अँटनी लोवेनस्टिन यांचं ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’ हे पुस्तक वाचत असताना अलीकडे माध्यमांत झालेले दोन वाद आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यातला एनएसओ या इस्रायली कंपनी-समूहाने विकसित केलेल्या पेगॅसस तंत्रज्ञानाचा वाद आपल्याला माहीत आहे. एखाद्या व्यक्तीच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये नकळत शिरून (थोडक्यात: हॅक करून) त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या संवादावर लक्ष ठेवून त्याची माहिती गोळा करण्याचं काम या तंत्रज्ञानाद्वारे केलं जातं. २०१९ मध्ये कॅलिफोर्नियामधल्या एका न्यायालयात व्हॉट्सअॅपने इस्रायलमधल्या एनएसओ या कंपनीविरुद्ध एक खटला दाखल केला होता. त्या खटल्याचा निकाल २०२१ मध्ये लागला. जगातील एकूण १४०० व्यक्तींचे मोबाइल फोन हॅक करून त्या व्यक्तींवर पाळत ठेवली आणि त्यांच्याविषयी माहिती गोळा केली असं या खटल्यातल्या न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल देताना म्हटलं. या १४०० व्यक्तींपैकी ३०० जण भारतीय होते अशी माहिती पुढे आली. यानंतर बराच काळ यावर आपल्याकडे एनएसओ इस्रायली या कंपनी-समूहाने विकसित केलेल्या पेगॅसस तंत्रज्ञानावर वादळ उठलं होतं. आपले फोन हॅक झाले आणि त्याकरवी आपली माहिती शासनाने मिळवली असा आरोप अनेक विरोधी पक्षीयांनी, शासनविरोधी पत्रकारांनी आणि समाजकारण्यांनी केला. या हॅकिंगविषयी अँटनी लोवेनस्टिन यांच्या पुस्तकात आलेला मजकूर आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

नागपूरमधले वकील निहालसिंग राठोड हे शासनाविरोधी खटले लढवत असतात. भीमा कोरेगाव खटल्यात त्यांनी काही आरोपींच्या बाजूने वकिली केली आहे. त्यांचे फोन हॅक कसे केले गेले याबद्दल लोवेनस्टिन आणि राठोड यांच्यातले संवाद या पुस्तकात थोडक्यात दिले आहेत. आपली सत्तेवरची पकड मजबूत करण्यासाठी मोदींनी इस्रायली कंपन्यांच्या टेहेळणी तंत्रज्ञानाचा वापर केला असा आरोप लोवेनस्टिन यांनी या पुस्तकात केला आहे.

या हॅकिंगविषयी जे काही घडतं त्यात एक समान घटनाक्रम आहे असं लोवेनस्टिन दाखवून देतात. प्रथम त्या त्या देशांचे नेते आणि नेतान्याहू यांच्या भेटी होतात. त्यानंतर हॅकिंगद्वारे पाळत ठेवणाऱ्या इस्रायली तंत्रज्ञानाचा त्या त्या देशांत प्रवेश होतो. रवांडा, अझरबैजान, एल साल्वादोर या देशांची उदाहरणं देऊन त्यांनी हा घटनाक्रम स्पष्ट केला आहे.

अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन असे पुढारलेले देश हॅकिंगचं तंत्रज्ञान स्वत:च विकसित करू शकतात. इस्रायली कंपनीनं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं त्यांना सुरक्षित वाटत नाही. कारण अशी जमा केलेली माहिती इस्रायलच्या शासनापर्यंत जाण्याची जोखीम त्यात असते. स्वतंत्रपणे स्वदेशात हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बराच पैसा लागतो. विकसित देशांना ही अडचण नसते. पण बाकीच्यांचं तसं नाही. त्यामुळे पेगॅसस सारखं ‘रेडीमेड’ तंत्रज्ञान त्यांना कमी पैशात मिळतं. त्यामुळे विकसनशील देश हे तंत्रज्ञान वापरतात. याउलट आपल्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला तर हे देश कसे आक्रमक होतात हे अमेरिकेचं उदाहरण घेऊन लोवेनस्टिन यांनी स्पष्ट केलं आहे.

इस्रायल आणि अमेरिका यांच्यातले संबंध किती जवळचे आहेत हे जगाला माहीत आहे. तरीसुद्धा २०२१ मध्ये अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने एनएसओ कंपनी समूहाचं नाव त्यांच्या ‘एन्टिटी लिस्ट’ नावाच्या काळ्या यादीत टाकलं. या यादीतल्या कंपन्यांना अमेरिकन तंत्रज्ञान देण्यास बंदी आहे. एनएसओ आपल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अनेक देशांतल्या शासनांच्या टीकाकारांवर आणि स्वत:च्या अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी वापरलं जात आहे असा आरोप अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं केला. आणि ‘अमेरिका आपल्या परराष्ट्र धोरणात मानवाधिकारांना मध्यवर्ती स्थान देण्याचा प्रयत्न करते आणि अशी डिजिटल तंत्रं दमनासाठी वापरली जात असल्यानं त्यांना आळा घालण्यासाठी’ आपण हे पाऊल उचलत असल्याचा दावा या विभागानं केला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक राजकारण्यांनी एनएसओवर आणखी कडक निर्बंध घालण्याची मागणी केली. (ट्रम्प आणि नेतान्याहू दोघे एकाच वेळी सत्तेत असते तर अशी कारवाई होऊ शकली नसती असं मत यावर लोवेनस्टिन यांनी या पुस्तकात व्यक्त केलं आहे.)

अमेरिकन शासनानं एनएसओ कंपनी समूहाबाबत जशी प्रतिबंधात्मक कारवाई केली तसं आपल्या देशात काहीच घडलं नाही. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन यांच्याप्रमाणे स्वतंत्रपणे आपण असं तंत्रज्ञान विकसित करू शकलो नसतो का? त्याऐवजी ‘आयतं’ स्वस्त इस्रायली तंत्रज्ञान विकत घेण्याची जोखीम आपण का पत्करली? आपण स्वत:ला ‘जगातली पाचवी अर्थव्यवस्था’ आणि ‘डिजिटल महासत्ता’ म्हणवून घेत असताना असं तंत्रज्ञान विकसित करण्यात आपली काय अडचण होती?

दुसरा वाद अगदी अलीकडचा म्हणजे फेब्रुवारी २०२५ मधला आहे. ‘पॅरागॉन सोल्यूशन्स’ नावाच्या एका इस्रायली कंपनीनं विकसित केलेल्या ‘ग्रॅफाइट’ तंत्रज्ञानामुळे आपले फोन हॅक झाले आणि आपले ई-मेल, मेसेजेस सत्ताधाऱ्यांनी मिळवले, असा आरोप इटलीमधल्या एका पत्रकारानं आणि दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. तिथल्या जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या शासनाच्या लिबियाशी चाललेल्या व्यवहारांसंबंधात आपली मतं विरोधी असल्यामुळे हे झालं असावं असं त्या तिघांना वाटतं. जगात एकूण ९० ते १०० पत्रकारांवर अशी पाळत ठेवली जात असल्याची आपल्याला मोठी शक्यता वाटते असं व्हाट्सअॅपनं याबाबत म्हटलं आहे. ही गोष्ट ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’ या पुस्तक प्रकाशनाच्या नंतरची असल्याने तिचा उल्लेख या पुस्तकात नाही. पण ‘पॅरागॉन सोल्यूशन्स’ या कंपनीचा उल्लेख एनएसओप्रमाणे टेहळणी-तंत्रज्ञानातली आणखी एक अग्रेसर कंपनी म्हणून लोवेनस्टिन यांनी केला आहे.

तंत्रज्ञान विक्रीच्या अशा कथा मोठ्या प्रमाणात ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’मध्ये आहेत. लोवेनस्टिन यांचं ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’ हे पुस्तक २०२३ मध्ये प्रसिद्ध झालं. त्यावेळी ७ ऑक्टोबरचा हमासचा हल्ला होऊन गेला होता. त्यामुळे गाझाच्या भीषण संघर्षाचे संदर्भ त्या पुस्तकात येतात.

