उच्चकोटीचा आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा या निकषांवर इस्रायलच्या बेन्यामिन नेतान्याहूंचा हात धरू शकतील, असे फारच थोडे नेते जगात आहेत. गेल्याच वर्षी इस्रायलमध्ये विविधरंगी आणि भिन्न मतमतांतरे असलेल्या नेतान्याहू विरोधकांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवणे या एकाच उद्दिष्टाने आघाडी सरकार स्थापन केले. त्या वेळी इस्रायलचे पंतप्रधानपद सर्वाधिक काळ उपभोगलेले नेतान्याहू यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली, असे सर्वाना वाटत होते.. नेतान्याहू सोडून! परंतु गेली काही वर्षे पॅलेस्टाइन-इस्रायली दरी रुंदावत असलेल्या वातावरणाचा अधिकाधिक फायदा करून घेण्याची क्लृप्ती नेतान्याहू यांनी खुबीने वापरली. त्यामुळे त्यांच्या विरोधातील विसविशीत आघाडीला फारशी संधीच मिळाली नाही. नेतान्याहू यांच्यातील आणखी एक चिरंतन, अविनाशी गुण म्हणजे सत्ताकारणासाठी ‘काहीही’ करायची ऊर्जा आणि इच्छाशक्ती. त्याचबरोबर, भावनिक साद आणि भीडकेंद्री राजकारण कधीही चलनबा होऊ शकत नाही, हे त्यांच्याइतके जगभरातील फारच थोडय़ा नेत्यांनी ओळखले आहे. यामुळेच की काय, गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच त्यांच्या लिकुड पक्षप्रणीत आघाडीने इस्रायली परिप्रेक्ष्यात ‘घसघशीत’ म्हणाव्यात अशा ६४ जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे ६१ या साध्या बहुमताच्या आकडय़ापर्यंत कुंथत पोहोचण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. परंतु प्रश्न नेतान्याहूंना बहुमत मिळणे आणि इस्रायलला अखेरीस स्थिर सरकार लाभणे इतपत मर्यादित नाहीच. तर या स्थैर्यात या टापूतील अस्थिरतेची बीजे घट्ट रुजलेली असणे, हा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा