एकीकडे चित्रपटाच्या पडद्यावर देखण्या नायकनायिकांच्या गुलाबी प्रेमकहाण्या बहरू लागल्या होत्या आणि दूरदर्शन मात्र अमिताभ बच्चनचेच जुने चित्रपट दाखवत होतं. खासगी आणि सरकारीमधल्या या भेदाची सीमारेषा स्लोअर शहाणेला लगेच कळली नाही. त्यामुळे त्यानं मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं ही कधी तरी करायची चैन समजून दूरदर्शनच्या ‘सरकारी’पणावर भाबडा विश्वास ठेवून बच्चनला मनोमन पुजलं होतं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्लोअर शहाणेला भेटलेला कार्यकर्ता एनई-११८ या चारचाकी गाडीतून निघून गेल्यावर त्यानं रोजदिनीत ‘शोध स्वत:चा… समाजाचा’ या शिबिराच्या नावाबाबत जी नोंद केली होती, ती बरीचशी अॅकॅडेमिक होती. ‘शिबिराच्या नावातील ‘शोध समाजाचा’ हे शब्द वाचताना ‘शोध समजेचा’ असे वाचले, त्याला आता भूतकाळ म्हणावे का? का तो वर्तमानकाळ आहे? का भविष्य?’ अशी ती नोंद. पण, ‘तो’ कार्यकर्ता एनई-११८ मधून जाताना स्लोअरला जे वाटलं होतं, त्याचीच ही नेमकी नोंद होती असं मात्र म्हणता येणार नाही. मग तरी अशी नोंद त्यानं का केली असावी? या प्रश्नावर स्लोअरनं मनातल्या मनात दिलेलं उत्तर फार रोचक होतं. स्लोअरचं उत्तर होतं, की अशा नोंदी त्या नोंदवहीचं (स्लोअरच्या लेखी : रोजदिनीचं) वैचारिक मूल्य वाढवतात. तुमची लिखित विधानं एखाद्या ‘इझम’सारखी भासू लागतात आणि पुढे जाऊन त्यावर शोधनिबंध वगैरे लिहिले जाऊन, हे असं लिहिणाऱ्याला ‘सामाजिक शाबासकी’ मिळवणं सोपं जाऊ शकतं! कार्यकर्ता एनई-११८ मधून पंचतारांकित हॉटेलात जाऊन ‘हेच’ मिळवत असेल, तर आपण त्याबद्दल अशी नोंद करून, ‘तेच’ का साध्य करू नये, असं स्लोअरला वाटणं अस्वाभाविक नव्हतंच. पण, ते तितकंसं साहजिकही नव्हतं. म्हणूनच स्लोअरच्या या रोचक उत्तरापेक्षाही कार्यकर्त्याला चारचाकीतून जाताना पाहून स्लोअरला काय वाटलं हे अधिक महत्त्वाचं होतं. ‘कार्यकर्ता एनई-११८ मधून जाताना पाहून स्लोअरला आपल्या वन-सीटर लुनाकडे पाहून फार वैषम्य वाटलं होतं!’

हे असं वाटणं हीच आपल्या मध्यमवर्गीय असण्याची सच्ची खूण आहे आणि ती जिवंत आहे, यानं स्लोअर शहाणे मनातल्या मनात ‘हुश्श’ झाला होता. कारण, रूढार्थानं ‘इझम’ वगैरे मानलं जाईल, असं काही आपण लिहू शकू, असं काही स्लोअर शहाणेला कधी वाटलं नव्हतं किंवा त्याचा स्वत:बाबत तसा काही गैरसमजही नव्हता. मध्यमवर्गीय असण्यातल्या ‘एस्केपिझम’मधला ‘रोमँटिसिझम’ त्याला कायमच भावत होता. किंबहुना, हेच दोन ‘इझम’ नव्वदच्या दशकातील त्याच्या ‘तरुण’ जगण्याला त्याच्याही नकळत आकार देत होते. पुढे स्वत:च्या पंचविसाव्या वाढदिवशी स्वत:लाच लिहिलेल्या पत्रात त्यानं, ‘बी द कोलंबस ऑफ युअर सोल’ हे वाक्य स्वत:लाच उद्देशून लिहून, हे दोन्ही ‘इझम’ प्रच्छन्नपणे कवटाळले वगैरेही होते. पण, ते नंतर. आत्ता विशीत शिरत असताना ते त्याच्या नकळत घडत होतं. तर असा हा स्लोअर शहाणे रोजदिनीत वैचारिक वगैरे लिहून, पण वास्तवात पळपुटेपणाचं व्यवच्छेदक लक्षण सांभाळून आयुष्याच्या एकेका पायरीवर सावधपणे पावलं टाकत होता. यातून त्याच्या मनात गुंते निर्माण होत नव्हते असं नाही. लिहिलं जाणारं आणि जगलं जाणारं यात असलेली तफावत त्याच्या मनात द्वंद्व निर्माण करायचीच. मग, त्यातून सुटकेसाठी त्यानं आधार घेतला स्वप्नांचा. स्लोअर खूप स्वप्नाळू होता. शिवाय, पुस्तकं वाचताना, चित्रपट पाहताना त्यातलं पात्र ‘आपलं’सं करणं त्याला चांगलं जमायचं. ‘एस्केपिझम’ अंगी बाणविण्यासाठी कल्पनाविलासात पारंगत व्हावं लागतं, हे स्लोअरनं चांगलंच जाणलं होतं आणि त्यानुसार ते आत्मसातही केलं होतं. सगळ्या स्वप्नांत त्याचं आवडतं स्वप्नं कोणतं असेल, तर ‘स्वप्न प्रत्यक्षात आल्याचं स्वप्न.’ स्लोअर तरुण असण्याच्या नव्वदच्या दशकातल्या परिस्थितीनं स्लोअरसारख्यांना हे स्वप्नं फार आत्मीयतेनं दाखवलं होतं. वस्तुस्थिती विपरीत असेल, तर स्वप्नं खूप चांगली पडतात, हे त्यानं ताडलं होतं. भेदाभेद, दंगल, भ्रष्टाचार, गरिबी असे नव्वदच्या दशकातले भाबडे शब्द जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण अशा ‘रोकड्या’ संज्ञांच्या वर्खात गुंडाळण्याचा तो स्वप्निल काळ होता.

याच ‘स्वप्निल’ काळात एकीकडे चित्रपटाच्या पडद्यावर देखण्या नायक-नायिकांच्या गुलाबी प्रेमकहाण्या बहरू लागल्या होत्या आणि दूरदर्शन मात्र अमिताभ बच्चनचेच जुने चित्रपट दाखवत होतं. खासगी आणि सरकारीमधल्या या भेदाची सीमारेषा स्लोअरला लगेच कळली नाही. त्यामुळे त्यानं मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं ही कधी तरी करायची चैन समजून दूरदर्शनच्या ‘सरकारी’पणावर भाबडा विश्वास ठेवून बच्चनला मनोमन पूजलं होतं. त्या वेळी त्याचं घर होतं, इतर बऱ्याच जणांसारखं सुमारे २६९ वगैरे चौरस फुटांचं. तेवढ्याशा जागेत तीन खोल्या काढलेलं. भाड्याचं. प्रत्येक खोली नऊ आडव्या आणि नऊ उभ्या फरशा मोजल्यावर संपायची. जिनाही नऊ पायऱ्यांचा; दीड फूट उंचीची एक पायरी. सर्व संख्या विषम! ‘शीतोष्ण सुखदु:खेषु सम:संङ्गविवर्जित:।’ या गीतेतल्या वचनाची शपथ घेऊन सांगायचं, तर या सर्व विषमतेतला समान धागा होता बच्चन. त्याची प्रत्येक गोष्ट स्लोअरला त्याची वाटायची. म्हणजे, बच्चनच्या सिनेमातल्या गोष्टी तो आपल्या आयुष्यातल्या प्रसंगांशी जोडून स्वत:ला बच्चन समजण्याचं स्वप्न पूर्ण करायचा. त्याच वेळचा एक किस्सा. एकदा काय झालं, की स्लोअरची आई त्याला खूप रागावली. कारण खूप मोठं नव्हतं; पण तीही मध्यमवर्गीय असल्यानं प्रश्न तत्त्वाचा वगैरे होता. त्यामुळे तिनं स्लोअरची बाजू समजूनच घेतली नाही. मुलांना रागावू नका, समजून घ्या वगैरे सांगणारे मानसोपचारतज्ज्ञ मध्यमवर्गात तेव्हा ‘फेमस’ झालेले नव्हते! आपल्याला विनाकारण बोलणी खायला लागली, असा समज करून घेऊन त्याचा राग स्लोअरनं डोक्यात घालून घेतला आणि त्या दिवशी स्लोअर कॉलेजमधून घरीच गेला नाही. भटकत राहिला घराजवळच्याच रस्त्यांवर घाबराघुबरा होऊन. पण, त्यानं रोजदिनीत नोंद केल्याप्रमाणं, ‘तो भटकत राहिला शहरातल्या रस्त्यांवर ‘शहेनशहा’सारखा!’

