भारत, चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी कधीही विकसनशील देशांचा समूह बनवण्याविषयी एकत्रित किंवा स्वतंत्रपणे विचार केला नव्हता. त्यांच्यातील आर्थिक प्रगतीचा किंवा क्षमतेचा समान सूत्रसम धागा सर्वप्रथम दिसला, गोल्डमन साक्स या वित्तीय संस्थेचे अर्थज्ञ जिम ओनील यांना. पण ही गोष्ट २००१ मधली. चीन, भारत, ब्राझील आणि सोव्हिएत विघटनोत्तर रशिया हे आकाराने अजस्र देश. शिवाय आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरणाच्या शिडीद्वारे बाजारकेंद्री, व्यापाराभिमुख अर्थव्यवस्थेमध्ये उतरल्यामुळे त्यांची क्षमता आणि ‘वजन’ नोंद घेण्याइतके लक्षणीय होते. तेव्हा या देशांना ब्रिक्सविषयीचा ‘सामूहिक साक्षात्कार’ झाला तोच मुळी दुसऱ्याच्या नजरेतून. तोही निव्वळ आर्थिक कारणांपुरता. पुढे या गटाला दक्षिण आफ्रिका येऊन मिळाला, जो आफ्रिकी असूनही मूळचा श्रीमंत देश. हे देश त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या जोरावर नजीकच्या भविष्यात प्रस्थापित महासत्तांना आव्हान देऊ लागतील, असे भाकीत ओनील यांच्यासारख्यांनी व्यक्त केले होते. ते वेगवेगळय़ा कारणांनी प्रत्यक्षात उतरू शकले नाही. व्लादिमिर पुतिन यांच्या आधिपत्याखालील मुर्दाड आणि आक्रमक रशिया, तसेच क्षी जिनपिंग यांच्या अमदानीतील विस्तारवादी आणि मुजोर चीन या देशांनी समन्यायी आर्थिक विकासाच्या ब्रिक्सच्या मूळ संकल्पनेलाच नख लावले. ब्रिक्समधील मूळ पाच देशांची तोंडे पाच दिशांना आहेत आणि त्यांचे हितसंबंध, उद्दिष्टे भिन्न आहेत. तरीही या गटाला समान चलन आणि विस्ताराची स्वप्ने पडतात हा या देशांचा धोरणात्मक दृष्टिदोषच! कारण या गटातील दोन देश – भारत व चीन यांच्यातील सीमावाद नव्याने आणि रक्तलांच्छित माध्यमातून उफाळून आला आहे. या दोन देशांचे राष्ट्रप्रमुख तर ब्रिक्सच्या व्यासपीठावरही परस्परांशी एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि असे अवघडलेपण घेऊन तरीही सहकार्याच्या योजना कशा काय चर्चिल्या जाऊ शकतात? बरे हे दोघे किमान एकत्र येतात तरी. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना तीही सोय नाही. कारण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलेले आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा