राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेली पूर्णवेळ प्रचारकाची संकल्पना परिवारातील एक महत्त्वाची संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुरू झाली ती मदनदास देवींच्या रूपाने. ते साल होते १९६९. मूळचे सोलापूरजवळच्या करमाळय़ाचे व पुणे विद्यापीठातून आधी वकिली व नंतर सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण झालेले देवी ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणून काम करू लागले व या संघटनेचा देशभर विस्तार झाला. अर्थात यात इतरांचाही वाटा होता पण देवी या सर्वाचे आदर्श. सुमारे वीस वर्षांनंतर देवींनी परिवारापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली ती भाऊराव देवरसांजवळ. तेव्हा परिवारातून संघात परत जाण्याची प्रथा पडलेली नव्हती. हेच कारण देऊन गोविंदाचार्याना संघात परत घेतले नव्हते. मात्र कायम समन्वयवादी भूमिकेत वावरणाऱ्या देवींना संघात स्थान देण्याचे सूतोवाच भाऊराव व बाळासाहेब देवरसांनी करताच मोठी खळबळ उडाली. विचारप्रवाह एक असला तरी संघात लवचीक व ताठर भूमिका घेणारे दोन मतप्रवाह आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यातल्या ताठरांनी देवींच्या आगमनाला विरोध केला तर लवचीकांनी स्वागताची तयारी दर्शवली. ज्याने बाहेरचे जग अनुभवले, त्याला आत घेतले तर फायदाच होईल असा युक्तिवाद यामागे होता. तत्पूर्वी अभाविपत असतानाच देवींनी परिवारातून सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मोरोपंत पिंगळे हे या आंदोलनाचे शिल्पकार तर देवी नियोजनकार अशी ओळख निर्माण झाली ती त्याच काळात. पडद्यामागे राहून सर्वाशी समन्वय ठेवण्याची देवींची ही हातोटी लक्षात घेऊन १९९८ ला नागपुरात झालेल्या संघाच्या चिंतन बैठकीची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ती त्यांनी व शेषाद्रींनी उत्तमरीत्या पार पाडली. यानंतर त्यांच्याकडे भाजप व संघात समन्वय राखण्याचे काम देण्यात आले. २००२ ला सुदर्शन सरसंघचालक झाले तेव्हा देवींना सरकार्यवाह करावे असा रज्जूभैय्या, शेषाद्रींचा आग्रह होता. वाजपेयींनाही हेच हवे होते. मात्र दत्तोपंत ठेंगडी, मा.गो. वैद्य, अशोक सिंघल आदींच्या विरोधामुळे देवींना सहकार्यवाह पदावर समाधान मानावे लागले. समन्वयवादी भूमिकेमुळे हे घडले याची सल देवींना अखेपर्यंत होती पण संघातील शिस्त पाळत त्यांनी याची जाहीर वाच्यता कधी केली नाही. तेव्हा देवींसह ज्यांचे नाव चर्चेत होते ते मोहन भागवत सरकार्यवाह झाले.

परिवारातील संघटना व संघ यांची संघटनात्मक ताकद समान पातळीवर आणायची असेल तर परिवारातून नेतृत्व विकसित झालेल्या व्यक्तींना संघात आणणे गरजेचे असा युक्तिवाद देवी संघाच्या अंतर्गत वर्तुळात सतत मांडत राहिले. नंतर बऱ्याच वर्षांनी भागवतांनी दत्तात्रय होसबळे व सुनील आंबेकर यांना संघात घेऊन, देवींचे म्हणणे किती योग्य होते हेच सर्वाना दाखवून दिले. वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात भाजप व संघात अनेकदा खटके उडाले. या वादाने जाहीर स्वरूप घेतले. वाजपेयींच्या काही निर्णयांमुळे संघात नाराजीची भावना निर्माण झाली. संघातला लवचीकांचा गट हा वाद वाढू नये या मताचा होता तर ताठर गटाला हे मान्य नव्हते. या अंतर्गत मतविभाजनाचा फटका भाजपला बसू नये म्हणून देवींनी बरेच प्रयत्न केले पण व्हायचे तेच झाले व २००४ च्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. हे सारे घडले ते ‘इगोक्लॅश’मुळे असे नंतर देवींनी खासगीत अनेकांकडे बोलून दाखवले. संघ व परिवारात साधारणपणे एखाद्याने क्षेत्र त्यागले की आधी केलेल्या कामाच्या ठिकाणी लुडबुड करायची नसते असा अलिखित नियम आहे. देवींनी तो कटाक्षाने पाळला पण मार्गदर्शन मागणाऱ्या कुणालाही कधी निराश केले नाही. उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरी वा व्यवसाय करून भरपूर पैसे कमावण्याची संधी सोडून त्यांनी त्या काळात खडतर म्हणून ओळखले जाणारे प्रचारकाचे जीवन स्वीकारले. तेव्हा डाव्या व काँग्रेस विचाराच्या विद्यार्थी संघटनांचा देशभर बोलबाला होता. अशा कठीण स्थितीत त्यांनी अभाविपचा विस्तार केला. ही संघटना केवळ अभिजनांसह बहुजन, मागास अशा सर्वाची आहे हा विचार राष्ट्रीय पातळीवर रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संघ असो वा परिवार, त्याचा विस्तार करायचा असेल तर सर्वसमावेशक धोरणाशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे असे ते सतत सांगायचे. मोहन भागवतांच्या नेतृत्वात नव्या चमूने संघाची धुरा हाती घेतल्यावर ते दैनंदिन कामातून बाजूला झाले. गेल्याच वर्षी त्यांचा ८० वा वाढदिवस अभाविप व इतर संघटनांनी साजरा केला. त्यांच्या मृत्यूने संघ परिवारातील एका समन्वयवादी पर्वाचा अस्त झाला आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला