अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सरकारविरोधात उठावसदृश हल्ल्याला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवून, भविष्यात कोणतेही सरकारी पद (यात राष्ट्राध्यक्षपदही आले) भूषवण्यास अपात्र ठरवणारा निकाल कोलोरॅडो राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. गेल्या खेपेला अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लगेचच ६ जानेवारी २०२१ रोजी शेकडो ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटॉल इमारतीवर हल्ला चढवला होता. त्या वेळी त्या इमारतीत असलेल्या सेनेट आणि प्रतिनिधिगृह या अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताबदलास अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु ‘मतदान नव्हे दरोडा’ या सोयीस्कर अपप्रचाराने बेभान झालेल्या जमावाने अमेरिकी लोकशाहीच्या प्रतीकस्थळांवरच हल्ला चढवला. या हल्लेखोरांना ट्रम्प यांची चिथावणीच होती असे नव्हे, तर ‘शाब्बास रे माझ्या बहाद्दरांनो. तुमचा अभिमान वाटतो’ या आशयाचे कौतुकोद्गारही ट्रम्प यांनी जाहीरपणे आणि समाजमाध्यमांवर व्यक्त केले होते. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने ४ विरुद्ध ३ अशा मताधिक्याने ट्रम्प यांना दोषी ठरवताना, अमेरिकी संविधानातील चौदाव्या घटनादुरुस्तीच्या अनुच्छेद – ३ चा आधार घेतला. संविधान आणि सरकार व सरकारी आस्थापनांना पाठबळ देण्याची शपथ घेतल्यानंतर त्याच बाबींविरोधात उठाव करणारी, उठावास चिथावणी वा समर्थन देणारी व्यक्ती कोणतेही सरकारी वा सांविधानिक पद भूषवण्यास अपात्र ठरते, असा उल्लेख या अनुच्छेदात आहे. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना, त्याच राज्यातील या प्रकरणाचा आधीचा निकाल रद्द ठरवला. त्या न्यायालयाने ‘अनुच्छेद मसुद्यात अध्यक्ष असा थेट उल्लेख नाही’ किंवा ‘अध्यक्ष तर संविधानाचे रक्षण करतात, पाठबळ असा उल्लेख तेथे कुठे आहे’ अशा अनेक विनोदी मुद्दय़ांवरून ट्रम्प यांना संशयाचा फायदा दिला होता. पण ट्रम्प सकृद्दर्शनी दोषी असल्याचे त्याही न्यायालयाने म्हटले होतेच. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा ट्रम्प यांना आहे. तोवर म्हणजे ४ जानेवारीपर्यंत आपला निकाल कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या निकालाला ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील, हे नक्की. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित राहील.
या निकालाचे विविध पैलू आहेत. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश डेमोक्रॅटिक पक्षाने नियुक्त केले आहेत. याउलट सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकन पक्षाने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचे प्राबल्य आहे. तेथे नऊपैकी सहा न्यायाधीश रिपब्लिकन-नियुक्त असून, त्यांपैकी तिघांची नियुक्ती तर ट्रम्प यांनीच केली आहे. अमेरिकेतील सध्याच्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये प्रत्येक न्यायालयाची कृतीही राजकीय भिंगातून तपासली जात आहे. कोलोरॅडो न्यायालयाने त्या राज्याचे ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ अर्थात मुख्य सचिवांना रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडफेरीतही (प्रायमरीज) ट्रम्प यांना सहभागी करू नये, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामध्ये अध्यक्षीय निवडणुकीचा उल्लेख नाही. परंतु त्या निवडणुकीचा मार्ग ‘प्रायमरीज’मधूनच जातो. त्यामुळे किमान एका राज्यातून ट्रम्प यांना प्रायमरीज लढवण्यास मज्जाव होऊ शकतो.
ट्रम्प अध्यक्षीय निवडणूक लढवू शकतात की नाही, त्यांच्यावर सुरू असलेल्या काही खटल्यांमुळे त्यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते का, असे प्रश्न गेले अनेक महिने उपस्थित केले जात आहेत. राजकीय पटलावर स्थिती अशी आहे, की रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धीच नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प हेच अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभे राहण्याची शक्यता ९९ टक्क्यांच्या आसपास आहे. विद्यमान स्थितीचा विचार करता ते दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता जो बायडेन यांच्या तुलनेत किंचित अधिक आहे. बायडेन यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक मतदार आणि पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी यांची नाराजी मूळ धरू लागली आहे. सद्य:स्थितीत कुंपणावरील मतदार आपल्याकडे खेचून आणण्याची बायडेन यांची कुवत नाही. तेव्हा लोकशाही प्रतीकेच झुगारून देण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती बाळगणारे ट्रम्प किमान कायद्याच्या कचाटय़ात अडकून तरी अपात्र ठरू शकतील का, याविषयी लोकशाही हितचिंतकांमध्ये हुरहुर आहे. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने त्या दिशेने आशेचा किरण दाखवला आहे. अमेरिकेतील किमान दोन डझन राज्यांच्या सर्वोच्च न्यायालयांमध्ये ‘संविधान व सांविधानिक प्रतीकांविरोधात उठाव’ या गंभीर आरोपांखाली खटले दाखल झाले आहेत. यांतील एक किंवा आणखी काही न्यायालयांकडून कोलोरॅडोसदृश निकाल दिला जाण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयास त्याची दखल घ्यावी लागेल आणि ट्रम्प यांच्या राजकीय कारकीर्दीला नवे वळण मिळू शकेल. कोलोरॅडो निकालाचा हाच आशादायी मथितार्थ.