युक्रेन युद्ध अजूनही अनिर्णितावस्थेत असताना त्याचे चटके युक्रेनप्रमाणेच रशियालाही बसू लागले आहे. त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सध्या चीनचा भक्कम पाठिंबा मिळत असला, तरी युद्धसज्जतेसाठी तो पुरेसा नसावा अशी शंका येते. कारण दारूगोळा आणि इतर सामग्रीसाठी पुतिन लवकरच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट घेतील, असा अमेरिकी सरकार आणि तेथील माध्यमांचा होरा आहे. किम जोंग उन रशियात दाखल होतील, अशी शक्यता अमेरिकेचे संरक्षण सल्लागार जॅक सुलिव्हान यांनीच बोलून दाखवली आहे. रशियाने उत्तर कोरियाची मदत घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा इशारा त्यामुळे अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनीही दिला आहे. या संभाव्य भेटीमुळे भूसामरिक शक्यता उद्भवतात त्यांची दखल घेणे भाग पडते, इतक्या त्या गंभीर आहेत. यातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, युद्ध सुरू ठेवण्यासाठी पुतिन फारच अगतिक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत युक्रेनकडून प्रतिहल्लात्मक रेटा सुरू झाला आहे. त्याला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नसले (बहुधा यासाठीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली), तरी युक्रेनचे प्रयत्न जारी आहेत. तशात त्यांना एफ-१६ लढाऊ विमानांसारखी अत्याधुनिक सामग्रीही मिळू लागली आहे. त्या आघाडीवर रशियाची स्थिती बऱ्यापैकी दयनीय भासते. अमेरिका आणि बहुतेक आघाडीच्या पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या युद्धसामग्री आणि दारूगोळा निर्मितीवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. चीनसारख्या मित्र देशांकडून त्या आघाडीवर मर्यादेपेक्षा फार मदत होत नाही, कारण निर्बंधांची भीती चीनलाही आहेच. अशा परिस्थितीत उत्तर कोरियासारख्या, जागतिक मुख्य प्रवाहातून जवळपास पूर्णत: विलगीकरण झालेल्या आणि बेजबाबदार देशाची मदत घेणे हा एक पर्याय उपलब्ध राहतो. तो अजमावण्याची पुतिन यांची योजना असावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा