डॉ. उज्ज्वला दळवी

अनारोग्यकारक सूक्ष्मजीव- बॅक्टेरिया- आता प्रतिजैविकांनाही दाद न देणारे ‘सुपरबग’ ठरताहेत, ते का?

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

‘‘डॉक्टर, आज चार दिवस झाले. मुलीचा ताप उतरत नाही. काहीतरी अँटिबायोटिक द्या ना! म्हणजे पटकन बरं वाटेल,’’ आई-वडिलांच्या तशा हट्टापुढे डॉक्टरांचा कित्येकदा नाइलाज होतो. नेहमीच्या सर्दीपडशाला, साध्या तापाला अँटिबायोटिक्सचा फायदा होत नाही. पण पेशंट ती हट्टाने मागून घेतात.

‘अँटिबायोटिक’चा अर्थ ‘जीवनविरोधी’.  सूक्ष्मसजीवांना, मुख्यत्वे जंतूंना (बॅक्टेरिया) टिपून मारणारी किंवा त्यांना जगणं, वाढणं कठीण करणारी, सूक्ष्मसजीवांनीच बनवलेली प्रति-जैविक औषधं म्हणजे अँटिबायोटिक्स. त्या नमुन्यावरून आता संगणकाच्या मदतीने तशी अनेक औषधं कारखान्यातही बनतात.

अँटिबायोटिक्स वेगवेगळय़ा प्रकारे काम करतात. त्यांच्यातली काही पेनिसिलिनसारखी औषधं जंतूंच्या पेशींभोवतालच्या तटबंदीला भगदाडं पाडतात. काही औषधं जंतूंच्या पेशींची आवरणं फाडतात. काही अँटिबायोटिक्स जंतूंच्या पेशींच्या खास दरवाजांतून आत शिरून त्यांच्या प्रोटीन्सच्या, डीएनएच्या कारखान्यात गोंधळ घालतात. पेशींचं मुख्य काम असतं डीएनए आणि प्रोटीन्स तयार करणं. डीएनए बनलं की ते सूक्ष्म पेशीच्या अतिसूक्ष्म केंद्रात मावावं म्हणून त्याचे घट्ट पिळे करावे लागतात. काही अँटिबायोटिक्स ते डीएनएचे पिळे बनवण्यात अडचण आणतात. प्रोटीन्स बनवायला रसायनांची माळ गुंफावी लागते. ते काम आरएनए हा डीएनएचा धाकटा भाऊ करतो. टीबीच्या जंतूंशी लढणारं ‘रिफाम्पिसिन’ हे औषध त्या आरएनएच्याच जडणघडणीत व्यत्यय आणतं. प्रोटीनसाठी रसायनांची माळ सुरू करताना ‘टेट्रासायक्लिन’ आडवं येतं. त्यामुळे जंतूंच्या पेशींमधला सगळा कारभार उद्ध्वस्त होतो. तशा विध्वंसक कामांनी अँटिबायोटिक्स जंतूंना ठार मारतात किंवा त्यांची वाढ थोपवतात.

बहुतेक लहानसहान संसर्गजन्य रोगांशी, साध्या सर्दीतापाशी टक्कर द्यायला आपली रोगप्रतिकारक शक्तीच पुरेशी असते. तिथे अँटिबायोटिक्सची गरज नसते. पण बरं व्हायला उतावीळ पेशंट ‘अँटिबायोटिकच द्या,’ म्हणून हटून बसतात. याउलट न्यूमोनिया, टायफॉइड, मेनिन्जायटिस इ. गंभीर आजारांशी झुंजायला एकटी प्रतिकारशक्ती अपुरी पडते. तिथे तिला अँटिबायोटिक्सच्या मदतीची खरीच गरज असते.

‘अँटिबायोटिक घेतलं नाही तर आपल्याला बरं वाटणारच नाही,’ असं काहीजण धरून चालतात तर ‘अँटिबायोटिक्स आपल्याला उष्ण पडणार. त्यांनी आपल्याला बी-कॉम्प्लेक्सची कमतरता होणार, प्रचंड थकवा येणार,’ अशी इतर काही लोकांची खात्री असते. ‘‘डॉक्टर, मला त्या गोळय़ा उष्ण पडतात. म्हणून मी त्या दोनच दिवस घेतल्या,’’ लघवीच्या इन्फेक्शनसाठी दिलेलं अँटिबायोटिक काकूंनी जरासं बरं वाटल्याबरोबर बंद केलं. त्या अर्धवट उपायांनी  अर्धेमुर्धेच जंतू मेले. उरलेल्यांना औषधांचा म्हणजे शत्रूच्या शस्त्रास्त्रांचाच नमुना मिळाला. तो नमुना वापरून त्यांनी त्या अँटिबायोटिकवर मात करायचे डावपेच आखले. काकूंना तेच अँटिबायोटिक पुन्हा दिल्यावर त्या जंतूंनी त्याला सहज नेस्तनाबूत केलं. औषध कुचकामाचं ठरलं.  तशी अँटिबायोटिकशी लढताना जंतूंची झालेली सरशी म्हणजे ‘अँटिबायोटिक रेझिस्टन्स’.

अँटिबायोटिकच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे जंतूही आपलं युद्धाचं धोरण आखतात. मग गरजेप्रमाणे ते आपली तटबंदी अधिक भक्कम करतात किंवा अँटिबायोटिक ज्या दारांतून त्यांच्या पेशींत शिरतं ती दारं कुलूपबंद करतात. कधी आपल्या कारखान्यातली यंत्रणा बदलून त्या अँटिबायोटिकचाच फडशा पाडतात. काकूंसारखे लोक अँटिबायोटिक्सचा तसाच गैरवापर करत राहिले तर ते जंतू अनेक अँटिबायोटिक्सशी लढायला शिकतात, त्यांना निष्फळ करण्यात यशस्वी होतात. कुठलाही ‘सुशिक्षित’ जंतू तसा, ‘सुपरबग’ म्हणजे अजिंक्यजंतू  होऊ शकतो. नंतर जेव्हा तशा अजिंक्यजंतूंमुळे आजार होतो तेव्हा अँटिबायोटिक्सची काहीही मदत मिळत नाही. रोगप्रतिकारशक्तीला एकांडी शिलेदारी करावी लागते. ती जरा जरी लेचीपेची असली तरी तसे आजार प्राणघातक ठरू शकतात.

त्वचेवर नेहमी वावरणारा, गळवं, मुरूम वगैरेंचा कर्ताकरविता जंतू, टीबीचा जंतू, लघवीची वेगवेगळी चिवट इन्फेक्शन्स देणारे दादा जंतू, अँटिबायोटिक्स घेतल्यावर आतडय़ांत फोफावणारा एक जंतू हे त्या सुशिक्षित जंतूंचे, अजिंक्यजंतूंचे म्होरके आहेत. अशा अजिंक्यजंतूंची संख्या वाढतच चालली आहे. त्यांच्यात जंतूंसोबत विषाणू, बुरशी, परजीवी जंतू असे सगळे हळूहळू सामील होताहेत. सध्या वापरात असलेल्या कुठल्याही अँटिबायोटिकला ते दाद देत नाहीत. हॉस्पिटलबाहेरच्या निरोगी लोकांच्या वाटेला ते फारसे जात नाहीत. पण हॉस्पिटलमध्ये थर्मामीटर, कॅथेटर वगैरेंतून फैलावत, भल्याभल्यांचे बळी घेत ते वणव्यासारखे वॉर्डावॉर्डातून पसरत जाऊ शकतात. अतिदक्षता विभागातल्या नळय़ांत ते ठाण मांडतात. आधीच आजारी असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यांच्यावर झडप घालणं अजिंक्यजंतूंना सोपं जातं. तशा अजिंक्यजंतूंनी नवजात अर्भकांना मेंदूज्वर, हृदयज्वर असे भयानक आजार होतात. दर वर्षी जगभरात सुमारे बारा लाख लोक मरतात. त्यांच्यात तान्ह्या मुलांचं प्रमाण मोठं असतं. वारेमाप अँटिबायोटिक्स घेतल्यामुळे रेझिस्टन्स होत असला तर तो श्रीमंत देशांचा आजार असायला हवा. पण अजिंक्यजंतूंची लागण आधी अँटिबायोटिक घेतलं नसतानाही  होऊ शकते. त्यामुळे तो आता गरीब देशांतही पसरला आहे.

