अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा जीव गेला आणि त्याहूनही अधिक जण जबर जखमी झाले. दरवर्षी घडणाऱ्या अशा घटनांपासून कोणीच काहीच कसे शिकत नाही, असा प्रश्न सामान्यांना पडतो. परंतु प्रशासकीय यंत्रणा किती थिजलेली असू शकते, याचे प्रत्यंतर पुन्हा पुन्हा येत राहते. मागील वर्षी याच काळात अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या कुणाला अशाच पूरस्थितीमुळे जीव गमवावा लागला नाही, याचे कारण करोनाच्या साथीमुळे तेथे गेलेल्या भाविकांची संख्याच कमी होती. यंदा सगळे सुरळीत झाल्यानंतर अधिक संख्येने भाविक येतील, असा अंदाज करून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज होती, परंतु त्याबाबत प्रशासन अक्षरश: हतबल झालेले दिसले. गेल्या वर्षी भाविकांसाठी नदीपात्रात तंबू उभारण्यात आले होते, तेथेच पुराचे महासंकट उभे राहिले होते. यंदा निदान अधिक सुरक्षित जागी तंबू उभे करायचे सोडून पुन्हा तिथेच- त्याच जागी पुन्हा तंबू उभारले जाणे ही केवळ ढिलाई म्हणून सोडून का द्यावी? पूर्वानुभव असतानाही, तीच चूक पुन्हा केली गेली. पुराचे पाणी तंबूंमध्ये घुसू नये, म्हणून जे बांध बांधले गेले, त्याची उंची केवळ दोन फुटांची होती. त्यामुळे त्या बांधावरून पाणी आत शिरले आणि हाहाकार उडाला.

यापूर्वी २०१९ मध्येही भाविकांसाठीचे तंबू पूररेषेच्या बाहेर बांधले गेले होते. यंदाच्या यात्रेची तयारी करताना याचा विचार केला गेला, असे सांगण्यात येत असले, तरी तो अविचारच होता, हे ढगफुटीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीने सिद्ध केले आहे. सरकारला या यात्रेतील भाविकांच्या प्रचंड संख्येचेच फक्त आकर्षण असल्याने, त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था करताना नैसर्गिक संकटाचा विचार फारच वरवरचा केला गेला. प्रत्येक भाविकाला रेडिओ लहरींद्वारे शोधता येऊ शकेल, असे ‘टॅग’ देण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाने कोणीही हरवण्याची शक्यता राहणार नाही, असे सांगण्यात आले खरे, मात्र या दुर्घटनेत सापडलेल्या अनेकांना या टॅगद्वारे शोधता येऊ शकले नाही, कारण ते टॅग लहरींच्या परिक्षेत्रातच काम करू शकत असल्याने आणि भाविक त्याबाहेर गेल्याने, त्यांचा शोध घेणे कठीण होऊन गेले. हवामान विभागाने गेल्या वर्षी या परिसरात पर्जन्यमापक बसवले नसल्याने, यंदा नेमका किती आणि कधी पाऊस येईल, याचा अंदाज वर्तवता आला नाही. विभागाचे हे स्पष्टीकरण त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. यंदा सात-आठ लाख भाविक येतील, अशी अपेक्षा माहिती व नभोवाणी खात्याने व्यक्त केली होती. प्रत्यक्षात ८ जुलैपर्यंत १.१३ लाख जण यात्रेसाठी अमरनाथला पोहोचले होते. अमरनाथची यात्रा मुळात अवघड. अनेक भारतीयांना तेथे पोहोचणे ही जीवनाची सार्थकता वाटत असते. अशा स्थितीत येणाऱ्या प्रत्येकाची व्यवस्था नीट करणे ही स्थानिक प्रशासनाची प्राधान्यक्रमाची जबाबदारी असायला हवी. २०१३ मध्ये केदारनाथ मंदिराच्या परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या प्रलयात १९७ जणांना जीव गमवावा लागला आणि चार हजार नागरिकांचा पत्ता लागू शकला नाही. अशा घटना वारंवार घडत असताना अधिक जागरूक राहणे, हेच प्रशासनाचे काम. तेच नेमके झाले नाही आणि ज्यांनी यात्रेकरूंची काळजी घ्यायची तेच निष्काळजीपणामुळे मारेकरी ठरले.