आधीच उल्हास असलेल्या पुणे, मुंबई आदी शहरांतील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे, इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे. त्यातही आजवर बऱ्यापैकी स्वच्छ हवा असलेल्या नवी मुंबईत यंदा हवेचे प्रदूषण वाढले असल्याचे ‘सफर’च्या अहवालावरून दिसते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाअंतर्गत देशातील विविध शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचा अभ्यास केला जातो. प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सरकारला विविध उपायही सांगितले जातात. मात्र उपाययोजना करूनही त्यामध्ये मानवनिर्मित प्रदूषणकारी कृतींमुळे ते धोकादायक पातळीपर्यंत पोहोचते. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नवी मुंबईतील हवेचे प्रदूषण ‘समाधानकारक’ गटात मोडते. याच कारणासाठी सरकारच्या स्वच्छता पुरस्कारात नवी मुंबईला तिसरा क्रमांकही मिळाला होता. मात्र तेही शहर ‘वाईट’ आणि ‘अतिवाईट’ या श्रेणीत आल्याचे ताज्या पाहणीत आढळून आले. दिल्लीने आपली ‘अतिवाईट’ ही प्रदूषणाची पातळी राखली असून त्यात आता, पंजाब व हरियाणामधील शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करण्यासाठी खरीप हंगामातील भाताची काढणी केल्यानंतर जमिनीमध्ये उरलेले अवशेष जाळले जातील. याचा परिणाम दिल्लीतील हवा अधिक प्रदूषित होण्यावर होतो. या काळात दिल्लीतील नागरिकांना श्वास घेण्यासही अडचण येण्याइतके हे प्रदूषण भयंकर असते. शहरांमधील वाढत्या वाहनसंख्येने प्रदूषणात मोठी भर पडतेच, त्यात दिवाळीतील फटाक्यांमुळेही अधिक भर पडते. पावसाळय़ात प्रदूषणाची पातळी खालावते, कारण पावसाच्या थेंबांबरोबर प्रदूषित कण भूभागावर येतात. पाऊस माघारी गेल्यानंतर तापमान थोडे जरी वाढले, तरी ते कण पुन्हा हवेत मिसळण्यास सुरुवात होते. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या अहवालात आशियातील पहिल्या दहा सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. या अहवालानुसार गुरुग्राम हे सर्वाधिक प्रदूषित शहर गणले गेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणातील धरुहेरा, तर तिसऱ्या क्रमांकावर बिहारमधील मुझफ्फरपूर शहर आहे. मात्र या दहा शहरांत काहीच वर्षांपूर्वी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीचा समावेश नाही. नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्यास मोठय़ा प्रमाणावरील वाहतूक हे प्रमुख कारण असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पुणे शहराची हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत होती, ती अवघ्या २४ तासांत वाईट या श्रेणीत पोहोचली. हवेची गुणवत्ता समाधानकारक राखणे या शहरांना अशक्य होत चालले आहे. वाहनांच्या धुरामुळे त्यात मोठी भर पडते. विजेवर चालणाऱ्या वाहनांना गेल्या काही काळात मागणी वाढली असली, तरी शहरांमधील इंधनावरील वाहनसंख्येत तेवढीच भरही पडत आहे. आधीच अपुरे असलेले रस्ते, त्यात किमान सुविधांची वानवा आणि प्रदूषणाची भर, यामुळे या शहरांमधील जीवनमानाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) हे मानक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार ५१ ते १०० एक्यूआय म्हणजे समाधानकारक गुणवत्ता, तर ३०१ ते ४०० एक्यूआय म्हणजे ‘अत्यंत वाईट’ श्रेणी. मुंबईतील एक्यूआय १४५ तर नवी मुंबईतील एक्यूआय ३०० असल्याचे पाहणीत आढळून आले असून, ही बाब भविष्यासाठी अधिक गंभीर म्हणावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा