सत्तासोपान साधण्यासाठी स्वप्नरंजनाइतका दुसरा खात्रीचा मार्ग असूच शकत नाही, हे आधुनिक नेत्यांपैकी ज्यांनी फार आधी हेरले अशांचे इटलीचे नुकतेच दिवंगत झालेले माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी हे आद्य मेरुमणी. निवडणुकीतून निवडून आलेले, तरी लोकशाहीविषयी तिटकारा वागवणारे रशियाचे पुतिन, हंगेरीचे ओर्बान, ब्राझीलचे बोल्सेनारो, इस्रायलचे नेतान्याहू, तुर्कीचे एर्दोगान आणि अमेरिकेचे ट्रम्प या मांदियाळीतले बर्लुस्कोनी हे आदिपुरुष. तरुण मतदार, उद्योजक, माध्यमे यांच्यावर गारूड करून उत्तम, उन्नत (पण उदात्त नव्हे) पदरात पाडून घेण्याचे त्यांचे तंत्र हल्लीच्या बाजारकेंद्री व्यवस्थापन अभ्यासक्रमात ‘केस स्टडी’ म्हणून सहज खपून जाण्यासारखे. बर्लुस्कोनी यांनी निवडणुका लढवल्या, मात्र त्यांनीच स्थापलेल्या ‘फोर्झा इटालिया’ या पक्षाला कधीही स्वबळावर सत्तेत राहता आले नाही. पण आघाडय़ा बांधण्यासाठी मित्रपक्षांचा शोध आणि दोनेक विवाह जमवून-मोडून तरीही वयाच्या ऐंशीव्या वर्षीपर्यंत ललनांचा शोध यासाठी आवश्यक राजकीय चतुराई आणि मदनबाधामृत ठायी असलेले हे अद्भुत रसायनच.

बर्लुस्कोनींच्या निधनानंतर जाहीरपणे एकही उणा शब्द इटलीत तरी काढला जात नाही, अशी स्थिती आहे. यामागचे कारण बर्लुस्कोनींच्या चांगुलपणात नव्हे, तर राजकारणाची नवी शैली रुजवण्याकामी त्यांनी मिळवलेल्या यशामध्ये, इटलीतील सध्याचे सरकार अतिउजव्यांचे आणि इटलीतील सार्वजनिक जीवन बर्लुस्कोनींच्या काळात होते तितकेच गढुळलेले या सद्य:स्थितीमध्ये शोधावे लागेल. ‘मीच तुम्हाला चांगले दिवस दाखवणार’ अशा बेफाट प्रचाराच्या बळावर १९९४ मध्ये बर्लुस्कोनी यांचा ‘फोर्झा इटालिया’ पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा ठरला. समाजवादी धोरणांमुळेच इटलीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून मी देशाला यातून बाहेर काढणार, यावर बर्लुस्कोनींच्या प्रचाराचा भर होता. मात्र त्यांचा पहिला सत्ताकाळ अवघे सात महिने टिकला, कारण उद्योग आणि प्रसारमाध्यमांच्या मालकीतून गडगंज पैसा कमावणाऱ्या बर्लुस्कोनींनी कर-अधिकाऱ्यांना दिलेल्या लाचेची अनेक प्रकरणे विरोधी पक्षीयांनी बाहेर काढली.. आणि सत्तेतील काही सहभागी पक्षांनीही साथ सोडली. पण पुढले पंतप्रधान लॅम्बटरे डिनी यांना बर्लुस्कोनींनी सळो की पळो करून सोडले आणि अखेर २००१ मध्ये प्रचंड बहुमतानिशी पंतप्रधानपद मिळवलेच. सत्ता- ती टिकवण्यासाठी कायदे बदलणे, प्रसारमाध्यमांचा वापर करणे आणि पुन्हा सत्ता मिळवणे हाच खरा बर्लुस्कोनींचा एककलमी कार्यक्रम. याची अंगोपांगे म्हणजे भ्रष्टाचार, स्त्रियांशी संबंध आणि ते खासगी न ठेवता जाहीरपणे पुरुषार्थ म्हणून मिरवण्याची वृत्ती, स्त्रियांबद्दल अत्यंत अनुदार आणि संकुचित मते- तीही येताजाता बोलून दाखवणे आणि प्रतिगामित्वाकडे वाटचाल सुरू राखणे, राजकीय आश्वासनांच्या पूर्ततेवर भर देण्यापेक्षा जाहिरातबाजीने आणि प्रसारमाध्यमांना हाताशी धरून वेळ मारून नेणे.. हे सारे खेळ २०११ आधीच बर्लुस्कोनी यांनी खेळून झाले होते. जर्मनीच्या तत्कालीन चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी युरोपची धुरा सांभाळताना या उच्छृंखल नेत्याला योग्य जागा दाखवून दिली, त्या वेळी त्यांची अत्यंत अश्लाघ्य भाषेत निर्भर्त्सना करण्यात बर्लुस्कोनीही मागे राहिले नव्हते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

इटलीचे राजकारण हे आधीपासूनच भ्रष्टाचारग्रस्त होते, त्यात बर्लुस्कोनींनी भर घातली इतकेच. अशाने समाजजीवनाची जी हानी होते, तीही झाली. राजकारणाचा दर्जा ढासळला, प्रसारमाध्यमेही बहकू लागली. ‘ला रिपब्लिका’ या वृत्तपत्राने २००९ मध्ये, पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात शरीरविक्रय करणाऱ्या महिला कशा आल्या आणि सरकारी निधीतून हा खर्च कसा झाला, याचीही सनसनाटी बातमी दिली होती. पण बर्लुस्कोनींवरील कर-भ्रष्टाचाराचा आरोप २०१२ मध्ये रीतसर सिद्ध झाला. तोवर त्यांनी पंच्याहत्तरी ओलांडली होती. मग त्यांना दहा महिन्यांच्या ‘समाजसेवे’ची शिक्षा देण्यात आली, ती भोगून पुन्हा ते प्रचाराला लागले, पण २०१८ मध्ये त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. अशाही स्थितीत बर्लुस्कोनींना युरोपीय संघाच्या पार्लमेंटमध्ये सदस्य म्हणून स्थान मिळाले.

परिणामांची तमा न बाळगता वाटेल ते बोलण्याचा स्वभाव, अंगभूत गुर्मी आणि तिला प्रचंड पैसा व अधूनमधून सत्तेची जोड, तरुणपणी शिकून नाव कमावण्यापेक्षा ‘क्रूझ शिप’वर गायक म्हणून काम करून अतिश्रीमंतांशी लागेबांधे वाढवण्याचा लटपटेपणा, याच लागेबांध्यांतून बांधकाम-व्यवसायासाठी मिळवलेले भांडवल आणि त्यातून चित्रवाणी वाहिन्यांची मालकी, असे हे रसायन होते. ‘नव्या’ इटलीचे आपणच कर्तेकरविते, असा अहंकार बर्लुस्कोनींमध्ये पुरेपूर होता. अतिउजवे पक्ष ‘फॅसिस्ट’ ठरू शकतात असे वाटत नाही का, यासारख्या प्रश्नावर ‘आम्हीच १९९० च्या दशकात ही वाट प्रशस्त केली’- असे ठार खरेखुरे उत्तर देण्याचा निर्गलपणाही होता. मुसोलिनीच्या या वारसदाराची दंतकथा त्याच्या निधनाबरोबर कदाचित संपुष्टात येईलही. परंतु असे नेते निर्माण होण्याइतपत समाजाचे, राष्ट्राचे अध:पतन होतेच कसे, हा प्रश्न मागे उरतोच!

Story img Loader