‘मुखपट्टीचा वापर पुन्हा सुरू करा’ ही भारतीय वैद्यक संघटनेने (इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमए) आठवडय़ाभरापूर्वी केलेली सूचना देशात कुणी गांभीर्याने घेतलेली नसल्याचे आपण साऱ्यांनीच आपापल्या परिसरात पाहिले आहे. या सूचनेचे आणि त्यामागच्या काळजीचे कारण ठरलेला ‘एच-थ्री एन-टू’ हा फ्लूचा म्हणजे एन्फ्लुएन्झाचा विषाणू देशभरात वेगाने पसरला आणि हरयाणा तसेच कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू याच विषाणूच्या तापामुळे झाल्याचेही शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या सूचनेचे गांभीर्य तर वाढतेच, पण यापुढली पावले उचलण्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत का, हा प्रश्नही अधिक तीव्र होतो. आशादायक बाब म्हणजे, ‘एच-थ्री एन-टू’ने दोन बळी घेतल्याच्या बातमीपाठोपाठ केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने या विषाणूच्या प्रसारावर अहोरात्र लक्ष ठेवण्यासाठी एक पथक स्थापन केल्याचेही जाहीर झाले. याआधी या विषाणूच्या प्रसाराची माहितीच नव्हती असे नाही. आकडे मिळत होते, ते वाढत असल्याचेही दिसत होते. बहुतेक जण काही काळाने या आजारातून बरे होत असल्यामुळे ‘घबराटीचे कारण नाही’ असा दिलासाही काही तज्ज्ञ देत होते. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ापासून अनेक शहरांमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ होऊ लागली, रात्र आणि दिवसाच्या तापमानातील फरक वाढू लागला, या शहरांतील प्रदूषण बेबंदच असल्यामुळे लवकर बरा न होणारा खोकला, त्यासह येणारा ताप अशा तक्रारी वाढू लागल्या. ‘एच-थ्री एन-टू’चा पहिला इशारा वैद्यक संघटनेने दिला, तो या पार्श्वभूमीवर. मात्र तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी, ‘कोविड-१९’मुळे ज्या रुग्णांवर दीर्घकाळ त्रास देणारे परिणाम झाले, त्या रुग्णांतच या नव्या तक्रारी वाढल्या आहेत का, अशीही शंका व्यक्त केली. वैद्यकशास्त्रात अशी शंका रास्तच, पण तिचा म्हणावा तसा पाठपुरावा व्यवस्थात्मक पातळीवरून झाला नसल्याने रुग्णांची घालमेल वाढली आणि घबराटही चोरपावलांनी दबा धरून बसली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा