युक्रेनच्या फौजांसमोर काही लढायांमध्ये रशियाची होत असलेली पीछेहाट आणि क्रिमियाला रशियाशी जोडणाऱ्या केर्श पुलाची नासधूस करणारा ८ ऑक्टोबर रोजीचा बॉम्बस्फोट या दोन घटनांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन बिथरल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. १० ऑक्टोबर रोजी म्हणजे सोमवारी सकाळपासून युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरांवर ज्या प्रकारे क्षेपणास्त्रे हल्ले सुरू झाले, ते पुतिन यांच्या नैराश्यसंतापाचा पुरावाच ठरतात. २४ फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमणाला सुरुवात झाल्यापासून प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणावर आणि त्यातही कीव्हच्या मुख्य भागावर अशा प्रकारे हल्ले झाले. हे युद्ध किंवा रशियाच्या भाषेत कारवाई त्या देशाला प्रचंड खर्चीक ठरत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. तरीही दिवसभरात जवळपास ८३ क्षेपणास्त्रे – तीही विविध माध्यमांतून – डागण्यातून रशियाचे सामथ्र्य दिसते की अगतिकता याचा या क्षणी तरी केवळ तर्कच बांधता येऊ शकतो. रशियाच्या समीप असलेले खारकीव्ह आणि पोलंडच्या समीप असलेले ल्विव अशा सुदूर पूर्व व सुदूर पश्चिमेकडील शहरांदरम्यान विशाल टापूला रशियाने लक्ष्य केले. कीव्हमध्ये अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांनी मोठे नुकसान केले. युक्रेनची ऊर्जानिर्मिती केंद्रे आणि जनता हे या हल्ल्यांचे लक्ष्य प्राधान्याने होते. तरीही हे हल्ले अचूक मात्र नव्हते. पाश्चिमात्य माध्यमे आणि विश्लेषकांच्या मते रशियाच्या ताब्यातील जवळपास ७० टक्के क्षेपणास्त्र साठा त्या देशाने आतापर्यंत वापरलेला आहे. ही एकाच वेळी उत्साह आणि चिंता वाढवणारी बाब. क्षेपणास्त्र हल्ल्यांनी, चार प्रांत एकतर्फी तोडूनही युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शरणागती न पत्करता चिवटपणे प्रतिकार सुरूच ठेवला तर शेवटचा उपाय म्हणून रशिया आणखी विध्वंसक पर्यायांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुतिन यांनी एकापेक्षा अधिक वेळ अण्वस्त्र पर्यायाविषयी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बोलून दाखवले आहे. त्यांची चिडचिड जोखणे अवघड नाही. बऱ्याच अवधीनंतर रशियामध्ये युद्धविरोधी जनमत प्रकट होऊ लागले आहे. शिवाय रशियाच्या तथाकथित अजस्र लष्करी सामर्थ्यांसमोर त्यांना हव्या ते वेळेत आणि हव्या त्या प्रमाणात युक्रेनचा पराभवही झालेला नाही. आज परिस्थिती अशी आहे, की क्रिमियाव्यतिरिक्त युक्रेनच्या दक्षिण व आग्नेयेकडील चार प्रांतांवर दावा सांगून युद्ध थांबवण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर राहिलेला नाही. कारण हे प्रांत तसेच जमल्यास क्रिमिया रशियाच्या ताब्यातून मुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्याइतका युक्रेन कणखर बनला आहे. परंतु निव्वळ हे युद्ध कोण जिंकते वा हरते इतपत चर्चा सीमित राहू शकत नाही. जीवितहानी, वित्तहानी, पर्यावरणहानी आजही प्रचंड होत आहे. युक्रेनमध्ये व युक्रेनबाहेर, युरोपात आणि युरोपबाहेरही. दोन देशांच्या या संघर्षांत उर्वरित विश्वातील जबाबदार देश केवळ बघ्याच्या भूमिकेत राहू शकत नाही. युक्रेनला क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तातडीने पुरवण्याची जितकी गरज आहे, तितकीच गरज या दोन्ही देशांना चर्चेच्या मेजावर आणण्याचीही आहे. पुतिन यांचा कल अधिकाधिक आत्मघातकी निर्णय घेण्याकडे झुकत असल्याचे दिसून येते. त्यांच्याशी कोणीतरी बोलण्याची गरज आहे. अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन, तुर्कस्तान आणि भारत यांनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे. रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले हा त्या दृष्टीने इशारा ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा