राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेली पूर्णवेळ प्रचारकाची संकल्पना परिवारातील एक महत्त्वाची संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुरू झाली ती मदनदास देवींच्या रूपाने. ते साल होते १९६९. मूळचे सोलापूरजवळच्या करमाळय़ाचे व पुणे विद्यापीठातून आधी वकिली व नंतर सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण झालेले देवी ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणून काम करू लागले व या संघटनेचा देशभर विस्तार झाला. अर्थात यात इतरांचाही वाटा होता पण देवी या सर्वाचे आदर्श. सुमारे वीस वर्षांनंतर देवींनी परिवारापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली ती भाऊराव देवरसांजवळ. तेव्हा परिवारातून संघात परत जाण्याची प्रथा पडलेली नव्हती. हेच कारण देऊन गोविंदाचार्याना संघात परत घेतले नव्हते. मात्र कायम समन्वयवादी भूमिकेत वावरणाऱ्या देवींना संघात स्थान देण्याचे सूतोवाच भाऊराव व बाळासाहेब देवरसांनी करताच मोठी खळबळ उडाली. विचारप्रवाह एक असला तरी संघात लवचीक व ताठर भूमिका घेणारे दोन मतप्रवाह आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यातल्या ताठरांनी देवींच्या आगमनाला विरोध केला तर लवचीकांनी स्वागताची तयारी दर्शवली. ज्याने बाहेरचे जग अनुभवले, त्याला आत घेतले तर फायदाच होईल असा युक्तिवाद यामागे होता. तत्पूर्वी अभाविपत असतानाच देवींनी परिवारातून सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मोरोपंत पिंगळे हे या आंदोलनाचे शिल्पकार तर देवी नियोजनकार अशी ओळख निर्माण झाली ती त्याच काळात. पडद्यामागे राहून सर्वाशी समन्वय ठेवण्याची देवींची ही हातोटी लक्षात घेऊन १९९८ ला नागपुरात झालेल्या संघाच्या चिंतन बैठकीची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ती त्यांनी व शेषाद्रींनी उत्तमरीत्या पार पाडली. यानंतर त्यांच्याकडे भाजप व संघात समन्वय राखण्याचे काम देण्यात आले. २००२ ला सुदर्शन सरसंघचालक झाले तेव्हा देवींना सरकार्यवाह करावे असा रज्जूभैय्या, शेषाद्रींचा आग्रह होता. वाजपेयींनाही हेच हवे होते. मात्र दत्तोपंत ठेंगडी, मा.गो. वैद्य, अशोक सिंघल आदींच्या विरोधामुळे देवींना सहकार्यवाह पदावर समाधान मानावे लागले. समन्वयवादी भूमिकेमुळे हे घडले याची सल देवींना अखेपर्यंत होती पण संघातील शिस्त पाळत त्यांनी याची जाहीर वाच्यता कधी केली नाही. तेव्हा देवींसह ज्यांचे नाव चर्चेत होते ते मोहन भागवत सरकार्यवाह झाले.
अन्वयार्थ: संघातले समन्वयवादी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेली पूर्णवेळ प्रचारकाची संकल्पना परिवारातील एक महत्त्वाची संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुरू झाली ती मदनदास देवींच्या रूपाने.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2023 at 01:11 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyarth rashtriya swayamsevak sangha akhil bharatiya vidyarthi parishad amy