पाकिस्तानात शनिवारी पहाटे मियांवाली हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्रता फार नव्हती. हा हल्ला आमच्या सुरक्षा दलांनी यशस्वीरीत्या हाणून पाडला, असे पाकिस्तानातील हंगामी सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. प्रतिसादात्मक कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले, याबद्दल हे सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. तर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमध्ये, ‘जाँबाज’ सुरक्षाकर्मीनी पाकिस्तानची ताकद दाखवून दिली, असे सांगत कौतुक करण्याची चढाओढ सुरू आहे.
वास्तविक अशा प्रकारच्या कोणत्याही आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडावा लागणे यातच मोठी नामुष्की असते. कारण लष्करी महत्त्वाच्या आणि अत्यंत संवेदनशील आस्थापनांच्या वेशीपर्यंत दहशतवादी पोहोचणे हे गुप्तवार्ता यंत्रणेचे सर्वात मोठे अपयश असते. यानंतर हल्लेखोरांचा खात्मा केला तरी त्यात फार मर्दुमकी मिरवण्यासारखे काही नसते. कारण लष्करी तळ, आस्थापनांमध्ये सुरक्षा यंत्रणा सुसज्ज आणि सुप्रशिक्षित असते. तेव्हा पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सरकार आत्मस्तुतीत मग्न असले, तरी काही बाबींची दखल घ्यावी लागेल. ती घेतल्यानंतर परिस्थिती किती भुसभुशीत आहे याचा अंदाज बांधता येतो. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानात किमान तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असून, यात पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले होते. डेरा अली खान आणि ग्वादर येथे झालेल्या हल्ल्यांत १७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तर चौथ्या हल्ल्यामध्ये पाच नागरिकांचा बळी गेला. मियांवाली हे पंजाबमध्ये आहे. डेरा अली खान खैबर पख्तूनख़्वा प्रांतात, तर ग्वादर बलुचिस्तान प्रांतात येते. म्हणजे पाकिस्तानच्या चारपैकी तीन प्रांतांमध्ये गेल्या पाच दिवसांत दहशतवादी हल्ले झालेले आहेत. मियांवाली हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-इ-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ही संघटना तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या अत्यंत जहाल पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे. पाकिस्तानमधील काही अत्यंत भीषण आत्मघातकी हल्ले टीटीपीने घडवून आणले आहेत. टीटीपीने नेहमीच पाकिस्तान सरकारऐवजी अफगाण तालिबानशी निष्ठा राखली. त्यामुळे खैबर पख्तूनख़्वा किंवा अफगाणिस्तान सीमेपलीकडील टीटीपीच्या तळांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी हल्ले करायचे आणि त्याचा सूड म्हणून टीटीपीने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर हल्ले करायचे, हे नित्याचे झाले आहे. पाकिस्तानी राजकारण आणि लष्करातील जिहादी तत्त्वांमुळे या विध्वंसक संघटनेचा नायनाट होऊ शकलेला नाही.
जोवर हे होत नाही, तोवर पाकिस्तानात स्थैर्य नांदू शकत नाही. एकीकडे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांना, त्यांच्या काश्मीर खोऱ्यातील उपद्रवमूल्याबद्दल पाकिस्तानात राजाश्रय मिळालेला आहे. दुसरीकडे टीटीपीसारख्या संघटना पाकिस्तानातील कोणत्याही सरकारला जुमानत नाहीत, त्यामुळे शिरजोर बनू लागल्या आहेत. तालिबान हा पाकिस्तानने जन्माला घातलेला आणि पोसलेला भस्मासुर अशा प्रकारे पाकिस्तानला चटके देऊ लागला आहे. टीटीपीसारख्या संघटनेशी तह करण्याचे अतक्र्य, बिनडोक पाऊल माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी उचलले. त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. पण पाकिस्तानला याची मोठी किंमत पुढील काही वर्षे चुकवत राहावी लागेल. गेली अनेक वर्षे विविध दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात, तसेच भारतात इतरत्रही घातपाती कारवाया करण्यासाठी निधी, शस्त्रे व प्रशिक्षण पुरवणे हे पाकिस्तानचे अघोषित सरकारी धोरण होते. भारताला अप्रत्यक्ष युद्धात रक्तबंबाळ करण्याच्या नादात पाकिस्तान स्वत:च रक्तलांच्छित झाले. पाकिस्तानने पोसलेल्या विशेषत: टीटीपीसारख्या संघटनांनी सर्वाधिक लक्ष्य पाकिस्तानी आस्थापने आणि नागरिकांनाच केलेले आहे.
पाकिस्तान सध्या एका नाजूक वळणावर आहे. देशात सध्या काळजीवाहू सरकार आहे. निवडणुका होऊन लोकनियुक्त सरकार स्थापन होण्यास अद्याप किमान चार-पाच महिने जावे लागतील. पाकिस्तानी अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झालेली आहे. याही परिस्थितीत संपूर्ण पाकिस्तान सध्या विश्वचषक क्रिकेट सामने पाहण्यात मश्गूल आहे! क्रिकेट आणि काश्मीर या मुद्दय़ांवर जगणे शक्य नाही, हे कळूनही दुसरा कोणता पर्यायच समोर नसल्यामुळे आणि राजकारणी मंडळींवर फारसा विश्वास राहिलेला नसल्यामुळे पाकिस्तानी जनता गेला दिवस पुढे ढकलत आहे. ते समजू शकते. पण वारंवारचे हल्ले हे पाकिस्तानातील सर्वशक्तिमान आणि सुस्थिर अशा लष्करालाही थोपवता येत नाहीत ही धोक्याची घंटा ठरते. तशात पाकिस्तानने अफगाण निर्वासितांना हजारोंच्या संख्येने अफगाणिस्तानात धाडण्यास सुरुवात केल्यामुळे तालिबानी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सरकार व लष्कर यांच्यातील संबंध आणखी ताणले जात आहेत. दहशतवाद पेरलेल्या पाकिस्तानमध्ये याच परिस्थितीचा फायदा टीटीपीसारख्या जिहादी संघटना उठवताना दिसतात.