‘बिन्डोक मुलालासुद्धा

डावे कळते, उजवे कळते

कळ्ळत नाही, अधले मधले’

अनंत भावे यांच्या कवितेतल्या याच शब्दांची आठवण होण्याचे प्रसंग गेल्या काही वर्षांत अनेकदा येत राहिले. पुढेही येतील कदाचित… पण तेव्हा भावे सर ‘उगाच गेले’ असेही वाटत राहील. लोकांमधल्या लेखकाचे ‘उगाचपणा’ कसा पांघरला पाहिजे, जणू ‘उगाच आपलं, तुम्ही वाचताच आहात म्हणून लिहितोय…’ अशा अनाग्रही आविर्भावात वाचकांशी संधान बांधून, वाचकालाही विचार करायला कसे लावले पाहिजे, याचे कित्येक धडे भावे यांच्या लिखाणातून मिळत राहतील. लहान मुलांनाही विचार करायला मजा येते, हे विंदाइतकेच ओळखणाऱ्या बालकविता भावे यांनी लिहिल्या आहेत. विंदा करंदीकर हे त्यांचे इंग्रजीचे शिक्षक. कविता ऐकल्यावर ती अधिक भिडते, ही करंदीकरांनी सोडून दिलेली जाणीव भावे यांनी मात्र जपली. या बालकाव्य-सेवेचा गौरव २०१३ च्या ‘साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारा’ने झाला.

‘माणूस’ साप्ताहिकातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली, पण ते लेखन अगदी अधूनमधून होत राहिले. त्यातले बरेचसे लेखन नाव न घेताही झालेले आहे. तरीही ‘माणूस’चा मोठाच संस्कार त्यांच्यावर झाला असणार. ‘माणूस’च्या फेब्रुवारी १९७२ च्या (१२ आणि १९ फेब्रुवारी अशा दोन्ही) अंकांत ज्यूल्स आर्चर यांच्या ‘द डेझर्ट फॉक्स’चा अनुवाद केल्यावरही, ‘निवेदन- अनंत भावे’ इतकेच श्रेय त्यांनी घेतल्याचे आढळते. अगदी अलीकडे संजय पवार यांच्या चित्रांसह ‘दुसरे महायुद्ध’ हे त्यांचे- या युद्धातील विचारधारांचा झगडाही मांडणारे पुस्तक प्रकाशित झाले. सहा-सात वर्षांचे असतानापासून या महायुद्धाबद्दल काही ना काही ऐकलेल्या अनंत भावे यांनी त्या युद्धाविषयीचे चित्रपट पाहण्याचा क्रमही वर्षानुवर्षे कायम ठेवला होता. या चित्रपटांचे आशय कसे बदलत गेले, याबद्दलही ते लिहू शकले असते; पण ते राहिलेच. त्यांच्या गद्यालेखनाला खरा बहर आला तो वयाच्या पन्नाशीत… ‘महानगर’ या तत्कालीन सायंदैनिकात ‘वडापाव’ नावाचे सदर ते लिहीत. लोकभावनांना कुरवाळतच विनोदी स्तंभलेखन करता येते, या तोवर रुजलेल्या समजाला भावे यांनी छानसा तडा दिला. बातमीऐवजी वास्तवाकडे थेटपणे पाहण्याची ‘माणूस शैली’ मात्र या सदरातही टिकून राहिली होती.

‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापक’ आणि ‘दूरदर्शनचे वृत्तनिवेदक’ हे दोन शिक्के भावेसरांवर बसलेले होते. त्यापैकी अध्यापन-पेशात ते नसते, तरी तिथल्या संबंधितांमध्ये प्रिय झालेच असते असा त्यांचा स्वभाव. पावसाळी सहलीला भावेसरच हवे, हा विद्यार्थ्यांचा हट्ट ते झब्बा आणि शबनम-पिशवी सांभाळतच पुरा करायचे. मुंबई दूरदर्शनवर अगदी सुरुवातीपासून (१९७२) बातम्या वाचणाऱ्या भावेसरांना तिथेही अनेक ‘विद्यार्थी’ मिळाले. ‘संचालनालय’ हा शब्द मुळात संधीशब्द आहे, त्यातला ‘ना’ जरासा लांबवून म्हटला तर उच्चाराला आणि ऐकण्यासही तो सोपा जातो, यासारखी तालीम भावेसर या ‘विद्यार्थ्यां’ना देत.. इंग्रजीतले तेजेश्वर सिंग नावाचे एक दूरदर्शन- वृत्तनिवेदक होते. त्यांचा आणि भावे यांचा आवाज एका जातकुळीचा. दोघेही दाढीवाले. पण तेजेश्वर सिंग सुटाबुटात बातम्या द्यायचे; तर भावे यांनी झब्ब्यातच हे काम केले. बातमी वाचनातून प्रेक्षकांना ‘समजली’ पाहिजे, अशी हुनर तेव्हा भावेंखेरीज विश्वास मेहेंदळे आणि आकाशानंद यांना होती, पण अखेरपर्यंत फक्त वृत्तनिवेदन यापैकी भावे यांनीच केले. वाक्याची लय ओळखून बातमीचे फेरसंपादन ते करीत, त्यामुळे भावे यांच्याकडून बातम्या ऐकणाऱ्यांचे मराठीही सुधारले! पुष्पा भावे यांच्यासारख्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाला जन्माची साथ त्यांनी दिली. बाई अनेकदा टोकाची मते मांडत, पण सर मात्र ‘अधले मधले’सुद्धा समजून घेत!

Story img Loader