आडनावासह बिलकूल परिचित नसलेल्या या नावाने या रविवारी (भारतीय वेळेनुसार हॉटस्टारवर सोहळा पाहणाऱ्यांसाठी सोमवारी सकाळी) अमेरिकेत इतिहास घडविला, हे ‘तोंडदेखले’ अथवा ‘लेखदेखले’ वाक्य नाही. तिचा सर्वाधिक म्हणजे पस्तिसावा ‘ग्रॅमी’ मिळविण्याचा विक्रम या दिवशी साजरा झालाच, पण ‘काऊबॉय कार्टर’ या तिच्या आठव्या अल्बमला ‘अल्बम ऑफ द इयर’ हा परमोच्च पुरस्कार मिळाला. गोऱ्यांची बहुसंख्या असलेल्या ‘कण्ट्री म्युझिक’ या प्रकारासाठी पारितोषिक मिळविणारी ती पहिली कृष्णवंशीय गायिका ठरली. २००८ ते २०२२ या कालावधीत तिने पुरस्कार पुष्कळ पटकावले. पण या सन्मानासाठी मानांकनावरच समाधान मानावे लागले होते. तो आता तिला प्राप्त झाला आहे. आदल्याच दिवशी तिने ‘काऊबॉय कार्टर’च्या प्रसिद्धी पर्यटनाचे बेत आखले होते. आता ग्रॅमीमुळे त्याची महत्ता अधिक राहणार. ग्रॅमीरात्रीच्या नंतर दोन दिवसांत ‘स्पॉटिफाय’वरून जगभरात ७९५ टक्के या अल्बममधीलच गाणी ऐकली जात आहेत. ग्रॅमी भपकेबाज कपड्यांतल्या गानललना व तानश्रीयुतांचा सोहळा म्हणून गाजतो.

यंदा तसा गाण्यातल्या कान नसणाऱ्यांनाही तो बियांका सेन्सोरीच्या वैशिष्ट्यपूर्ण पोशाखक्लिपा आणि आरपारदर्शक अजब वस्त्रांच्या रिल्सत्राटकाद्वारे कळला. पण त्यापलीकडे बियॉन्सेचे यश, सात नामांकनात शून्य पुरस्कार पटकावणाऱ्या बिली आयलिश हिचे अपयश यांच्या चर्चांवर तो स्थिरावला. ‘म्युझिक व्हिडीओ’ व पॉप संगीताच्या जगतात नव्वदीच्या अखेरची वर्षे ‘किती आयले, किती गयेले’ कलाकारांची होती. त्यात ‘डेस्टिनीज चाइल्ड’ या रंगांनी तिळ्या गायिकांच्या बॅण्डमधील बियॉन्से ही एक गायिका. सलून मालक असलेल्या आईच्या पोटी जन्मलेल्या बियॉन्सेची जडणघडण उच्चभ्रू कृष्णवंशीय अमेरिकी. नृत्यांगना बनण्याच्या उत्साहात तिथल्या प्रशिक्षण वर्गातील शिक्षकाने हिला गाताना ऐकले. हिच्या गाण्यातील तीव्र पट्टीची ओळख घडवून दिल्याने पुढे रितसर गाण्याचे शिक्षण ते ‘डेस्टिनीज चाइल्ड’पर्यंतचा प्रवास सुकर झाला. ‘बॅण्ड्स’च्या कुंभमेळासदृश गर्दीतून तिला ओळख मिळाली ते २००३ साली स्वतंत्र अल्बममुळे. पुढे ‘ड्रीमगर्ल्स’, ‘कॅडलिक रेकॉर्ड्स’, ‘ब्लॅक इज किंग’ आदी सिनेमांत नायिका म्हणूनदेखील तिचे दर्शन घडले. त्यानंत हा काळा ‘दिवा’ अधिक तळपत राहिला.

वीस कोटी इतकी अबब वाटणारी अधिकृत अल्बमविक्री असलेल्या या गायिकेची ऐकावीच अशी दहा गाणी गूगल व्हिडीओसह अनेक संकेतस्थळे सुचवतील. पण ‘ब्राऊन स्कीन गर्ल’ हे तिने दोन अन्य कलाकारांसह गायलेले गीत (व्हिडीओसह) ऐकावे आणि डोक्यात मुरवावे असे. गेल्या मार्चमध्ये ‘काऊबॉय कार्टर’ अल्बम आला. त्यानंतर त्याचा प्रकार ‘कण्ट्री म्युझिक’ नसल्याची झोड गोऱ्या टीकाकारांनी उठविली. बेंजोलिन-व्हायोलिन-गिटार आदी वाद्यांसह वाजविल्या जाणाऱ्या ‘काऊबॉय’ संगीताची म्हणजेच कण्ट्री म्युझिकची कर्मभूमी ही ह्युस्टन, टेक्सास. तिथलाच जन्म असलेल्या बियॉन्सेच्या संगीतात (ब्लूज, आर अॅण्ड बी) या प्रकाराचीही बिजे आहेतच. ‘काऊबॉय कार्टर’मध्ये ती अधिक स्पष्ट झाली. करोनानंतर ‘रेनेसान्स’ (२०२२) हा तिचा अल्बम आला, त्याच वेळी तिच्या ‘संगीतत्रयी’ प्रकल्पाचा बोलबाला झाला होता. अमेरिकेत संगीताचा दबदबा निर्माण करणाऱ्या आरंभिक कृष्णवंशीय कलाकारांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या तीन अल्बम्सचा खटाटोप. त्यातील दुसरा अल्बम ‘काऊबॉय कार्टर’. यासाठी ग्रॅमी मिळाला तेव्हा लिंडा मार्टेल या साठच्या दशकात ‘कण्ट्री म्यूझिक’ गाणाऱ्या पहिल्या काळ्या कलावंतिणीला बियॉन्सेने पुरस्कार अर्पण केला. या मालिकेतील पुढचा अल्बमही विक्रमी ठरेल. तोवर ‘काऊबॉय कार्टर’मधील ‘टेक्सास होल्डेम’ गाणे अनंत वेळा ऐकता येईल.

Story img Loader