विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये धक्कादायक निकाल देणाऱ्या संघांची कमतरता नव्हती. कधी झिम्बाब्वे, कधी केनिया, कधी बांगलादेश, कधी आर्यलड इत्यादी. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी, तसेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन बडय़ा मंडळांच्या आत्मकेंद्री आणि नफाकेंद्री धोरणांमुळे कसोटी खेळणाऱ्या क्रिकेटविश्वाच्या पलीकडे क्रिकेट हे तसे वाढलेच नाही. त्यामुळे केनिया क्रिकेटमधून जवळपास नामशेष झालेला आहे. झिम्बाब्वे आणि आर्यलड हे सातत्याने प्रवाहाच्या काठावरच राहिले, तर बांगलादेशला संधी मिळूनही तिचे आजतागायत सोने होऊ शकलेले नाही. कारण खेळाची देशांतर्गत आवड या एकाच निकषावर कोणत्याही देशात एखाद्या खेळाचा विकास होऊ शकत नाही. यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न व्हावे लागतात, निधीची उपलब्धता काही वेळेस निर्णायक ठरते. तसे काही होऊ न शकल्यामुळे आणि एकदंरीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला बंदिस्त क्लबचे स्वरूप आल्यामुळे विश्वचषक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेले अनेक संघ पुढे दीर्घ वाटचालीत मागे पडले किंवा ढेपाळले. याचा एक प्रतिवाद असा केला जातो, की क्रिकेट पाहणाऱ्या-आस्वादणाऱ्या क्रिकेटप्रेमींची संख्या जगात केवळ फुटबॉलप्रेमींच्या खालोखाल गणली जाते. पण तो प्रतिवाद फसवा ठरतो. कारण क्रिकेटची लोकप्रियता अमेरिकेसारख्या देशांमध्ये पसरली ती तेथील प्राधान्याने भारतीय आणि इतर दक्षिण आशियाई स्थलांतरितांमुळे. त्यामुळेच क्रिकेट हा आजही मोजक्या देशांमध्ये खेळला जाणाराच खेळ ठरतो हेच सत्य. क्रिकेटमधील दखलपात्र नवथरांमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. तो संघ आहे अफगाणिस्तानचा. भारतात सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने आतापर्यंत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केले आहे. यांतील पहिले विद्यमान विश्वविजेते आहेत, तर बाकीचे दोन माजी विश्वविजेते. एखादा विजय धक्कादायक ठरू शकतो, दुसरा कदाचित दुर्मीळ. तीन विजय केवळ धक्कातंत्रातून मिळू शकत नाहीत आणि तितक्या विजयांकडे केवळ ‘धक्कादायक’ म्हणून पाहता येत नाही. अफगाणिस्तानच्या या विजयांची दखल घेणे त्यामुळे क्रमप्राप्त ठरते.
क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये अफगाणिस्तानचा संघ एकमेवाद्वितीय ठरतो, कारण हे क्रिकेटपटू आपल्या देशात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. याचे कारण पहिल्या तालिबान उठावानंतर काबूलमध्ये कोणतेही सरकार आले, तरी या देशास कधीही स्थैर्य लाभू शकलेले नाही. स्थैर्य नाही, त्यामुळे सुरक्षितता नाही. सुरक्षितता नाही, त्यामुळे गुंतवणूक नाही. तसेच नव्वदच्या दशकात अनेक भागांमध्ये सुरू झालेल्या टोळीयुद्धांमुळे मोठय़ा संख्येने अफगाण नागरिक पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवा प्रांतात निर्वासित म्हणून गेले. तेथे क्रिकेटच्या खेळाला अनेक अफगाण मुलांनी, युवकांनी आत्मसात केले. त्यामुळे अफगाण युवकांच्या हाती चेंडू आणि बॅट आणण्यास कारणीभूत पाकिस्तानी सरकार ठरले. पण या देशाला अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवरही सुविधा आणि आर्थिक पाठबळ पुरवण्याचे काम भारताने केले. यातून अफगाण क्रिकेटला आकार आणि ओळख मिळत गेली, याचे श्रेय भारताला द्यावे लागेल. भारताचे अफगाणिस्तानशी जुने सांस्कृतिक संबंध होतेच. दोन तालिबान राजवटींच्या मधल्या काळात ज्याप्रमाणे अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस भारताकडून भरीव मदत झाली, तशाच प्रकारची मदत भारतीय क्रिकेट मंडळाच्या औदार्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटला झाली. केवळ तेवढय़ाने भागणार नव्हते. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळणे हे कोणत्याही देशासाठी पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरते. २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा आणि २०१२ मध्ये आयसीसीचा सहयोगी सदस्य दर्जा अफगाणिस्तानला मिळवून देण्यात बीसीसीआयने पुढाकार घेतला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयच्या मदतीमुळे आणि भारत सरकारच्या परवानगीनंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने उत्तर भारतात- नोएडा, लखनऊ आणि आता डेहराडून- आपला तळ हलवला आहे. भारतीय अकादम्यांमध्ये अफगाण क्रिकेटपटूंना प्रशिक्षणही मिळते. अर्थात केवळ मदत मिळाल्यानंतर एका टप्प्यापर्यंत वाटचाल होऊ शकते. त्यापुढे कष्ट, जिद्द आणि गुणवत्ता यांचा मेळ जुळून यावा लागतो. अनेक अफगाण क्रिकेटपटूंमध्ये ही गुणत्रयी आढळून येत आहे. यामुळेच आजवर विश्वचषकात एकही सामना न जिंकलेला हा संघ आता उपान्त्य फेरीत प्रवेशाची उमेद बाळगू शकतो. बांगलादेश क्रिकेटलाही भारताकडून यापूर्वी अशीच मदत मिळाली होती. पण तुलनेने अधिक स्थैर्य लाभूनही या देशाची वाटचाल पुढे भरकटली. अफगाण क्रिकेटपटूंना सध्या आयपीएलसारख्या फ्रँचायझी क्रिकेटमधील अनुभवाचा फायदाही मिळू लागला आहे. पण त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्याइतकी गुणवत्ता हे खेळाडू दाखवतात, हे नाकारता येत नाही. अफगाणिस्तान क्रिकेटची वाटचाल त्यामुळेच आशादायक वाटते.