करोना विषाणूचा उद्भव जेथून झाल्याचे मानले जाते, तो चीन अजूनही या विषाणूच्या विळख्यातून बाहेर येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शून्य संसर्ग किंवा झिरो कोविडसारखे अशास्त्रीय आणि अव्यवहार्य धोरण रेटल्यामुळे तिथे करोना नियंत्रित झाला नाहीच, उलट ठिकठिकाणी जनमताच्या रोषाचे स्फोट होऊ लागले. त्यामुळे बावचळलेल्या क्षी जिनपिंग राजवटीने तितक्याच अशास्त्रीय पद्धतीने कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामुळे विषाणूप्रसार अधिक वेगाने होऊ लागला आहे. या प्रसाराची जी प्रारूपे पाश्चिमात्य अभ्यासगट मांडू लागले आहेत, ती दडपून टाकणारी आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही यावेळचा संसर्ग अधिक व्यापक असेल, असे प्रलयघंटावादी इशारे हे अभ्यासगट देऊ लागले आहेत. करोनाच्या मूळ जनकविषाणूपेक्षा ओमायक्रॉन हा त्याचा अवतार आणि त्याचेही उपप्रकार अतिसंसर्गजन्य आहेत, हे आपण सगळेच जाणतो. चीनच्या बाबतीत ओमायक्रॉन प्रसारासाठी अनुकूल परिस्थिती असण्याची कारणे दोन. ‘झिरो कोविड’मुळे माणसे एकाच भागात महिनोन्महिने डांबली गेली. त्यांना परस्परांबरोबर बराच काळ मिसळू न दिल्यामुळे समूह प्रतिकारशक्ती फारशी निर्माण झालीच नाही. साथ आटोक्यात येण्यासाठी मर्यादित प्रमाणात समूह प्रतिकारशक्ती वस्त्या, शहरे, गावांमध्ये निर्माण होणे आवश्यक असते. दुसरा कळीचा मुद्दा लसीकरणाचा. करोना साथीच्या सुरुवातीला चीनच्या लशी इतर काही देशांमध्येही पाठवल्या जात होत्या. त्या बहुतांश कुचकामी ठरल्याचे तेव्हा दिसून आले होते. चीनमध्ये या लशींच्या आधारे लसीकरण मोठय़ा प्रमाणात झालेले असले, तरी इतर मोठय़ा देशांप्रमाणे चीनने आयात लशींना अजिबात थारा दिलेला नाही. त्यामुळे लशींचे उत्पादन आणि परिणामकारकतेवर मर्यादा आल्या. लसीकरण आणि संसर्ग यांच्या योग्य समतोलानंतरच करोनाला काही प्रमाणात थोपवणे शक्य होते, हे जगभर दिसून आले आहे. ७ डिसेंबर रोजी चीनमध्ये सरकारी पातळीवर निर्बंध मागे घेतल्याचे जाहीर झाले. ओमायक्रॉन संसर्गाची नवी लाट तेथे येणार, हे दिसत असूनही असा निर्णय सरकारने का घेतला असावा, याविषयी चर्चा सुरू आहे. जवळपास तीन वर्षे क्षी जिनपिंग राजवटीने करोना निवारणाला ‘लोकयुद्धा’ची उपमा दिली. सारे काही सरकार करेल, कारण धोका भयंकर स्वरूपाचा आहे, असे सुरुवातीला सांगितले जायचे. अशा प्रकारे दंड थोपटून फार तर एखाद्या दुबळय़ा देशाला वचकाखाली ठेवता येऊ शकते. सरकारी बेटकुळय़ांची विषाणूसमोर काय पत्रास? नवीन शिथिलीकरण धोरणाबाबत सरकारची भूमिका अशी, की ओमायक्रॉनमुळे संभवणारा धोका एखाद्या सामान्य ज्वरापेक्षा (कॉमन फ्लू) अधिक नसतो. चुकीचे संदेशवहन आणि अवेळी संज्ञापन हे चाचपडणाऱ्या सरकारचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. करोनाच्या बाबतीत हा अनुभव चीनमध्ये येतो आहे. टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी लसीकरण, औषधपुरवठा, लशींचा साठा या आघाडीवर तयारी योग्य असावी लागते. कारण शिथिलीकरणानंतर काही प्रमाणात संसर्गवाढ गृहीत धरण्यात आलेली असते. चीनमध्ये लसीकरणाचे लक्षावधींचे आकडे इतर जगाच्या दृष्टीने मोठे असले, तरी अब्जावधींच्या देशात ते तोकडेच ठरतात. जानेवारीमध्ये चिनी नववर्षांच्या निमित्त लाखो चिनी आपापल्या गावी जातील, तेव्हा अजस्र प्रमाणात विषाणू वहन होईल, अशी शक्यता आहे. त्यातून होणाऱ्या संभाव्य प्राणहानीइतकीच, किंबहुना अधिक उद्योगहानी होईल. जगाला चिंता सतावते, ती हीच!

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Story img Loader