भारतीय महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने पदके जिंकलेली आहेत आणि कोणत्याही स्वरूपाच्या मर्यादांचे अडथळे सरसकट झुगारून दिलेले आहेत. नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या चार महिलांनी सुवर्णपदके जिंकली, काही जणींनी इतरही पदके जिंकली. ही कामगिरी एका रात्रीत घडलेली नाही. खरे तर या खेळामध्ये नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात पुरुष बॉक्सरांनी बऱ्यापैकी चमक दाखवायला सुरुवात केली होती. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर कुमारने कांस्य पदक जिंकून या खेळातील भारतीय गुणवत्तेची प्रचीती आणून दिली होती. परंतु नंतरच्या काळात हा भर ओसरला. भारताच्या सुदैवाने त्याच दरम्यान एम. सी. मेरी कोमचा उदय झाला होता. शिवाय २०१२पासून महिला बॉक्सिंगचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाला. त्यात मेरी कोमने पदक जिंकले. तिने आतापर्यंत सहा जागतिक सुवर्णपदके पटकावलेली आहेत. पण मेरी कोमसारख्या एकेरी अपवादात्मक कामगिरीनंतर त्या प्रकारची सुवर्णझळाळी निस्तेज होते हे भारतीय क्रीडा परिप्रेक्ष्यात अनेकदा दिसून आले आहे. तसे काही किमान महिला बॉक्सिंगबाबत घडणार नाही, याची सणसणीत प्रचीती तिच्या लखलखत्या वारसदारिणींनी आणून दिली.
लवलीना बोर्गेन हिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. यंदा जागतिक स्पर्धेत तिने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिच्या बरोबरीने निकहत झरीन (५० किलो), नीतू घंघास (४८ किलो) आणि स्वीटी बूरा (८१ किलो) यांनीही सुवर्णपदके जिंकली. तसे पाहायला गेल्यास महिला बॉक्सरांनी यापूर्वी म्हणजे २००६ मध्येही चार सुवर्णपदके जिंकली होती. त्या चौघींमध्ये मेरी कोम होती. मात्र त्या वेळी या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये नव्हता. तो आता असल्यामुळे विद्यमान चार जगज्जेतींकडून, त्यातही निकहत आणि लवलीनाकडून पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा नक्कीच बाळगता येईल. निकहत आणि लवलीना यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दोघींनी निराळय़ा वजनी गटात उतरून ही कामगिरी केली. असे करणे सोपे नसते. तंत्र आणि ताकद अशा दोन्ही आघाडय़ांवर बदल आत्मसात करावे लागतात. शिवाय अशा प्रकारे थेट जागतिक स्पर्धेमध्ये करण्यासाठी तर स्वतंत्र धाडस लागते. त्याबद्दल दोघी विशेष अभिनंदनपात्र ठरतात.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर लवलीनाला गतवर्षी जागतिक स्पर्धेत, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाने हुलकावणी दिली होती. भारतात खरे म्हणजे ऑलिम्पिक पदक ही एखाद्या खेळाडूसाठी आयुष्याची इतिश्री ठरायला काहीच हरकत नाही. पण लवलीनाने ऑलिम्पिक पदकावर समाधान न मानता स्वतंत्र वजनी गटात लढण्यावर लक्ष केंद्रित केले आणि प्रचंड मेहनत घेतली. आपल्याकडे दुहेरी वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकल्याची दोनच उदाहरणे आहेत – कुस्तीपटू सुशीलकुमार आणि बॅडिमटनपटू पी. सिंधू. या छोटय़ा गटात लवकरच लवलीना बोर्गेन हे नाव समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. निकहत झरीन हिच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. ५२ किलोऐवजी ५० किलो गटात यंदा ती उतरली. परंतु त्यामुळे तिला या स्पर्धेत मानांकन नव्हते. त्यापायी सहा फेऱ्यांचे अडथळे पार करावे लागले, जे अतिशय कष्टप्रद असते. त्यातही उपान्त्य फेरीत तिची प्रतिस्पर्धी रियो ऑलिम्पिक पदकविजेती होती आणि तांत्रिकदृष्टय़ा सरस मानली जात होती. तरीही निकहतची जिद्द आणि विजीगीषू वृत्ती त्या लढतीत सरस ठरली. आज निकहत ही देशातील एक वलयांकित खेळाडू असली, तरी प्रस्थापितांविरुद्ध टक्कर देत ती येथवर पोहोचली. या प्रस्थापितांमध्ये साक्षात मेरी कोमही होती. २०१६मध्ये ऑलिम्पिक प्रवेशासाठी तिला मेरी कोमशी टक्कर घ्यावी लागली. त्या वेळी ‘कोण निकहत’ अशा शब्दांत मेरी कोमने तिची हेटाळणी केली होती आणि तिच्या असंख्य चाहत्यांनी निकहतला लक्ष्य केले. स्पष्टवक्तेपणा हा निकहतमधील अंगभूत गुण, त्यामुळे लोकप्रियतेबरोबरच टीकेलाही तिला सामोरे जावे लागते. खेळाडू म्हणून तिचा प्रवास सुरू असला, तरी या तरुण वयातही तेलंगणात अद्ययावत बॉक्सिंग अकादमी काढण्याचे तिचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या वाटचालीत तिच्यासमोर विख्यात बॅडिमटनपटू गोपिचंदचा आदर्श आहे. खेळाडू घडवावे लागतात, पण त्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण सुविधा उभाराव्या लागतात. यासाठी केवळ सरकारवर विसंबून चालत नाही, हे ओळखण्याइतका परिपक्वपणा तिच्या ठायी आहे. टोक्यो ऑलिम्पिकनंतर तिने समाजमाध्यमांवर एक पोस्ट ‘प्रसृत’ केली. त्यात म्हटले होते – ‘पॅरिस ऑलिम्पिकच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. लक्ष्य – सुवर्णपदक’! हा आत्मविश्वास तिच्या जगज्जेतेपदाने दाखवून दिलाच आहे.