अच्युत कानविंदे, चार्ल्स कोरिआ, बाळकृष्ण दोशी आणि आता ख्रिास्तोफर बेनिन्जर. भारतीय आधुनिक वास्तुरचना कलेचे हे चार अध्वर्यू देशभर भरपूर वास्तु-खुणा सोडून आता दिवंगत झाले आहेत. बेनिन्जर हे यापैकी तिघा भारतीयांच्या नंतरचे, १९४२ साली अमेरिकेत जन्मलेले आणि वयाच्या तिशीपर्यंत त्या देशातच वाढलेले. पण १९७२ मध्ये ते अहमदाबादेत आले, तिथे दोशींसह त्यांनी कामही केले आणि भारतात ते रुळू लागले. १९७६ मध्ये अनिता गोखले यांच्या साथीने पुण्यात त्यांनी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज ॲण्ड ॲक्टिव्हिटीज’ (सीडीएसए) या संस्थेची स्थापना केल्यानंतर तर इथलेच झाले. २ ऑक्टोबरला त्यांची निधनवार्ताही ‘भारतीय वास्तुरचनाकार बेनिन्जर’ अशा उल्लेखाने आली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : विमला पाटील

बेनिन्जर सुमारे ५५ वर्षे वास्तुरचनाकार- नगररचनाकार म्हणून व्यवसायात होते. ८१ वर्षांच्या आयुष्यातली त्याआधीची वर्षे जरी शिकण्यात गेली तरी, पंचविशी गाठण्याआधीच ‘अमेरिकन गोरेपणा’पासून त्यांनी फारकत घेतली होती. अमेरिकेत १९६० च्या दशकात जी सामाजिक घुसळण झाली, तिचे केवळ मूक साक्षीदार न राहता ते आपल्या परीने कार्यकर्तेगिरीही करत होते. सार्वजनिक जागी गोरे आणि काळे यांच्यासाठी स्वतंत्र दारे, स्वतंत्र आसनव्यवस्था आदी जाचक अमेरिकी कायदे संपुष्टात आल्यानंतर हा भेद सुरूच होता, तेव्हा तो मोडण्यासाठी मुद्दाम कृष्णवर्णीय मित्रमंडळींसह बेनिन्जर सिनेमागृहे आदी ठिकाणी जात. हे कार्यकर्तेपण फार टिकले नाही; पण त्यामागची समतावादी, मानवतावादी दृष्टी अगदी अखेरपर्यंत टिकली. किंबहुना, अमुकच प्रकारच्या साधनांनी (दगड, काँक्रीट व खडी) इमारतींचे अभिकल्प करण्याचा ‘शैली’वादी अट्टहास त्यांच्या कामात दिसत नाही तोही या मानवतावादामुळेच. ‘जिथे इमारत आहे, त्यापासून १०० कि.मी. परिघातल्या बांधकाम साहित्याचा वापर अधिक करा’ असे त्यांचे तत्त्व होते.

हार्वर्डची वास्तुरचना पदवी आणि ‘एमआयटी’ (मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून नगररचनेची पदव्युत्तर पदवी या बळावर त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय कामे मिळू शकत होती, पण जागतिक बँकेने विकसनशील देशांसाठी आखलेले प्रकल्प, इंडोनेशियातील प्रकल्प यांनाच त्यांनी प्राधान्य दिले. भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांत त्यांच्या ‘सीसीबीए’ (ख्रिास्टोफर चार्ल्स बेनिन्जर आर्किटेक्ट्स) या संस्थेने कामे केली असली तरी, सर्वाधिक कामे महाराष्ट्रात- त्यातही पुणे परिसरात आहेत आणि त्याखालोखाल क्रमांक लागेल तो भूतानचा. थिम्फू या भुतानी राजधानीतही ‘सीसीबीए’ने शाखा थाटली ती त्यांच्या वाढत्या कामांमुळे. पुरस्कार त्यांना वेळोवेळी मिळाले होतेच, पण मुळशीच्या महिन्द्र यूडब्ल्यूसी शैक्षणिक संस्थेच्या अभिकल्पासाठी त्यांना सर्वोच्च भारतीय व अमेरिकी पुरस्कार मिळाले, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सने फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांना ‘बाबुराव म्हात्रे सुवर्णपदक’ हा कारकीर्द-गौर समजला जाणारा सन्मानही मिळाला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी ‘लेटर्स टु अ यंग आर्किटेक्ट’ (प्रथमावृत्ती २०११) हे आजही एखाद्या पाठ्यपुस्तकाइतकेच ‘आवश्यक वाचन’ मानले जाते.