युक्रेन युद्ध अजूनही अनिर्णितावस्थेत असताना त्याचे चटके युक्रेनप्रमाणेच रशियालाही बसू लागले आहे. त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सध्या चीनचा भक्कम पाठिंबा मिळत असला, तरी युद्धसज्जतेसाठी तो पुरेसा नसावा अशी शंका येते. कारण दारूगोळा आणि इतर सामग्रीसाठी पुतिन लवकरच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट घेतील, असा अमेरिकी सरकार आणि तेथील माध्यमांचा होरा आहे. किम जोंग उन रशियात दाखल होतील, अशी शक्यता अमेरिकेचे संरक्षण सल्लागार जॅक सुलिव्हान यांनीच बोलून दाखवली आहे. रशियाने उत्तर कोरियाची मदत घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा इशारा त्यामुळे अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनीही दिला आहे. या संभाव्य भेटीमुळे भूसामरिक शक्यता उद्भवतात त्यांची दखल घेणे भाग पडते, इतक्या त्या गंभीर आहेत. यातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, युद्ध सुरू ठेवण्यासाठी पुतिन फारच अगतिक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत युक्रेनकडून प्रतिहल्लात्मक रेटा सुरू झाला आहे. त्याला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नसले (बहुधा यासाठीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली), तरी युक्रेनचे प्रयत्न जारी आहेत. तशात त्यांना एफ-१६ लढाऊ विमानांसारखी अत्याधुनिक सामग्रीही मिळू लागली आहे. त्या आघाडीवर रशियाची स्थिती बऱ्यापैकी दयनीय भासते. अमेरिका आणि बहुतेक आघाडीच्या पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या युद्धसामग्री आणि दारूगोळा निर्मितीवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. चीनसारख्या मित्र देशांकडून त्या आघाडीवर मर्यादेपेक्षा फार मदत होत नाही, कारण निर्बंधांची भीती चीनलाही आहेच. अशा परिस्थितीत उत्तर कोरियासारख्या, जागतिक मुख्य प्रवाहातून जवळपास पूर्णत: विलगीकरण झालेल्या आणि बेजबाबदार देशाची मदत घेणे हा एक पर्याय उपलब्ध राहतो. तो अजमावण्याची पुतिन यांची योजना असावी.

पण ती अतिशय धोकादायक ठरू शकते. किम जोंग उन भेटीबाबत रशियाने बुधवार रात्रीपर्यंत अधिकृत स्वीकार वा इन्कार केलेला नव्हता. उत्तर कोरियाकडे शस्त्रास्त्रे आहेत आणि रशियाला शस्त्रांची व दारूगोळय़ाची गरज आहे, हे समीकरण नाकारण्यासारखे नाही. शिवाय या सौद्यामध्ये रशियाकडील आण्विक पाणबुडी आणि उपग्रह तंत्रज्ञान उत्तर कोरियाकडे हस्तांतरित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाल्यास युक्रेन युद्ध चिघळेलच. शिवाय हिंदू-प्रशांतच नव्हे, तर अधिक विशाल टापूमध्ये संहारक शस्त्र समतोल बिघडेल. उत्तर कोरियाकडून शस्त्रे मिळण्याची ही पहिलीच वेळ नसेल. पुतिन पुरस्कृत वॅग्नर गटालाही उत्तर कोरियाने छोटी रॉकेट्स पुरवली होती. त्यामुळे अशाच प्रकारे रशियाकडून उत्तर कोरियाकडे आणखी मदतीची अपेक्षा व्यक्त होईल, असा अंदाज पाश्चिमात्य विश्लेषक आणि माध्यमांनी व्यक्त केला होता. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने यासंबंधी पहिल्यांदा वृत्त दिले आणि याच महिन्यात बहुधा रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्लाडिवोस्टॉक शहरात उभय नेत्यांची भेट होईल, असे म्हटले. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू हे जुलै महिन्यात उत्तर कोरियाला या भेटीसंदर्भातच जाऊन आले, असे या वृत्तात म्हटले आहे.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

युक्रेन युद्धाची आपल्या दृष्टीने यशस्वी नियोजित सांगता होत नाही हे कळल्यानंतर पुतिन एकापाठोपाठ एक चुका करू लागले आहेत. वॅग्नर म्होरक्या प्रिगोझिनचा भस्मासुर त्यांनी वाढवला नि अखेरीस प्रकरण अंगाशी आल्यानंतर संपवलाही. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियासारख्या देशाशी संधान बांधून धोरणात्मक आत्मघात करण्याकडे पुतिन वळलेले आहेत. वास्तविक उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमावर निर्बंध आणण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावास रशियानेही कधी काळी पाठिंबा दिला होता. पण एकाकी पडू लागल्यानंतर रशियाला अशाच एका एकाकी देशाची मदत घ्यावी लागत आहे. या मुद्दय़ावर चीनची भूमिका फारशी विश्वासार्ह दिसत नाही. रशियाला पाठिंबा देणाऱ्या मोजक्या देशांपैकी चीन हा प्रमुख देश. पण त्या देशाचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांना ध्रुवीकरणाच्या विश्वकारणाने पछाडले आहे. त्यामुळे उत्तर कोरियासारख्या पुंड राष्ट्राची मदत रशियाने घेतली, तरी चीन या नव्या दोस्ताला अंतर देणार नाही. तशात चीन आणि उत्तर कोरिया यांनाच लक्ष्य ठेवून अमेरिकेने नुकतीच जपान आणि दक्षिण कोरिया या देशांची मोट बांधली होती. त्यामुळे रशिया-उ. कोरिया मैत्रीला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र चीनकडून मिळेलच. अमेरिकेने लक्ष्य केलेल्या रशिया, इराण, उ. कोरिया या देशांना साथीला घेऊन पुंड देशांची एक फळीच चीन उभारू शकेल.