जागतिक आरोग्य संघटनेने भारतात खोकल्यावर तयार करण्यात आलेल्या द्रव औषधांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून त्याचा परिणाम भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांवरही होऊ शकतो. पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया या देशातील ६६ मुलांच्या मृत्यूस भारतीय बनावटीची खोकल्यावरील औषधे कारणीभूत असल्याची ‘शक्यता’ जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असून अशा चार औषधांमध्ये असलेल्या विशिष्ट औषधी द्रवामुळे असे घडले काय, याविषयी तपासणीचा सल्ला दिला आहे. भारतात खोकल्यावरील अशा औषधांचा सर्रास वापर होत असतो. मात्र त्यांची परिणामकारकता आणि त्याचे परिणाम याबाबत पुरेशा प्रमाणात तपासणी होते किंवा नाही, याबाबत अशा घटनेमुळे शंका निर्माण होते. या एकाच प्रकारच्या चार औषधांबद्दल मागील वर्षीच्या जुलै महिन्यात प्रथम शंका निर्माण होऊ लागली. त्यांच्या सेवनामुळे पाच वर्षांच्या मुलांमध्ये किडनीशी संबंधित अडचणी निर्माण होऊ लागल्या. ताप, उलटय़ा आणि लघवी होण्यास त्रास अशा तक्रारी येऊ लागल्या. हे द्रव औषध घेतल्याने मृत्यू पावणाऱ्या मुलांची टक्केवारी ९० एवढी असल्याचे लक्षात येऊ लागले. गाम्बियातील प्रयोगशाळेत ही औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली, तेव्हा त्यामध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथेलीन ग्लायकॉल या द्रव्यांचे अतिरिक्त प्रमाण असल्याचे लक्षात आले. हे दोन्ही द्रव मानवी शरीरास घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या औषधांच्या परिणामकारकतेबद्दल वा त्याच्या विश्वासार्हतेबद्दल भारतीय कंपन्यांनी अद्याप पुरेसा स्पष्ट खुलासा केलेला नाही. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या एफडीए (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) या संस्थेकडून मान्यता मिळालेल्या औषधांना विश्वासार्ह मानले जाते. अनेकदा भारतीय औषध कंपन्या ही मान्यता मिळवण्यासाठीच्या अटींची पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे ती परस्पर तिसऱ्या जगातील देशांमध्ये पाठवली जातात. तेथे अशा औषधांची मागणी मोठी, शिवाय अमेरिकी एफडीएची मान्यता टाळून हा व्यवसाय करता येतो. असे करताना त्याच्या औषधीय विश्वासार्हतेबाबत फारशी काळजी घेतली जात नसावी. हे असे केवळ गाम्बिया या देशातच घडले आहे, असे नव्हे; भारतात दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अशाच प्रकारची औषधे घेतल्यामुळे १७ मुलांचा मृत्यू झाला होता. हिमाचल प्रदेशातही अशाच प्रकारे १४ मुलांना जीव गमवावा लागला होता. या औषधांच्या दर्जाबाबत केलेल्या चाचण्या १९ वेळा अयशस्वी ठरल्या होत्या. तरीही ती बाजारात सहजपणे उपलब्ध होत आहेत. या पद्धतीने भारतीय औषधांबद्दल होणाऱ्या गैरसमजांना खतपाणी मिळते आणि जगात समांतरपणे सुरू असलेल्या बनावट औषधांचे उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव अग्रक्रमावर येते. भारतात औषधांना मान्यता देणाऱ्या आयसीएमआरसारख्या संस्थांनी त्याबाबत अधिक जागरूक राहून अशा औषधांवर कडक बंदी घालण्याची आवश्यकता आहे. करोनाकाळात अनेक कंपन्यांनी आपापली औषधे बाजारात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी याच संस्थेने काटेकोरपणे तपासणी केल्यानंतर त्याला परवानगी दिली होती. अशाच रीतीने भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक औषधाबाबत जागरूकता दाखवणे महत्त्वाचे व आवश्यक आहे. एफडीएची मान्यता टाळून अशी औषधे बाजारात उपलब्ध होण्याने अनेक निष्पापांना जीव गमवावा लागत असेल, तर त्याकडे अधिक गांभीर्यानेच पाहायला हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा