ओदिशाचे मुख्यमंत्री, ‘बिजू जनता दल’चे मालक, मुद्रक, प्रकाशक इत्यादी असे नवीन पटनायक यांनी संभाव्य भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या देशात राजकीय घराण्यांच्या मालकीचे काही पक्ष आहेत. त्यापैकी हा ओदिशातला. बिजू पटनायक हे एक दांडगट समाजवादी नेते सत्तर-ऐंशीच्या दशकात सक्रिय होते. त्यांस दांडगट हे विशेषण अशासाठी योग्य की समाजवादाच्या रोमँटिक झापडांखाली त्यावेळी जेआरडी टाटा यांस जमशेदपूरच्या पोलाद कारखान्यातील कामगार प्रश्नांवर दरडावण्यापर्यंत बिजूबाबूंची मजल गेली होती. एका बाजूने कामगार प्रश्न आणि दुसरीकडे इतकी मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात नाही, याचे शल्य हे दोन्ही त्यांच्या वर्तनातून त्यावेळी दिसून आले. पुढे इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन आणि या घुसळणीतून जन्मास आलेला ‘जनता पक्ष’ हा बिजूबाबूंचा सक्रिय कार्यकाल. तेव्हा बिजू पटनायकांनी पोलाद खात्याचे मंत्रीपदही भूषवले. पण तरी ओदिशा ही जन्मभूमी वगळता त्यांस अन्यत्र प्रतिमा निर्माण करता आली नाही. त्यांच्या निधनानंतर परदेशवासी असलेले त्यांचे चिरंजीव नवीन यांच्याकडे या पक्षाची सूत्रे आली. एव्हाना जनता पक्षाची अनेक शकले झालीच, पण समाजवाद्यांच्या ‘जनता दला’चे तुकडे पुढेही होत राहिले त्यांपैकी हा १९९७ च्या अखेरीस झालेला तुकडा. ओदिशातील या जनता दलास बिजू ही उपाधी चिकटवली गेली. ही उपाधी वगळता नवीन यांचे राजकीय भांडवल शून्य होते. ओदिशाच्या भूमीतच ते फारसे राहिलेले नसल्याने, तेथील राजकारणात ते पारंगत नव्हते. नवीनबाबू हे देशातील असे बहुधा एकमेव मुख्यमंत्री असतील की त्यांस स्वत:च्या राज्याची मातृभाषा पुरेशी अवगत नाही. ते आंग्लविद्याविभूषित. बराचसा काळ पाश्चात्त्य देशांतच गेला. तेव्हा वडिलांच्या स्मृती हेच त्यांच्या पक्षाचे भांडवल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा