बड्या उद्योजकांच्या जिवंतपणीच त्यांची यशोगाथा सांगणारी चरित्रे प्रकाशित होत असतात, नाहीच झाली तर काही उद्योजक आत्मचरित्र लिहितात, पण उद्योजकांवर टीका करणारी पुस्तके फार कमी… हॅमिश मॅक्डोनाल्ड यांनी एका भारतीय उद्योजकावर अशा प्रकारे पुस्तक लिहिले होते त्याचे पुढे काय झाले हे अनेकांना माहीत असेलच. अशा वातावरणात, थेट बिल गेट्सचे टीकाचरित्र लिहिण्याचे धाडस अमेरिकी पत्रकार अनुप्रीता दास यांनी केले आहे. ‘बिल्यनेअर, नर्ड, सेव्हिअर, किंग… द हिडन ट्रुथ अबाउट बिल गेट्स’ हे ते पुस्तक, गेल्या तीन दिवसांत जगभरातल्या इंग्रजी-भाषक देशांमध्ये चर्चेत आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: त्सुंग दाओ ली
बिल गेट्स यांचा कार्यालयीन बैठकांतला रुबाब हा जणू आपण राजे आणि हा आपला दरबार असा असतो, असा दावा काही सहकाऱ्यांशी बोलून, त्यांच्याकडून त्या संदर्भात तपशीलही घेऊन लेखिकेने केला आहे. मात्र, विद्यार्थिदशेतल्या या ‘नर्ड’बद्दल वेल्हाळपणे लिहिण्याची दानतही या पुस्तकात दिसते. अनुप्रीता दास या न्यू यॉर्क टाइम्समध्ये वित्तविषयक संपादक होत्या, त्याआधी वॉल स्ट्रीट जर्नलमध्येही त्यांनी काम केले. मे २०२१ मध्ये गेट्स यांच्या वित्त सल्लागारावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला आणि त्यातूनही तो सल्लागार सहीसलामत राहिला, तेव्हा गेट्स नक्की आहेत कसे? त्यांना यश का मिळते यापेक्षाही माणूस म्हणून ते कसे आहेत हे महत्त्वाचे ठरणार की नाही? – यासारखे प्रश्न लेखिकेला पडले. अशा प्रकारच्या पुस्तकांवर सनसनाटीपणाचे आरोप होतात, हे लक्षात घेऊन शक्य तिथे आधार देणे आणि गेट्स यांच्या आस्थापनांकडून त्यांची बाजूही ऐकून घेणे हे पथ्य या पुस्तकात पाळले गेले आहे.