जंतूंच्या अँटिबायोटिक्स- असहकाराला १९७० च्या दशकात वेगळी कलाटणी मिळाली. त्या दशकात आफ्रिकेत एड्सचा उगम झाला. अँटिबायोटिक्सनाही जंतूंशी लढताना माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पाठबळाची आवश्यकता असते. एड्ससारख्या आजारात जिथे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झालेली असते तिथे अँटिबायोटिक्सना जंतूंशी एकाकी लढा द्यावा लागतो. जंतूंची सरशी होते. ते त्या औषधाची सर्वागीण ओळख करून घेतात. मग नेहमीपेक्षा वेगळी, अधिक जालीम, अधिक दुष्परिणाम देणारी औषधं वापरावी लागतात. त्यांचीही तशीच गत होते. अनेक मातब्बर औषधांना नेस्तनाबूत करून ते जंतू अजिंक्य होतात. त्यामुळेच एड्सबाधिताचा टीबी समाजात फैलावल्यास जालीम औषधंही त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरतात.

त्यांच्यावर मात करायला नव्या औषधांचा शोध सतत चालू असतो. पण नवी प्रभावी अँटिबायोटिक्स पटकन बनवणं सोपं नाही. क्रांतिकारक नवे शोध लागून नवी, न उष्टावलेली अँटिबायोटिक्स आली नाहीत तर पेनिसिलिनचा शोध लागण्यापूर्वी जगाची जी अवस्था होती तीच पुन्हा येण्याची भीती आहे.

अजिंक्यजंतूंना आळा घालण्यासाठी अँटिबायोटिक्सचा वापर अत्यंत जबाबदारीने, काळजीपूर्वक व्हायला हवा. त्यासाठी आधी डॉक्टरांचं त्या दृष्टीने प्रशिक्षण व्हायला हवं. जेव्हा रेझिस्टन्सचा धोका पत्करूनही अँटिबायोटिक आवश्यक वाटतं तेव्हाच ते द्यावं. त्या आज़ाराचे संशयित जंतू प्रयोगशाळेच्या तबकडीत वाढवून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा अँटिबायोटिक्सची चाचणी घेऊनच औषधनिवड व्हावी. या औषधाचा उपचारकाळ , डोस प्रयोगांनी ठरवलेला असतो. त्यानुसारच ते घेणं आवश्यक आहे. औषधनिवड, डोस किंवा उपचारकाळ यांच्यात चूक करणं हा औषधाचा गैरवापर आहे. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक घेऊ नये.

प्रिस्क्रिप्शन्सशिवाय अँटिबायोटिक्स विक्रीवर निर्बंध घालणारे नियम १९४०-४५ सालापासून अस्तित्वात आहेत. पण २०१४साली एक सर्वेक्षण झालं. अद्यापही ती औषधं प्रिस्क्रिप्शनसह किंवा शिवाय, ताप, सर्दी, खोकला वगैरे साध्या लक्षणांसाठीही दिली जातात असं त्यावेळी दिसून आलं. म्हणजे लोकांची मनमानी अजूनही चालूच आहे,अँटिबायोटिक रेझिस्टन्स वाढतोच आहे.

अशा स्थितीत जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स घ्यायची नाहीत. डॉक्टरांनी दिलेली अँटिबायोटिक्स त्यांनी सांगितल्यासारखी नेमस्तपणे सांगितलं तितके दिवस सांगितलेल्या प्रमाणातच घ्यायची. ‘‘डॉक्टर, तुम्ही मला खोकल्यासाठी एरिथ्रोमायसिन दिलं होतं ना? त्याच्यातल्या गोळय़ा राखून ठेवल्या होत्या. काल घसा जरा दुखत होता. म्हणून त्याच गोळय़ा घेतल्या. ताबडतोब आराम पडला!’’ असला आगाऊपणा कधीही करायचा नाही.

इन्फेक्शनच झालं नाही तर अँटिबायोटिक घ्यावंच लागणार नाही. म्हणून संसर्ग टाळायचा. हात धुणं, ताजं, गरम अन्न खाणं, शुद्ध पाणी पिणं, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं वगैरे साध्या उपायांनी शक्यतो जंतूंची लागण टाळायची. न्यूमोनियाची, मेंदूज्वराची लस वेळीच घेतली की ते आजारच टळतात.

प्रत्येक माणसाने इतकी काळजी घेतली, आपल्या  कर्तव्याचा खारीचा वाटा उचलला की निदान आपल्या पाठीवर संरक्षक विज्ञानाची बोटं फिरतील. तेवढं तरी करू या.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com

Story img Loader