लोवेनस्टिन ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात राहणारे. जन्मानं ज्यू; पण घरातलं वातावरण उदारमतवादी. मात्र इस्रायलला पाठिंबा देणं अपेक्षित मानलं जायचं. त्यांच्या पूर्वजांनी १९३९ मध्ये नाझी जर्मनी आणि ऑस्ट्रियातून निघून ऑस्ट्रेलियात आसरा घेतला होता. त्यामुळे आपल्याला इस्रायलचा आधार आहे अशी लोवेनस्टिन यांच्या वाडवडिलांची भावना होती आणि तीच वारशानं लोवेनस्टिन यांच्याकडेही आली. पण जसजशी समज वाढत गेली तसतसा लोवेनस्टिन यांचा इस्रायलबाबत भ्रमनिरास होऊ लागला. इस्रायलचं पॅलेस्टिनींशी वागणं उघडपणे वंशभेद करणारं आहे असं त्यांच्या लक्षात येऊ लागलं. आपले ज्यू मित्र आणि आप्तेष्ट इस्रायलच्या शासनाला पाठिंबा देताना पुरेसा विचार करत नाहीत हे त्यांना जाणवू लागलं. ज्यूंचे धर्मगुरू जे बोलतात ते ऐकून त्याच्यावर फारसा विचार न करता आपले आप्त आणि मित्र पोपटपंची करत आहेत असं त्यांच्या लक्षात येऊ लागलं. पॅलेस्टिनींना कितीही यातना झाल्या तरी त्याबद्दल ते बेफिकीर आहेत हे त्यांना समजत होतं. ज्यूंमधल्या प्रचलित कथनांमागे भयगंडाची भावना प्रबळ होती. ज्यू कायम संकटात आहेत आणि त्यावर इस्रायल हा उपाय आहे असा त्यांचा समज होता. (‘हिंदू खतरे में है’ किंवा ‘इस्लाम खतरे में है’ असे घोष जसे त्या त्या धर्मीयांकडून ऐकायला मिळतात त्याचाच ज्यू अवतार.) हिटलरने ज्यूंचं जे हत्याकांड घडवून आणलं होतं त्यातून ज्यूंना मिळालेला हा ‘विकृत धडा’ आहे असं लोवेनस्टिन म्हणतात.

असे आरोप करणारे लोवेनस्टिन हे एकमेव ज्यू नव्हेत. एका वेगळ्या पद्धतीने नॉर्मन फिंकेल्स्टिन या अमेरिकेतल्या लेखकानं यापूर्वी असे आरोप केले आहेत. या विषयावर फिंकेल्स्टिन यांनी एक अख्खं पुस्तक लिहिलं आहे. ‘द हॉलोकास्ट इंडस्ट्री’ हे त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक पुरेसं बोलकं आहे. आपल्या संकुचित झायनवादी हेतूनं ज्यूंनी हिटलरच्या हत्याकांडाच्या नावे जे काही उद्याोग केले त्याचा सविस्तर समाचार त्यांनी या पुस्तकात घेतला आहे.

२००५ मध्ये लोवेनस्टिन यांनी पहिल्यांदा मध्यपूर्वेला भेट दिली त्यावेळी त्यांच्या मनात इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्याबद्दलच्या भावना इतर सर्वसामान्य ज्यूंसारख्याच होत्या. इस्रायल आणि पॅलेस्टाइन असे दोन वेगळे देश झाले की सगळे प्रश्न सुटतील असं त्यांना वाटायचं. पहिल्या भेटीनंतरच्या काळात त्यांना वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम या तिन्ही ठिकाणांहून बातम्या देण्याचं काम मिळालं. २०१६ ते २०२० दरम्यान पूर्व जेरुसलेमच्या शेख जर्रा नावाच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. इस्रायली पोलीस पॅलेस्टिनींना कसे अवमानित करत, कसा छळ करत हे त्यांना जवळून पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या विचारांवर दूरगामी परिणाम झाले. ज्यूंच्या नावाखाली हे सगळं काय चाललं आहे असा प्रश्न त्यांना पडू लागला.

हळूहळू त्यांचे विचार बदलत गेले आणि इस्रायली झायनवादाच्या बंदिस्त चौकटीतून ते बाहेर पडले. पण विचारातला हा बदल एकाएकी झालेला नव्हता. लोवेनस्टिन यांचा २० वर्षांचा बातमीदारीचा अनुभव त्या बदलामागे होता. ते म्हणतात : ७ ऑक्टोबर २०२३ नंतर गाझामध्ये मरण पावलेल्यांचे फोटो आणि व्हिडीओ मी रोज पाहतो. त्यावेळी मला हे लक्षात येतं की एकीकडे हे सगळं आपल्या नावानं चाललं आहे; अनेक देशांत राहणारे संघटित ज्यू बव्हंशी इस्रायली शासनाला बिनशर्त पाठिंबा देतात. पण दुसरीकडे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इथले बंडखोर ज्यू ‘आमचं नाव घेऊन असलं काही नको’ अशा घोषणा देतात.

