‘अब की बार सौ पार’ हा नारा राजकीय प्रेरणेने भारलेला वाटू शकतो. पण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी तो वेगळय़ा अर्थाने आव्हानात्मक होता. यंदा हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये शंभर पदके मिळवण्याचे उद्दिष्ट क्रीडा क्षेत्र आणि सरकारने ठेवले होते. या सरकारची सगळीच उद्दिष्टे सफल होताहेत असे नव्हे. शिवाय तसे पाहता क्रीडा क्षेत्रामध्ये सरकारच्या अस्तित्वाचे प्रयोजन नाही. तरीही शंभर पदकांचे लक्ष्य निश्चित करण्यात विद्यमान सरकारने पुढाकार घेतला आणि ते सुफळ गाठून दाखवले, याबद्दल त्यांचे अभिनंदन. तितक्याच उच्चरवात ते करावे लागेल पदकविजेते खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि कुटुंबीयांचे. बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भारताची कामगिरी हा कित्येक वर्षे कुचेष्टेचा विषय बनून राहिला होता. याचे कारण आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये निव्वळ नैसर्गिक गुणवत्तेतून खाशाबा जाधव, मिल्खा सिंग किंवा पी. टी. उषा उभ्या राहतात. पण तेवढय़ापुरत्याच. नैसर्गिक गुणवत्तेला अद्ययावत प्रशिक्षण आणि साहित्याची गरज असते. तितकीच हल्लीच्या काळात या सगळय़ाला मानसिक तयारीचीही जोड लागते. बॅडिमटन, टेबल टेनिससारख्या खेळांमध्ये चीनचा वर्षांनुवर्षांचा वरचष्मा. त्यांच्यासमोर उभे राहायचे आणि जिंकायचे, तर निव्वळ कौशल्यात्मक आणि शारीरिक तयारीने भागण्यासारखे नसते. तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरिया ही महासत्ता म्हणून ओळखली जाते. त्यांचे तिरंदाज कोणत्याही स्पर्धेत जेत्यांच्या आत्मविश्वासानेच उतरतात. त्यांच्या विरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी करून सुवर्णपदके जिंकणे ही साधारण बाब नव्हे. आपल्या खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत हे करून दाखवले. त्यामुळेच यंदाच्या हांगझो आशियाई स्पर्धामध्ये भारताने २८ सुवर्णपदकांसह १०७ पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.
तसे पाहता आशियाई स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धापेक्षाही अधिक आव्हानात्मक असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे चीन, जपान, दक्षिण कोरिया या तीन बलाढय़ देशांच्या बरोबरीने कझाकस्तान, उझबेकिस्तान, इराण या देशांचा या स्पर्धेत समावेश असतो. हे सर्वच देश एकापेक्षा अधिक खेळांमध्ये वर्षांनुवर्षे दबदबा निर्माण करून आहेत. चीनसाठी यंदा घरची स्पर्धा होती. त्यांनी तर सुवर्णपदकांचे द्विशतक आणि एकूण पदकांचे त्रिशतक गाठून दाखवले. त्यांच्यापाठोपाठ दक्षिण कोरिया आणि जपाननेही प्रत्येकी जवळपास दोनशेच्या आसपास पदके मिळवली. त्यांच्याशी बरोबरी करणे आपल्याला तूर्त शक्य नाही. पण कझाकस्तान, उझबेकिस्तान, थायलंड, इराण, मलेशिया यांना आपण मागे सोडले. गेल्या अनेक स्पर्धामध्ये आपण पहिल्या पाचात येत नव्हतो. यंदा चौथ्या क्रमांकावर झळकलो. २०१८मध्ये जाकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत भारताने १६ सुवर्णपदकांसह ७० पदके मिळवली होती. त्या वेळची ती विक्रमी कामगिरी होती. यंदा आपल्या खेळाडूंच्या झपाटय़ासमोर ती फिकी पडली.
या स्पर्धेत भारतीय यशोगाथा अनेक आहेत. सेपक टकरॉ, रोलर स्केटिंगसारख्या खेळांमध्ये भारताने पदके मिळवली. घोडेस्वारीसारख्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्स आणि नेमबाजी या प्रकारांमध्ये भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली. मराठमोळय़ा अविनाश साबळेने ३००० मीटर्स स्टीपलचेस प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिक विजेत्या आणि जगज्जेत्या नीरज चोप्राचे भालाफेकीतील सुवर्णपदक काहीसे अपेक्षित; तर बॅडिमटन दुहेरीमध्ये सात्त्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टीचे सुवर्णपदक पूर्णपणे अनपेक्षित. ओजस देवतळे या आणखी एका मराठी खेळाडूने तिरंदाजीमध्ये तिहेरी सुवर्णपदक जिंकून दाखवले. सुतीर्था मुखर्जी आणि ऐहिका मुखर्जी यांनी टेबल टेनिसमध्ये चीनच्या जगज्जेत्या जोडीला पराभूत करून पुढे कांस्यपदक जिंकले. ५००० मीटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये पारुल चौधरीने अखेरच्या टप्प्यात जपानी प्रतिस्पध्र्याला मागे टाकत सुवर्णपदक जिंकलेले आपण पाहिले. हे यश एका वर्षांतले नाही. यासाठी केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणात मदत केली हे मान्य करावे लागेल. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’सारख्या (टॉप्स) योजनांतून खेळाडूंचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, समुपदेशन यांसाठी निधी कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. यामुळेच आज नीरज चोप्राप्रमाणेच अविनाश साबळेही परदेशात प्रशिक्षण घेत असतो आणि तिरंदाजीसारख्या खेळामध्ये कोरिया आणि इटली येथून प्रशिक्षक मागवले जातात. खेळाडूंचा खुराक, परदेशी स्पर्धामध्ये झळकण्याच्या संधी यावरही बारकाईने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे काही खेळांमध्ये अजूनही संघटनात्मक बजबजपुरी आणि अजागळपणा असला, तरी त्याचा फटका खेळाडूंना बसणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. यामुळेच आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धामध्ये आपल्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. तसेच हांगझो एशियाडपाठोपाठ आता पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही आपण नवी उंची गाठू, असा विश्वास बाळगता येतो.