‘स्टेट ऑफ द युनियन’ या अमेरिकी अध्यक्षांच्या वार्षिक भाषणात गत वर्षभराचे सिंहावलोकन आणि भविष्यातील दिशादर्शन अशा दोहोंचा समावेश असतो. विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचे मंगळवारी रात्री झालेले भाषण यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नव्हती. तरी या भाषणाची पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. व्हाइट हाऊसमध्ये पहिल्यांदाच विराजमान होणाऱ्या अध्यक्षाच्या दृष्टीने तेथील मध्यावधी निवडणुका या कायमच डोकेदुखी ठरत आल्या आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षाचा पक्ष अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी येणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत बहुधा नेहमीच पराभूत होतो. त्यामुळे अध्यक्ष एका पक्षाचा आणि अमेरिकी कायदेमंडळ किंवा काँग्रेस (सेनेट व प्रतिनिधिगृह अशा दोन्ही सभागृहे) दुसऱ्या पक्षाची असा तिढा पाहायला मिळायचा. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: डोनाल्ड ट्रम्पनीतीमुळे दुभंगलेल्या अमेरिकेत याचीच पुनरावृत्ती घडेल असा अंदाज होता. परंतु बायडेन यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक पक्षाने चिकाटीने प्रचार करून सेनेटमध्ये पूर्ण बहुमत मिळवले. प्रतिनिधिगृह रिपब्लिकन पक्षाकडे गेले, तरी त्यांना काठावरील बहुमत आहे. अमेरिकेच्या दुभंगलेल्या राजकीय नकाशाचे चित्र नवीन काँग्रेसमध्येही कायम राहणार असले, तरी सेनेटवरील ताबा बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

मध्यावधी निवडणुकीतील यशानंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा हुरूप बायडेन यांना वाटू लागला आहे. पुढील वर्षी अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा बायडेन आणि ट्रम्प यांच्यातच होण्याची शक्यता पूर्णत: नाकारता येत नाही. परंतु रिपब्लिकन उमेदवार कोणीही असला, तरी डेमोक्रॅटिक उमेदवाराबाबत त्या पक्षाच्या नेतृत्वाला संदेह वाटू नये याची तयारी बायडेन यांनी केल्याचे ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणावरून दिसून आले. कोविड महासाथ, युक्रेन युद्ध या दोहोंच्या धक्क्यांतून इतर जगताप्रमाणे अमेरिकाही सावरू लागली असली, तरी ही उभारी आश्वासक नाही. फेडरल रिझव्‍‌र्ह या तेथील मध्यवर्ती बँकेने व्याज दरवाढीचे सत्र अद्याप त्यागलेले नाही. सततच्या व्याज दरवाढीचा परिणाम कर्जे महागण्यात आणि आर्थिक विकास कुंथण्यात होतो. अमेरिकेत पुढील काही महिने मंदीसदृश परिस्थिती राहील, असे भाकीत गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वर्तवण्यास सुरुवात झाली होती. सध्या परिस्थिती तितकी भीषण नसली, तरी मंदीचे संकट ओसरलेले नाही. बेरोजगारीचा दर विक्रमी घसरल्याचे (५३ वर्षांतला नीचांकी – ३.४ टक्के) बायडेन सांगतात. परंतु आर्थिक सुधारणा अजूनही मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचल्या नसल्याचेही ते कबूल करतात. वातावरण बदल आणि आरोग्यसेवेविषयी बायडेन प्रशासनाने केलेल्या विक्रमी तरतुदींचा उल्लेख त्यांनी उच्चरवात केला. पायाभूत सुविधा आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांतील गुंतवणुकींमुळे भविष्यात रोजगाराला चालना कशी मिळेल, हेही बायडेन दाखवून देतात. परंतु बायडेन यांच्या बाबतीतला विरोधाभास म्हणजे, दुभंगलेल्या राजकीय परिप्रेक्ष्यात साहसी आर्थिक निर्णय घेतल्यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत म्हणावी तशी व तितकी वाढ झालेली नाही. ‘नोकऱ्या येताहेत. स्वाभिमान परततो,’ या त्यांच्या वाक्यांना सभागृहातील डेमोक्रॅट सदस्यांनी जोरदार पाठिंबा दर्शवला, पण असा पाठिंबा काँग्रेसच्या इमारतीबाहेर किती मिळेल, याविषयी बायडेन यांचे समर्थकही आश्वस्त नाहीत.

बायडेन यांचे तसे नाही. विशेषत: मध्यावधी निवडणुकीतील अनपेक्षित यशामुळे, अध्यक्षीय निवडणूक दुसऱ्यांदा लढवण्याचे त्यांनी ठरवलेले दिसते. मंगळवारचे भाषण हे त्याचे निदर्शक होते. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत प्रथमच दुभंगलेल्या काँग्रेससमोर बायडेन बोलत होते. विरोधी रिपब्लिकन पक्षीयांना सहकार्याचे आवाहन करताना, काही मुद्दय़ांवर त्यांना शिंगावर घेण्याचेही बायडेन यांनी सोडले नाही. त्यांच्या एरवीच्या नेमस्त आणि सामोपचारी वृत्तीची जागा काहीशा आक्रमक आणि जोखीम पत्करणाऱ्या आत्मविश्वासाने घेतलेली दिसून आली. चीनला दिलेला मर्यादित पण तिखट शब्दांतला इशारा वगळता, दोन देशांतील नव्याने ताणलेल्या संबंधांवर बायडेन यांनी फार भाष्य केले नाही. युक्रेनला नवीन कोणत्याही मदतीची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. निवासस्थानी गोपनीय कागदपत्रे सापडण्याचे प्रकरण, अमेरिकेत नवीन वर्षांत धक्कादायक सातत्याने घडत असलेल्या गोळीबाराच्या घटना, बडय़ा तंत्रज्ञान कंपन्यांकडून सुरू असलेली कामगारकपात अशा घडामोडींची काजळी बायडेन यांच्या कारकीर्दीवर निश्चितच आहे. पण या घडामोडींमुळे ते स्वत: बावचळलेले दिसले नाहीत. गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा हक्काचा मध्यमवर्गीय मतदार त्या पक्षापासून काहीसा दुरावल्याचे आढळले होते. पुन्हा निवडणूक जिंकायची झाल्यास या मतदाराला पुन्हा पक्षाकडे वळवणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा चीनपासून ते वाढीव करांच्या मुद्दय़ांपर्यंत रिपब्लिकन पक्षाने रान उठवायला सुरुवात केलेलीच आहे. त्या निवडणुकीसाठी प्रचाराचा बिगूल बायडेन यांनी ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणातून वाजवल्याचे स्पष्ट आहे.