कमला हॅरिस यांनी अखेर उपाध्यक्षपदासाठी टिम वॉल्झ यांची निवड करून तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. अमेरिकी व्यवस्थेत अधिकारांच्या उतरंडीमध्ये उपाध्यक्षांचे स्थान अध्यक्षांच्या नंतरचे असते. शिवाय तेथील कायदेमंडळात अधिक प्रभावी असलेल्या सेनेटचे सभापती म्हणूनही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षांना पार पाडावी लागते. राजकीय ध्रुवीकरणाच्या तेथील माहोलमध्ये १०० सदस्यीय सेनेटमध्ये सभापतींचे एक मतही निर्णायक ठरू शकते. तेव्हा या पदावरील व्यक्ती ही प्रसंगी अध्यक्षांपेक्षाही अधिक खमकी असावी लागते. अध्यक्षीय उमेदवाराकडून उपाध्यक्षपदासाठी किंवा ‘रनिंग मेट’ म्हणून होणारी निवड म्हणूनच लक्षवेधी ठरते. जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातील बहुतेकांचा पाठिंबा होता. त्यांनी अधिकृत उमेदवारीची वाट पाहात न बसता धडाक्यात काही निर्णय घेतले. सभा बोलावल्या आणि निधिसंकलनासाठी अत्यावश्यक ठरू शकेल असा बड्या साहसवित्त कंपनीचालकांचा पाठिंबाही मिळवला. अनेक जनमत चाचण्यांमध्ये हॅरिस यांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. बायडेन यांनी माघार घेतली म्हणून उमेदवारी मिळाली, हे वास्तव स्वकर्तृत्वाने पुसून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या करत आहेत. टिम वॉल्झ यांची निवड हा याचाच भाग ठरतो. या निवडीमागे चतुराई आहे. वॉल्झ हे गोरे, ग्रामीण भागातले आणि वयाने ज्येष्ठ नागरिक ठरतील असे. पण गेल्या दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गोरा, ग्रामीण, वृद्ध मतदार मोठ्या संख्येने ट्रम्प यांना मतदान करत आहे. तो आपल्याकडे वळवण्यासाठी असाच एखादा नेता आपल्या निकटवर्तुळात असावा, हे हॅरिसबाईंनी हेरले असावे.
टिम वॉल्झ हे मिनेसोटा राज्याचे गव्हर्नर आहेत. डेमोक्रॅटिक राज्याच्या गव्हर्नर समितीचे अध्यक्षपदही सध्या वॉल्झ यांच्याकडे आहे. मिनेसोटासारख्या पूर्वीच्या रिपब्लिकन प्रभाव असलेल्या राज्यामध्ये दुसऱ्यांदा ते गव्हर्नर म्हणून निवडून आले. तसेच या राज्यातील कायदेमंडळही त्यांच्या धडाडीमुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात आहे. कमला हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या आहेत, जेथे डेमोक्रॅटिक पक्षाचा उदारमतवादी मतदार सापडणे अजिबात अवघड नाही. त्या तुलनेत वॉल्झ यांच्यासारख्यांची कामगिरी अधिक लक्षवेधी ठरते, कारण पारंपरिक रिपब्लिकन राज्यात त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे स्थान भक्कम केले आहे. पेनसिल्वेनिया राज्याचे गव्हर्नर जॉश शापिरो यांची उपाध्यक्षपदासाठी निवड केली जाईल, असा होरा होता. परंतु शापिरो हे येहुदी आहेत आणि इस्रायलसमर्थकही. त्यांची निवड होती, तर मुस्लीम मतदारांचा रोष मोठ्या प्रमाणावर पत्करावा लागला असता. अशा प्रकारे पारंपरिक पाठीराख्यांना अंतर देणे या टप्प्यावर तरी परवडण्यासारखे नाही, असा अंदाज डेमोक्रॅटिक नेतृत्वाने बांधला आणि त्यात तथ्य आहे. शापिरोंच्या पेनसिल्वेनियातील मतदारांना चुचकारण्यासाठी कमला हॅरिस आणि टॉम वॉल्झ यांची पहिली संयुक्त सभा फिलाडेल्फियात घेतली. त्या सभेत वॉल्झ यांची मध्यमवर्गीय, ग्रामीण छबी मतदारांसमोर आणण्यात कमला हॅरिस यशस्वी ठरल्या.
हेही वाचा : विश्लेषण : उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांनी निवडले टिम वॉल्झ यांना… कोण हे वॉल्झ?
ते आवश्यक होते. कारण ट्रम्प आणि त्यांच्या आक्रस्ताळ्या रिपब्लिकन समर्थकांचा उल्लेख वियर्ड (विचित्र) असा सातत्याने करत त्यांना शिंगावर घेणे वॉल्झ यांनी आधीपासूनच सुरू केले आहे. वॉल्झ हे डेमोक्रॅटिक कंपूतले सर्वाधिक कडवे डावे अशी त्यांची छबी रिपब्लिकन पक्षातर्फे बनवली जात आहे. रो वि. वेड खटल्याद्वारे अमेरिकेतील महिलांना बहाल झालेला स्वेच्छा गर्भपाताचा अधिकार तेथील सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी काढून घेतल्यानंतर, तो फेरप्रस्थापित करणारे पहिले राज्य वॉल्झ यांच्या धडाडीमुळे मिनेसोटा ठरले होते. त्याचा आधार घेत, वॉल्झ यांच्यावर टीका करण्याची एकही संधी रिपब्लिकन नेतृत्व सोडणार नाही हे उघड आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि जेम्स व्हान्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस आणि टिम वॉल्झ हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. उपाध्यक्षांची निवड मतपेटीतून होत नाही. निर्वाचित अध्यक्षच त्याच्या किंवा तिच्या पसंतीच्या ‘रनिंग मेट’ला उपाध्यक्ष नेमतात. परंतु बायडेन-हॅरिस या बऱ्याचशा क्षीण जोडीपेक्षा कितीतरी अधिक आक्रमक, उत्साही हॅरिस-वॉल्झ जोडीमुळे अध्यक्षीय निवडणुकीत रंग भरले आहेत हे मात्र नक्की. तसेच, दोन्ही उपाध्यक्षपदाचे उमेदवार या निवडणुकीत नवखे असल्यामुळे खरी लढाई ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातच होणार, हेही स्पष्ट आहे.