ययुगीन ख्रिास्ती परंपरेतील मोनॅस्टरीमध्ये निवास करणारे चिद्वादी तत्त्ववेत्ते एकाकी रीतीने सत् जगाचं चिंतन करत असत. मोनॅस्टरी आणि मंक शब्दाच्या मुळाशीदेखील ग्रीक शब्द मोनोस (monos) अर्थात एकाकी माणूस आहे. सतराव्या शतकातला फ्रेंच चिद्वादी विचारवंत रने देकार्तचा ‘cogito ergo sum’ (अर्थात ‘मी विचारशील आहे म्हणून मी आहे’) म्हणणारा तत्त्वज्ञदेखील ‘मी’ हा एकाकी ज्ञाता आहे.

थोडक्यात, आयडियलिझम् परंपरेतील तत्त्वज्ञ भौतिक जगातील लोकयात्रेला दुय्यमत्व देणारे, सामूहिक जीवनापासून लांब जगणारे, सार्वजनिक सत्यापेक्षा एकाकी माणसाच्या दिव्यदृष्टीला प्राथमिकता देणारे आणि शाश्वत, अनादी, अनंत, सत् जगाची ओढ असणारे ‘स्पेक्टेटर-फिलॉसफर’ किंवा ‘विचारशील वस्तू’ ( la chose pensante) ठरतात. प्लेटोचा स्पेक्टेटर-फिलॉसफर ‘त्या’ सत्, परिपूर्ण, शाश्वत जगाचं ध्यान करणं अधिक पसंत करतो. तो स्वखुशीनं फिलॉसफर-किंग होताना दिसत नाही. फारतर, तो त्याच्या सत् जगाच्या अंतिम ज्ञानाआधारे या असत् जगाला मार्ग दाखवू पाहणारा त्यागी, परलोकवादी मार्गदर्शक म्हणून समोर येतो.

इथवरच्या विवेचनात अधोरेखित केल्याप्रमाणं चिद्वादातील ‘दृष्टी’ ही आत्मिक, आध्यात्मिक, भावनिक, बौद्धिक आहे. चिद्वादी परंपरेअंतर्गत बुद्धिवाद, भावनावाद, अध्यात्मवाद, परलोकवाद सारख्या प्रवाहांचाही समावेश करता येईल. चिद्वादातल्या या विविध छटांमध्ये द्वंद्व आहे. उदाहरणार्थ, फ्रेंचमध्ये बुद्धिवादी चिद्वाद आणि भावनावादी चिद्वाद यांच्यातलं द्वंद्व प्रसिद्ध आहे. ब्लेझ पास्काल, रूसो आणि रोमॅण्टिक कवींनी बुद्धीपेक्षा हृदयाला प्राथमिकता दिली. पास्कल म्हणतो की हृदयाला स्वत:ची देखील बुद्धी असते जे ‘बुद्धीला’ ठाऊक नाही. पण चिद्वादांतल्या छटांमधला समान धागा म्हणजे त्या भौतिक वास्तवाला दुय्यम, नगण्य वा शून्य स्थान देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात आयडियलिझम् या संकल्पनेत अंतिम ज्ञानाचं साधन स्पर्श, गंध, चव नसून ‘दुरावा राखणारी सूक्ष्म दृष्टी’ आहे. भौतिकवादात मात्र चव, गंध, स्पर्श इत्यादी साधनांना अशुद्ध किंवा निषिद्ध न मानता प्राथमिकता दिली आहे.

थोडक्यात, चिद्वाद हा एकजिनसी सिद्धान्त नसून परंपरा आहे. या परंपरेतल्या अनेक छटांमध्ये एका टोकाला बुद्धिवादी चिद्वाद आहे ज्यामध्ये बुद्धीला स्वतंत्र सारतत्त्व (essence) समजून भौतिक जगाला दुय्यमत्व देण्यात आलं आहे, तर दुसऱ्या टोकाला परलोकवादी चिद्वाद- ज्यात भौतिक जगाला मिथ्या समजून फक्त काल्पनिक जगाला परिपूर्ण, सत्, शाश्वत, स्वयंभू समजण्यात आलं आहे. अल्थुसरच्या विश्लेषणानुसार भौतिक जगाशी फारकत घेणारे चिद्वादी विचारप्रवाह हे तत्त्वज्ञानपूर्व जगाचा धार्मिक आणि मिथकनिष्ठ वारसा जपताना दिसतात. त्यामुळे तत्त्वज्ञानातले बुद्धिवादी चिद्वादी आणि धर्मशास्त्रांतले आत्मिक चिद्वादी अनेकदा एकमेकांना पूरक ठरतात. परिणामी सत्तारूढ धार्मिक चिद्वाद्यांना तत्त्वज्ञानातल्या चिद्वादावर धार्मिक मुलामा चढवणं सोपं गेलं आहे. उदाहरणार्थ, प्लेटोच्या चिद्वादातली आत्मदृष्टी सेंट जिरोम, सेंट ऑगस्टिन सारख्या ख्रिास्ती चिद्वाद्यांना आयती मिळाली. ख्रिस्ती तत्त्ववेत्त्यांनी प्लेटोचा ढाचा जसाच्यातसा उचलून सुलभ आणि लोकप्रिय केल्यामुळे फ्रेडरिक नित्शे ‘बियॉण्ड गुड अॅण्ड एव्हिल’ या पुस्तकात, ख्रिस्तीधर्म हा एका प्रकारे गोरगरिबांचा प्लेटो आहे ‘ Christianity is a platonism for people ’असं लिहितो.

अर्थात, निखळ अपरिवर्तनीय असा चिद्वाद फक्त तात्त्विक पातळीवर आढळतो. कारण शरीर आहे तोपर्यंत प्रत्येक चिद्वादी अनिवार्यपणे काही प्रमाणात का असेना, भौतिकवादी ठरतो.
(लेखक फ्रेंच साहित्य-तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)