रात्र दाटून काळी झाली, तेव्हा स्लोअरच्या आईला काळजी वाटली. ज्या वन-सीटर लुनावर स्लोअर फिरायचा, ती त्याच्या आईची होती. स्लोअर त्या दिवशी बसनं कॉलेजला गेला असल्यानं त्याची आई पदर खोचून तिच्या या लुनावर स्वार होऊन स्लोअरला शोधायला घराबाहेर पडली. स्लोअरवर आपण ‘चांगलेच’ मध्यमवर्गीय संस्कार केलेले असल्यानं त्यानं बंड केल्याचं दाखवून घरी येण्याचं कितीही टाळलं असलं, तरी तो घरापासच्याच रस्त्यांवर घुटमळत आपली लुना कधी दिसते हे शोधत असणार, हे आईला पक्कं माहीत होतं. तसंच झालं आणि घराजवळच्याच एका गल्लीत स्लोअर ‘सापडला’! पण, वस्तुस्थिती अशी असूनही स्लोअरनं या प्रसंगाचा अँटीक्लायमॅक्स रोजदिनीत नोंदवताना लिहिलं, ‘आईला न सांगता आपण असे भटकतोय, हे काही बरोबर नाही, यामुळे ओशाळायला होऊन मला शरमेनं गाठलं, तेव्हा मला आई ‘दीवार’मधल्या निरुपा रॉयच्या रूपात आठवली. त्यात त्या निरुपा रॉयचं – चित्रपटाच्या शेवटी शेवटी शशी कपूर बच्चनला पकडायला जाताना, शशीला त्याची पिस्तूल देऊन झाल्यावरचं वाक्य; ‘एक औरत अपना फर्ज़ निभा चुकी; अब एक माँ अपने बेटे को मिलने जा रही है।’ पोटात कळवळलं. ‘दीवार’मधल्या विजयसारखीच जिवाची तडफड झाली आणि घरी पोचलो…’

नेमक्या याच काळात कधी तरी एका व्याख्यानमालेत स्लोअर शहाणेनं ‘आत्मचरित्रं किती वास्तवदर्शी असतात’ या विषयावरचा परिसंवाद ऐकला. प्रत्येक लेखक अगदी पोटतिडकीनं आपलं कथानक किती प्रामाणिक आहे, हे पटवून देत होता. कार्यकर्त्याचा प्रसंग आयुष्यात नुकताच घडून गेलेला असल्यानं स्लोअर या वेळी सावध होता. इकडे कॉलेजात राज्यशास्त्र शिकताना काही मूलभूत ‘इझम’ शिकवून झाल्यावर ‘कॅपिटॅलिझम’ शिकवायला सुरुवात झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर मग स्लोअरनं आत्मचरित्रावरच्या परिसंवादाबाबत रोजदिनीत एक रोचक अॅकॅडेमिक नोंद केली. त्यानं लिहिलं, ‘जागतिकीकरणामुळे जगण्याचा भाग बनलेल्या काही भांडवलशाही अपरिवर्तनीय गोष्टी नवसमाजवादानं स्वीकारल्या, तरच पुढील काळात आत्मचरित्रं अपरिवर्तनीय राहतील.’ हे लिहिल्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉलेजात सरांनी स्लोअरला भांडवलशाहीची व्याख्या विचारली. रोजदिनी लिहिण्याच्या नादात काहीच अभ्यास झालेला नसल्यानं स्लोअरनं उत्तर दिलं, ‘एखाद्या गोष्टीचं भांडवल करून जगणं म्हणजे भांडवलशाही!’

स्लोअरला एकदम नवा ‘इझम’ शोधल्याचा साक्षात्कार झाला…

siddharth.kelkar @expressindia.com