अशा बंडखोर ज्यूंना आपला पाठिंबा आहे अशी नि:संदिग्ध भूमिका लोवेनस्टिन घेतात. ज्यू आणि पॅलेस्टिनी या सगळ्यांचा मिळून एक देश असावा आणि त्यात सर्वाना सारखे अधिकार असावे असं आज आपल्याला वाटतं हे ते मान्य करतात.

‘बंडखोर ज्यू’ म्हणताना त्यांच्या डोळ्यासमोर ‘ज्युईश व्हॉइस फॉर पीस’ (थोडक्यात: जेव्हीपी) आणि तत्सम संघटना आहेत. जेव्हीपी ही संघटना ज्यूंची आहे, तरीही त्यांनी इस्रायली वंशभेदाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. २०२३-२४च्या इस्रायल-गाझा संघर्षकाळात जेव्हीपी आणि तिच्यासारख्या इतर संघटनांनी प्रचलित इस्रायली शासनाच्या विरोधी आणि पॅलेस्टिनींना पाठिंबा देणारी जी निदर्शनं अमेरिकेत केली ती माध्यमांत अनेकांनी पाहिली असतील. ‘गेली काही वर्षं इस्रायल चालवत असलेल्या वंशभेदाच्या नीतीबद्दल जगभरात वाढत्या प्रमाणात जाणीव होत आहे आणि माझ्या स्वत:च्या मनातसुद्धा अशीच प्रक्रिया गेली काही वर्षं सुरू आहे’ असं लोवेनस्टिन म्हणतात. ‘बेत्सेलेम’ ही इस्रायलमधली एक अग्रेसर मानवाधिकार संघटना आहे. २०२१च्या सुरुवातीला या संघटनेनं जो अहवाल प्रसिद्ध केला त्यात इस्रायलचं शासन वंशभेद करत आहे असा आरोप केला होता. जॉर्डन नदी आणि भूमध्य समुद्र यांच्या मधल्या भागात इस्रायलींनी ज्यूंचं वर्चस्व असलेला देश निर्माण केला आहे असं बेत्सेलेमनं म्हटलं आहे. नंतर ‘ह्युमन राइट्स वॉच’ आणि ‘अम्नेस्टी इंटरनॅशनल’ या दोन्ही आंतरराष्ट्रीय संघटनांनी या निष्कर्षांना दुजोरा दिला.

या सगळ्याबद्दल माध्यमांमध्ये अनेक गोष्टी आल्या आहेत आणि पुढेही त्या येत राहतील. हे सगळं ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’मध्ये विस्तारानं आलेलं आहे. पण लोवेनस्टिन यांनी त्यांचं लक्ष त्यांनी त्यातल्या एका विशिष्ट भागावर केंद्रित केलं आहे. हॅकिंग करून पाळत ठेवण्याचं उच्च तंत्रज्ञान वापरून बनवलेली ही उपकरणं विकताना ‘युद्धभूमीवर त्यांची चाचणी केली गेली आहे’ अशा अर्थाचं वाक्य वापरून आपली जाहिरात इस्रायली कंपन्या करताना दिसतात. आणि ही चाचणी केली जाते पॅलेस्टिनींविरुद्धच्या संघर्षात. पॅलेस्टिनी माणसं ही जणू काही एखाद्या प्रयोगशाळेतले कोणी प्राणी आहेत आणि त्यांच्यावर आपण प्रयोग करत आहोत अशा तऱ्हेने त्यांचा वापर करणं ही कल्पना लोवेनस्टिन यांना अस्वस्थ करते आणि त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. टेहळणी-तंत्रज्ञानाच्या या ‘प्रयोगशाळे’चे अनेक पैलू लोवेनस्टिन यांनी या पुस्तकात उजेडात आणले आहेत. म्हणून ‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’ हे या पुस्तकाचं शीर्षक अर्थपूर्ण आहे.

इस्रायलच्या गाझामधल्या हल्ल्यांची तरफदारी करणारे देश मोजकेच आहेत. पण महासत्ता अमेरिकेचा इस्रायलला ठाम पाठिंबा आहे. या संघर्षाच्या काळात जो बायडेन यांची भूमिका बोटचेपेपणाची होती. आपल्या ताकदीच्या जोरावर इस्रायलला नमतं घ्यायला लावण्याची कोणतीच इच्छा त्यातून दिसून येत नव्हती. त्यामुळे अनेक देशांचा नाइलाज होता. इस्रायलला इतर कोणी थांबवू शकत नव्हतं. दुसरीकडे इस्रायलच्या जनतेला नेतान्याहूंची धोरणं पसंत नव्हती; कारण नेतान्याहू जे काही करत होते त्यामुळे इस्रायलचे अनेक बंधक मारले गेले. पण इस्रायली जनतेचा रोषाचा मुद्दा मुख्यत: बंधक सोडवण्याचा होता. त्यात पॅलेस्टिनी जनतेबद्दल सहानुभूती अभावानेच दिसून येत होती.

या परिस्थितीत काही मोजके ज्यू ठामपणे युद्धविरोधी भूमिका घेत होते; पॅलेस्टिनींवर इस्रायल इतकी वर्षं सातत्याने जे जुलूम-जबरदस्ती करतं आहे त्याच्याविरुद्ध आवाज उठवत होते. एकूणच ज्यू समाजातल्या प्रचलित प्रवाहाविरुद्ध ते जात होते.

हमासनं केलेल्या हल्ल्यामुळे आपल्या आपल्या हेर यंत्रणा आणि तंत्रज्ञान परिपूर्ण असल्याची जी भावना ज्यूंमध्ये होती तिचा फज्जा उडाला. गाझातल्या २३ लाख लोकांना आपण चोहोबाजूंनी अनंतकाळ जखडून ठेवू आणि याला गाझातून कोणताच प्रतिकार होणार नाही ही समजूतसुद्धा फोल ठरली. काही बाबतीत हमासचा हा हल्ला ११ सप्टेंबर २००१च्या न्यूयॉर्कवरील अतिरेकी हल्ल्याशी साम्य दर्शवणारा आहे असं लोवेनस्टिनना वाटतं.

पण इस्रायलमध्ये शिरून हमासने केलेला हल्ला आततायी स्वरूपाचा होता; त्यात दीर्घपल्ल्याचा कसलाही विचार नव्हता (हे पुस्तक लिहिलं जात असताना) ५०,०००च्या आसपास पॅलेस्टिनी त्यात मृत्युमुखी पडले; यात महिला आणि लहान मुलं मोठ्या संख्येने होती; लाखो पॅलेस्टिनींना असह्य वेदनांना तोंड द्यावं लागलं; गाझाची अवस्था पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाईट झाली असं लोवेनस्टिन म्हणतात.

एखादी राजवट कशी आहे याचा सारासार विचार न करता हॅकिंगद्वारे टेहळणी करण्याचं – तंत्रज्ञान इस्रायली कंपन्यांनी पृथ्वीवरच्या सरसकट सर्व प्रकारच्या राजवटींना वापरू दिलं. यात मानवाधिकारांना पायदळी तुडवणारे कोणते देश येतात याचा विस्तृत तपशील या पुस्तकात पसरलेल्या असंख्य कथांतून आला आहे.

या पुस्तकाचं वळण पत्रकारितेचं आहे. इस्रायल / पॅलेस्टाइनविषयी २० वर्षं वार्तांकन करणाऱ्या एका संवेदनशील माणसाच्या विवेकाला टोचणाऱ्या गोष्टी त्याने प्रांजळपणे लिहिल्या आहेत. त्यात विश्लेषणाचा भाग फारसा नाही. पण त्यामुळे त्या कमी महत्त्वाच्या ठरत नाहीत. फोन किंवा लॅपटॉप हॅक करून व्यक्तींवर पाळत ठेवण्याच्या इस्रायली तंत्रज्ञानाच्या विषयातला कथनात्म संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं आहे.

‘द पॅलेस्टाइन लॅबोरेटरी’

लेखक : अँटनी लोवेनस्टिन

प्रकाशक : मॅकमिलन

पृष्ठे : २६५; किंमत: ६९९ रु.

Story img Loader