महाराष्ट्राच्या विविध भागांत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच पातळय़ांवर जो अतिरेकी उत्साह दिसून येत होता, त्याचा कळस दहाव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाला. सरकारी आशीर्वादाने सुरू असलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या सोहळय़ाचे रूपांतर उन्मादी वर्तनात झाले आणि त्यामुळे प्रचंड ढणढणाटात चाललेल्या कंटाळवाण्या आणि वेळखाऊ विसर्जन मिरवणुकीने भाविकांच्या नेत्रांचे पारणे फिटण्याऐवजी मनस्तापात भर पडली. करोनाकाळातील दोन वर्षे हा उत्सव नेहमीच्या जोशात पार पडू शकला नाही. त्याचे जणू उट्टे काढण्याचा चंगच सगळय़ा सार्वजनिक गणेश मंडळांनी बांधला होता. ढोल, लेझीम ही पारंपरिक वाद्ये हे खरे तर या मिरवणुकीचे वैशिष्टय़. मात्र यंदा त्याच्या जोडीला, कानांचे पडदे फाडणाऱ्या ध्वनिक्षेपक यंत्रणेने त्यात भर घातली. गणपती या देवतेशी दूरान्वयानेही संबंध नसलेली गाणी आणि त्यावर चालू असलेले डोळे मिटायला लावणारे नृत्य हीच यंदाची वैशिष्टय़े. मुंबई-पुणे-ठाणे यांसारख्या शहरांमध्ये १०५ डेसिबलच्या आवाजाने आसमंत दणाणून टाकणाऱ्या या मिरवणुकीने, एरवी ‘हिंदू सण’ म्हणून काही न बोलणारेही ध्वनिप्रदूषणाबद्दल बोलू लागले. कलाकुसरीचे रथ, आकर्षक रोषणाई आणि त्याच्या जोडीला उत्साह वाढवणारी वाद्ये, हे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचे कायम वैशिष्टय़ राहिले आहे. अनेक मान्यवर कलाकार नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवक कलाकारांच्या मदतीने अतिशय कष्टपूर्वक मंडळांचे देखावे साकारत असत. त्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही लक्षणीय सहभाग असे. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यापासून ते विसर्जन मिरवणुकीत उत्साह घेण्यापर्यंत या लहान व तरुण मुला-मुलींचा उत्साह या उत्सवात महत्त्वाचा ठरत असे. काळ बदलला. वर्गणीची जागा जाहिरातींनी घेतली आणि देखाव्यासाठी नव्या कल्पनांऐवजी ‘रेडिमेड’ देखावे मिळू लागले. परिणामी गणेश मंडळे ही सामाजिक चळवळ म्हणून मागे पडू लागली. चौकाचौकांतील मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडळाच्या परंपरेचा अभिमान वाटत असे. आता त्याची जागा मंडळाच्या अंतर्गत असलेल्या राजकारणाने घेतली. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांऐवजी सुपारी देऊन बाहेरील व्यावसायिक ढोल पथकांना बोलावण्यात येऊ लागले. ही मिरवणूक पाहायला मिळावी, यासाठी डोळय़ांत प्राण आणून अनेक तास मार्गावर बसून राहणाऱ्या आबालवृद्धांची यंदा मात्र निराशा झाली. मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी छत्तीस तास रस्त्यावर सुरक्षा यंत्रणा राबवणाऱ्या पोलिसांना मात्र या सगळय़ासाठी जबाबदार ठरविण्यात आले. सरकारी आदेशाने पोलिसांना यंदा शांत राहण्याचा सल्ला देण्यात आल्यामुळे हतबल पोलिसांना मिरवणुकीतील हा सगळा उन्माद उघडय़ा डोळय़ांनी पाहण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. याआधी दहीहंडीमध्ये मंडळांनी दाखवलेला उत्साह, गणेशोत्सवातील अतिरेक, यानंतर येणाऱ्या उत्सवांच्या उत्सवी उत्साहाची नांदी ठरली आहे. जे कलावंत अहोरात्र खपून आपली कला अनेकांनी पाहावी आणि तिचे कौतुक करावे, अशी आशा बाळगून होते, त्यांचाही या वेळी हिरमोड झाला. मात्र गणेश मंडळांना त्याबद्दल जराही क्लेश वाटत नव्हते, हे अधिक दु:खद. आयुष्यातील सगळा आनंद रस्त्यावर येऊनच उन्मादी वातावरणात साजरा करण्याच्या या नव्या संस्कृतीचा भक्ती, परंपरा आणि कलात्मकता यांच्याशी संबंध नाहीच. मग हा उन्माद कशासाठी आणि कोणासाठी?
अन्वयार्थ : हा उन्माद कोणासाठी?
महाराष्ट्राच्या विविध भागांत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच पातळय़ांवर जो अतिरेकी उत्साह दिसून येत होता, त्याचा कळस दहाव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-09-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha frenzy maharashtra ganesh festival way enthusiasm immersion procession ysh