मिग-२१ प्रकारातील लढाऊ विमानांना होणारे अपघात आणि त्यांत अनेकदा होणारे वैमानिक अधिकाऱ्यांचे मृत्यू ही ‘नित्याची बाब ठरू लागणे’ याच्याइतकी शोकान्तिका नाही. एखादी समस्या नित्याची ठरू लागल्यावर तिचे महत्त्व कमी होण्याचा धोका असतो. त्यातून निराकरणाकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही संभवतो. ते अधिक धोकादायक आणि क्लेशकारक. कारण आणखी किती वैमानिकांचे जीव गमवावे लागणार हा प्रश्न. मिग-२१ लढाऊ विमानांचे अपघात गेली अनेक वर्षे सातत्याने होताहेत. त्यांच्या दुर्घटनांचा दर चिंताजनकरीत्या वाढलेला आहे. इतका, की या विमानांचे वर्णन गेली काही वर्षे ‘फ्लाइंग कॉफिन’ किंवा ‘विडो मेकर’ असे केले जाते. त्यांचे गांभीर्य कळावे यासाठी आकडेवारीकडे वळावे लागेल. काही आकडे धक्कादायक आहेत. गेल्या ६० वर्षांत मिग विमानांच्या जवळपास ४०० अपघातांमध्ये २०० वैमानिकांचे आणि ६० नागरिकांचे प्राण गेले आहेत. मिग हे १९६३ मध्ये भारतीय हवाईदलात दाखल झालेले पहिले स्वनातीत लढाऊ विमान. कित्येक वर्षे हे विमान हवाईदलाचा कणा मानले जायचे. आजही मोठय़ा प्रमाणावर आपण मिगवर अवलंबून आहोत. पण जर ६० वर्षांपूर्वीच्या मोटारीही आपल्या रस्त्यावरून धावू शकत नाहीत; मग ही जुनाट विमाने (त्यांचे नूतनीकृत अवतार नंतरच्या काळात दाखल झालेले असले तरी) आपण अजून का वापरतो आहोत? याला अगतिकता आणि बेफिकिरी अशी दोन्ही कारणे आहेत. आपल्या दृष्टीने डोकेदुखीची बाब म्हणजे भारताचे दोन्ही शत्रू अक्षरश: आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यामुळे हवाई लढाईसाठी आपल्याकडे लढाऊ विमानांच्या किमान स्क्वाड्रन (तुकडय़ा) सुसज्ज ठेवाव्याच लागतात. सध्याच आपल्याकडे ४२ स्क्वाड्रनची गरज असताना ३२ स्क्वाड्रनच तैनात आहेत. मिग-२१ विमानांच्या शेवटच्या चार स्क्वाड्रन २०२५ पर्यंत निवृत्त केल्या जातील. म्हणजे आणखी चार वर्षे यांतील काही विमानांना अपघात होतच राहाणार, हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या चार स्क्वाड्रन निवृत्त झाल्यानंतर नवीन विमाने तितक्या तातडीने दाखल होणार का, हा आहे. त्या आघाडीवर आपल्याकडील सर्वपक्षीय सरकारांनी वर्षांनुवर्षे अक्षम्य अनास्था दाखवलेली आहे. मिग-२१ विमाने टप्प्याटप्प्याने मोडीत काढावी लागणार ही जाणीव कित्येक वर्षांपूर्वीची आहे. पण त्यांच्या बदल्यात नवीन विमाने देशांतर्गतच बनवावीत, की आयात करावीत याविषयीचे निर्णय वर्षांनुवर्षे रखडले. देशांतर्गत भारतीय बनावटीच्या तेजस या छोटय़ा लढाऊ विमानांचा निर्मिती कार्यक्रम अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक काळ रेंगाळला. म्हणजे विमाने बाहेरूनही येत नाहीत आणि देशातही बनत नाहीत अशा कोंडीत अडकलेल्या हवाईदलाला मिग-२१ विमाने वापरण्यावाचून पर्याय नव्हता. या विमानांनी १९६५ आणि १९७१च्या युद्धात आणि नंतरही अतिउंचीवरील हवाई लढायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अगदी अलीकडे बालाकोट प्रतिहल्ल्यानंतर काश्मीर हद्दीजवळ झालेल्या हवाई चकमकीत अभिनंदन वर्धमान यांच्या मिग-२१ या तुलनेने जुन्या आणि छोटय़ा विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ या आधुनिक विमानाचा यशस्वी सामना केला होता. परंतु जुनाट सुटे भाग, दिशादर्शन आणि संपर्काची कालबाह्य उपकरणे, कालबाह्य सुरक्षाविषयक प्रणाली, काही प्रमाणात प्रशिक्षणातील त्रुटी या घटकांमुळे मिग-२१ विमानांची अपघात मालिका सुरूच आहे. त्यामुळे कायमची मूठमाती मिळावी अशी आर्त हाक आता या ‘शवपेटय़ाच’ देऊ लागल्या आहेत!

Story img Loader