अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी फिलाडेल्फियातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या इंडिपेंडन्स हॉलजवळ केलेले भाषण अमेरिकेतील दुभंगलेल्या राजकीय स्थितीवरील इशारावजा भाष्य ठरले. ते प्रचारकीदेखील होते, कारण येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. प्रतिनिधिगृहाच्या सर्व ४३५ जागा, सेनेटच्या ३५ जागा, त्याचबरोबर ३६ राज्यांमध्ये गव्हर्नर निवडणुका होत आहेत. अमेरिकी काँग्रेसवर नियंत्रणासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
सध्या सेनेटमध्ये डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांना समसमान ५० जागा आहेत. त्यामुळे एखाद्या मुद्दय़ावर कोंडी झाल्यास ती फोडण्यासाठी सदनाच्या सभापती उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे मत निर्णायक ठरायचे. अमेरिकी प्रतिनिधिगृहातही डेमोक्रॅट्सना ४३५ पैकी २२० जागा म्हणजे काठावरचे बहुमत आहे. ते तसेच राखणे किंवा वाढवणे, तसेच सेनेटमध्ये बहुमत प्रस्थापित करणे हे डेमोक्रॅट्ससमोरील आव्हान आहे. अमेरिकेत बऱ्याचदा मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्षांच्या पक्षापेक्षा वेगळय़ा पक्षाच्या बाजूने कौल मिळालेला आहे. असा कौल रिपब्लिकनांच्या बाजूने जाऊ नये, ही बायडेन यांची प्रधान आकांक्षा. पण हा मुद्दा केवळ एका पक्षाच्या बाजूने कौल दिला जाण्याचा नाही, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. रिपब्लिकनांना – म्हणजेच ट्रम्प यांच्या समर्थकांना कौल देणे हे अमेरिकी लोकशाहीच्या गळय़ाला नख लावल्यासारखे ठरेल, याकडे बायडेन यांनी लक्ष वेधले आहे. ज्या फिलाडेल्फियात जवळपास २५० वर्षांपूर्वी अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला गेला, त्याच शहरात अमेरिकेच्या लोकशाहीविषयी त्यांना इशारा द्यावासा वाटणे हे सूचक आहे. याचे कारण ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये पुन्हा प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे.
जवळपास अर्धा डझन प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. त्यात सर्वात गंभीर प्रकरण आहे, ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल इमारतीवरील जमाव हल्ला. २०२० मधील अध्यक्षीय निवडणूक बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकलीच नाही, तीत आम्हीच विजयी ठरलो असे हास्यास्पद कथानक ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी पराभव दिसू लागताच आळवले. त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तबाची प्रक्रिया सुरू असतानाच कॅपिटॉल इमारतीवर ट्रम्पसमर्थक चाल करून गेले होते. आजही ट्रम्प यांच्या कथानकावर विश्वास असणारे रिपब्लिकन सेनेटर, प्रतिनिधी आणि गव्हर्नर मोठय़ा संख्येने आहेत. मध्यावधी निवडणुकांसाठी रिपब्लिकन उमेदवार ठरण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक मेळावे (प्रायमरीज्) सुरू झाले आहेत. त्यांमध्ये ट्रम्पसमर्थक निवडून येत आहेत आणि ट्रम्पविरोधक पराभूत होत आहेत. ‘निवडणूकहनन कथानका’वर ट्रम्प यांच्या समर्थकांचा गाढ विश्वास आहे आणि कॅपिटॉल इमारतीवरील हल्ल्याला त्यांचा आजही नि:संदिग्ध पाठिंबा आहे. बायडेन यांनी अडखळत्या सुरुवातीनंतर अनेक महत्त्वाची विधेयके द्विपक्षीय मतैक्यातून महत्प्रयासाने काँग्रेसमध्ये संमत करवली. याच काँग्रेसमध्ये उद्या ट्रम्प समर्थकांचे प्राबल्य प्रस्थापित झाले तर वातावरण बदल, आरोग्यविमा, स्थलांतरित अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यांची कोंडी केली जाईल. ज्या दिवशी डेमोक्रॅट्सच्या प्रभावाखालील कॅलिफोर्निया राज्यात पेट्रोलियम वाहनांवर २०३५ पासून पूर्ण बंदी घातली जाते, त्याच दिवशी रिपब्लिकन प्रभावाखालील टेक्सास राज्यात गर्भपात बेकायदा ठरवला जातो.. अशा दुभंगलेल्या अमेरिकेत ट्रम्प विचारसरणीला थोडेही झुकते माप मिळाले, तर लोकशाहीचा कडेलोट होईल असा अगतिक इशारा बायडेन देतात.