अमेरिकी चित्रपट म्हणजे हॉलीवूडपट, या व्याख्येला तडा देणारे महत्त्वाचे दिग्दर्शक म्हणून डेव्हिड लिंच यांचे नाव घेतले जाई. त्यांना २०१९ मध्ये मिळालेल्या ‘कारकीर्द-गौरव ऑस्कर’ पुरस्काराने यावर शिक्कामोर्तबही केले. ‘इरेझरहेड’ (१९७७), ‘द एलिफंट मॅन’ (१९८०), ‘ब्लू व्हेल्व्हेट’ (१९८६), ‘मलहॉलंड ड्राइव्ह’ (२००१) आणि ‘इनलॅण्ड एम्पायर’ (२००६) हे त्यांच्या उण्यापुऱ्या दहा चित्रपटांपैकी गाजलेले चित्रपट… पण अर्थातच, आपल्याकडे इंग्रजी (अमेरिकी) चित्रपट हौसेने पाहणाऱ्या अनेकांना यापैकी एकही माहीत नसेल! पण कलात्मक गुणवत्ता ही तुम्ही किती लोकांना माहीत आहात, किंवा तुमच्या कलाकृती सगळ्यांना ‘समजतात’ की नाही यावर अवलंबून नसते, याचे उदाहरण म्हणून डेव्हिड लिंच यांचा आदरपूर्वक उल्लेख यापुढेही करावाच लागेल. ते मूळचे चित्रकार. दृश्य आणि न दिसणारा आशय यांच्या मधला प्रदेश ते चित्रांमधून धुंडाळून पाहायचे. त्यासाठी आकृतींची मोडतोड करायचे… कल्पनेपल्याडचे, वास्तवाच्या पुढले काहीतरी या चित्रांतून दिसायचे. मग हीच ‘सर्रिअॅलिस्ट’ शैली त्यांच्या चित्रपटांतही उतरली!
चित्रपटांना कथा हवी, हे पथ्य त्यांनी पाळले खरे; पण ही कथा सरधोपटपणे सांगायची नाही- उलट प्रेक्षकांना प्रत्येक दृश्यचौकटीत गुंतवून ठेवून कथेची मांडणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची, हा बाणाही त्यांनी जपला. यातून ‘मलहॉलंड ड्राइव्ह’सारखा एकमेवाद्वितीय चित्रपट तयार झाला. खून, खुनाचा तपास, गूढ अर्धमानवी पात्रे, दु:स्वप्ने या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर हॉलीवूडमधला ‘संघर्ष’ असे एकाच वेळी अनेक गोष्टी सांगणारे कथानक असणाऱ्या या चित्रपटाला कान महोत्सवात विभागून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सुवर्णमाड (पाम डि’ऑर) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे ‘ऑस्कर’ असे मान मिळाले. वर्षभरात या चित्रपटाची ‘डीव्हीडी’ घराघरांत पोहोचण्यासाठी बाजारात आली, तेव्हा नेहमीचे चित्रपटच पाहण्याची सवय असलेल्या घरगुती प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी- त्यांना तो भिडवण्यासाठी लिंच यांनी ‘या चित्रपटामधील कोणकोणत्या दहा दृश्यांकडे लक्ष द्यावे?’ अशी प्रश्नावलीच बनवून प्रत्येक डीव्हीडीसह दिली. जणू एखाद्या कोड्याची उकल करावी, त्याप्रमाणे लोकांनी हा चित्रपट पाहिला! समीक्षकांना लिंच यांच्याबद्दल आदर आणि ममत्व असणे साहजिकच. गेल्या चारपाच दिवसांत लिंच यांच्याबद्दल काही समीक्षकांचे जे आदरांजली-लेख प्रसिद्ध होताहेत, त्यांत ‘हे दृश्य आजही आठवते’ यासारखी दाद आहेच आणि ‘लिंचियन शैली’ असा उल्लेखही अनेकांनी केला आहे.
हेही वाचा : लोकमानस : होय- ‘महाराष्ट्र थंड गोळा आहे’!
ही लिंचियन शैली म्हणजे लिंच यांची स्वत:ची दृश्यभाषा. ती केवळ चित्रकलेतून आलेली नव्हती. पूर्ण लांबीचे कथापट जरी कमीच केले तरी त्याहून दुपटीने अति-प्रायोगिक लघुपटही लिंच यांनी केले, एवढेच कारणही त्या शैलीच्या घडण्यामागे नव्हते… या शैलीमागे लिंच यांची ‘साधना’सुद्धा होती. लिंच हे महेश योगी यांचे शिष्य. अमेरिकेत महेश योगींनी ज्या ‘ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन’ या साधनेचा प्रसार केला, तिचे लिंच हे पाईक. भारतात महेश योगींचे वास्तव्य जिथेजिथे होते तिथेतिथे जाऊन ‘इट्स अ ब्यूटिफुल वर्ल्ड’ हा लघुपट लिंच यांनी केलाच, पण महेश योगींच्या निधनानंतर ‘डेव्हिड लिंच फाउंडेशन’तर्फे या साधनेचा प्रसारही त्यांनी केला. चित्रपट आणि चित्रांकडे ‘तुम्ही आम्हाला काय ते वाढून द्या’ अशा अपेक्षेने न पाहणे, हीच लिंच यांना आदरांजली ठरेल.
© The Indian Express (P) Ltd