अमेरिकेच्या आकाशात काही काळ स्थिरावलेला चिनी फुगा वा बलून नक्की कोणत्या कारणासाठी तेथे धाडण्यात आला होता हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा बलून हेरगिरी करण्यासाठी आणि अमेरिकी संदेशवहनातील गोपनीय माहिती टिपण्यासाठीच पाठवला होता असे अमेरिकी प्रशासनाचे मत आहे. या मुद्दय़ावर चीनचा निषेध करणारा ठराव अमेरिकी प्रतिनिधिगृहात पूर्ण मतैक्याने संमत झाला, हे उल्लेखनीय. हा बलून ज्या वेळी पहिल्यांदा अमेरिकेत मोंटाना राज्यातून दिसू लागला, त्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन चीनच्या दौऱ्यावर निघणार होते. त्यांनी तो दौराच रद्द करून टाकला, कारण जो बायडेन प्रशासनाने चीनच्या कथित बलून घुसखोरीची गंभीर दखल घेतली. हा बलून एखाद्या युरोपीय देशाचा असता किंवा जपान, द. कोरिया वा अगदी भारताकडून तेथे भरकटला असता (यांच्यापैकी कोणत्याही देशाने अन्यथा असा प्रकार मुद्दामहून करण्याची शक्यता कमीच) तरी त्याची अशा प्रकारे दखल घेतली गेली नसती. चीनच्या बाबतीत हे संभवत नाही. अलीकडच्या काळात चीनची कोणतीही कृती संशयातीत राहू शकत नाही. बलूनच्या अस्तित्वामागे काही तरी काळेबेरे असल्याच्या संशयावरून यथावकाश अमेरिकेने तो खास लढाऊ विमाने धाडून पाडला. हा बलून वातावरणाविषयी अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आला होता. तो भरकटला, असा चीनचा दावा. तो अतिशय हास्यास्पद असाच. आकाशात सद्हेतूने सोडलेल्या परंतु काही कारणास्तव इतर देशाच्या हवाई क्षेत्रात भरकटलेल्या कोणत्याही वस्तूविषयी माहितीवजा खुलासा तातडीने प्रसृत करण्याचे संकेत आहेत. भरकटलेली अशी एखादी वस्तू हवाई वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकते. संदेशवहन यंत्रणेमध्ये अडथळे आणू शकते. हवेत तरंगत राहण्यासाठीचे इंधन संपुष्टात येऊन अशी वस्तू जमिनीवर कोसळल्यास ती नागरी वस्तीसाठी हानीकारक ठरू शकते. एरवी अमेरिका, रशिया किंवा चीनसारखी सामरिक तंत्रज्ञानदृष्टय़ा प्रगत राष्ट्रे उपग्रहांच्या माध्यमातून टेहेळणी आणि हेरगिरी करतच असतात. कारण पृथ्वीभोवतालचे अवकाश अद्याप तरी विशिष्ट देशाच्या मालकीचे झालेले नाही. पण हवाई क्षेत्राबाबत असे म्हणता येणार नाही. तेव्हा चीनचा बलूनविषयीचा दावा जितका हास्यास्पद, तितकीच या संपूर्ण घडामोडीतली त्याची भूमिका संशयास्पद.
कारण ‘निअर-स्पेस’ किंवा हवाई क्षेत्र व अंतराळ क्षेत्राच्या मधोमध असलेले अवकाश (पृथ्वीपासून साधारण ८०,००० ते १,२०,००० फूट उंचीवर) हे बडय़ा सत्तांमधील नवे रणांगण ठरू पाहात आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, सौरऊर्जेवर उडणारे ड्रोन, अतिउंचीवर उडणारे बलून ही या संभाव्य नव्या युद्धक्षेत्रातली शस्त्रे आणि उपकरणे. भारतासह जवळपास ४० देशांच्या आकाशात चीनकडून अशा प्रकारे बलून सोडण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने केला आहे. अमेरिकेच्या तीन अण्वस्त्रागारांपैकी एक मोंटाना राज्यामध्ये आहे. त्यामुळे अशा राज्यावर बलून आढळणे ही सामान्य बाब अजिबातच नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे. अमेरिकी संरक्षण विभाग ‘पेंटॅगॉन’च्या मते हा बलून सामरिक महत्त्वाच्या भूभागांवरून पद्धतशीरपणे परिचालित करण्यात येत होता. वास्तविक अशा प्रकारे बलून किंवा विमानांच्या माध्यमातून टेहेळणी अमेरिकेनेही विशेषत: शीतयुद्धाच्या काळात केल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे सध्या यानिमित्ताने तळतळाट करणाऱ्या अमेरिकेने त्या वेळी तक्रारदार देशांच्या भावनांना किती भीक घातली होती, याची उजळणी करणे समयोचित ठरेल. या बलूनमध्ये अँटेना, संवेदके आदी उपकरणे आढळून आली असून, त्यांचे काम माहिती गोळा करण्याचेच होते, असे ‘पेंटॅगॉन’ने म्हटले आहे. बलून पाडला गेल्यानंतर त्यांतील ऐवजाचे प्रत्यक्ष पृथक्करण अद्याप झालेले नाही. बलून टेहेळणी झालेल्या ज्या देशांचा उल्लेख अमेरिकेने केला, त्यांत भारताचेही नाव घेतले गेले. परंतु मग भारत किंवा जपान या देशांमध्ये तुलनेने प्रगत रडार यंत्रणा असूनही त्यांना बलूनचा मागमूस का लागला नसावा, हा प्रश्न अनुत्तरित ठरतो. क्षी जिनिपग यांच्या नेतृत्वाखालील ‘नव्या’ चीनसाठी कोणतीच घुसखोरी नवी नाही. जमिनीवरून, सागरमार्गे घुसखोरी करत इतर देशांच्या किंवा निर्लष्करी भूप्रदेश-जलभागावर स्वामित्व सांगून अरेरावी करण्याचा पायंडा या देशाने गेली काही वर्षे पाडलेला आहे. त्या धोरणात आता हवाई घुसखोरीचा तिसरा आयाम समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेने किमान बलून पाडण्याची हिंमत तरी दाखवली. तशी ती सध्या पृथ्वीतलावरचे फारच थोडे देश दाखवू शकतात, हे चीनने ओळखलेले असेलच. त्या थोडय़ा देशांमध्ये भारतही असेल ही खबरदारी आपल्या नेतृत्वाने घेणे आवश्यक ठरते!