अखिल भारतीय रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशनची द्वैवार्षिक परिषद अहमदाबाद (गुजरात) येथे २६ डिसेंबर, १९७५ रोजी संपन्न झाली. तिचे उद्घाटक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्या परिषदेतील त्यांचे उद्घाटनपर भाषण रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दि रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ मासिकाच्या फेब्रुवारी, १९७६ च्या अंकात प्रकाशित झाले होते. पूर्वीच्या ‘इंडिपेंडंट इंडिया’ मुखपत्राचे हे वर्तमान रूप. तर्कतीर्थांनी हे भाषण इंग्रजीत सादर केले होते –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आज जगात लोकशाहीपुढे दडपशाहीचे संकट उभे आहे. अशा वेळी वैचारिक आदान-प्रदानही त्यास एक पर्याय ठरू शकतो. लोकशाही संकटात आल्यावर अंतर्गत दबाव, देखरेख नि हस्तक्षेप तिचे रक्षण करू शकतात. लोकशाही ही मूलत: लोकजागृती आणि लोकसंघटनेचे लोकशिक्षण आहे. १९३० च्या दरम्यान जर्मनीत राष्ट्रीय समाजवादी, जर्मन राष्ट्रवादी आणि साम्यवादी एकत्र आले. त्यांनी दडपशाहीला पर्याय उभा केला. रुसोचा दृष्टिकोन या संदर्भात लक्षात घ्यायला हवा. ‘व्यक्तीपेक्षा पक्षाच्या सार्वभौमिकतेत वा नियंत्रणात नाही म्हटले, तरी एकाधिकारशाहीपेक्षा कमी धोके राहतात. निरंतर स्वयंशिक्षणातून येणारी जागृती महत्त्वाची. स्वातंत्र्य ही शक्ती आहे. लोकशाहीत ती लोकप्रतिनिधींमध्ये असते. सत्ता ही शक्तीच असते. ती कोणत्या रूपात कोणास देते, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे.’ आजच्या आणीबाणीच्या काळात (१९७५) मूलभूत हक्कांचे संरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. संस्थात्मक रचना सुरक्षित राहणे लोकशाहीसाठी आवश्यक असते. सध्याच्या वातावरणात झुंडशाहीचा प्रत्यय येतो. निवडणुकीत समाजवादी आणि समृद्धीच्या घोषणा वेगळ्या. प्रत्यक्ष कारभार पद्धती महत्त्वाची. पक्षीय राजकारणात विवेक सुटतो. तत्त्वापेक्षा व्यवहारास महत्त्व येते. मूलभूत पुनर्रचनेकडे लक्ष हवे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी दाखविलेल्या नवमानवतावाद विचारांना घेऊनच समाज पुढे गेला, तर त्यात समाजहित आहे. त्यातच स्थैर्य व समृद्धी शक्य आहे.’’

स्वातंत्र्योत्तर भारतात १९७५ ते १९७७ च्या दरम्यानचे २१ महिने आणीबाणी होती. तिचे स्वरूप राजकीय होते. व्यक्तिस्वातंत्र्य संकोच व अभिव्यक्ती नियंत्रण या दोन गोष्टींमुळे तत्कालीन राजकीय जीवन ढवळून निघाले होते. अशा कालखंडात ६, ७ व ८ डिसेंबर १९७५ ला कराड येथे ५१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे संयोजक, स्वागताध्यक्ष, उद्घाटक काँग्रेस पक्ष समर्थक असल्याने (आणीबाणी समर्थक) या संमेलनाकडे व त्यातील भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक, ‘ज्ञानपीठ’ विजेते वि. स. खांडेकर उपस्थित होते. संमेलनात त्यांनी समग्र क्रांतीचे नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून प्रार्थना करण्याचे केलेले आवाहन सर्वांनी उभे राहून पाळले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सदर संमेलनाचे उद्घाटक म्हणून दिलेल्या तर्कतीर्थांच्या या भाषणाचे महत्त्व आहे.

प्रस्तुत भाषणात तर्कतीर्थांनी मराठी साहित्य संमेलने, वैशिष्ट्ये, अध्यक्षीय भाषणातील प्रमुख प्रश्न, साहित्य संमेलने आणि साहित्य व भाषासंबंध इ. गोष्टींचा ऊहापोह करून आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर केलेले पुढील विधान महत्त्वाचे ठरते. ते या भाषणात म्हणतात की, ‘‘साहित्यनिर्मितीला अत्यावश्यक असलेल्या मोकळ्या वातावरणाला सध्याच्या संशयास्पद परिस्थितीत धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे लेखनस्वातंत्र्यावरील निर्बंध होय.’’ या भाषणाच्या शेवटी हे निर्बंध नष्ट होऊन पूर्ववत लेखनस्वातंत्र्याचे निर्मळ आकाश निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त केला. आणीबाणीविषयीची तर्कतीर्थांची संयत भूमिका मवाळ मानली गेली होती, हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. ते भूषवीत असलेली पदे, सत्ताधारी काँग्रेस पक्ष व यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे स्नेही (परराष्ट्रमंत्री) या सर्व पार्श्वभूमीवरची संयतता लक्षात घेता येते.

तर्कतीर्थांची उपरोक्त दोन भाषणे इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या राजकीय आणीबाणीसंदर्भात जितकी प्रस्तुत होती, त्यातील विचार लक्षात घेता, ते आजही तितकेच प्रस्तुत आहेत. मुळात खरा साहित्यिक, बुद्धिजीवी, विचारवंत वर्ग सर्व काळात निरंकुश सत्ताधारी वर्गाच्या विरोधी असला पाहिजे, तरच स्वातंत्र्य सुरक्षित राहते. ते सुरक्षित ठेवणे ही विचारी बुद्धिवंतांची राजकीय व सामाजिक जबाबदारी असते.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com