खाशाबा जाधवांच्या महाराष्ट्रात आणखी ऑलिम्पिक कुस्तीपटू का निर्माण झाले नाहीत, असा प्रश्न गेल्या शनिवारीच पुण्यात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विचारला होता. महाराष्ट्रातील कुस्ती धुरिणांना निरुत्तर केल्याचा क्षुल्लक आनंद त्या वेळी या महाशयांना मिळाला असेल. त्यांना असे विचारण्याचा अधिकार खरोखरच आहे का, याविषयी तेव्हाही येथील कुस्ती वर्तुळातून दबक्या आवाजात चर्चा झाली. आता अवघ्या आठवडाभरात त्यांच्या प्रतापांविषयी कुस्तीपटूंनीच जाहीर आवाज उठवल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांना तात्पुरते पायउतार व्हावे लागले. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी याविषयी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्तीपटूंनी बैठा सत्याग्रह सुरू केला, त्या वेळी ब्रिजभूषण यांच्या पठ्ठय़ांनी ‘पीडितां’ची नावे जाहीर करा, अशी उद्दाम आणि तितकीच निर्बुद्ध मागणी केली होती. हे आंदोलक साधेसुधे नव्हते. ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया, रविकुमार दाहिया आणि साक्षी मलिक; तसेच जागतिक पदकविजेते दीपक पुनिया, विनेश फोगाट असे नामांकित कुस्तीपटू होते. येथे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी बहुतेक जण भाजपचेच समर्थक आहेत. यांतील बहुतेक जणांचे भाजपप्रेम समाजमाध्यमांवर वेळोवेळी व्यक्त होत असते. तेव्हा त्यांना ‘जंतरमंतरवरील आंदोलनजीवी’ ठरवण्याचा जो उद्योग सुरू झाला आहे, त्याला अजिबात आधार नाही. किंबहुना, नेमक्या आणि गंभीर प्रश्नांवर उत्तरे देता येत नाहीत, त्या वेळी व्यापक कटाचा सिद्धान्त मांडून वेळ मारून नेण्याचाच हा आणखी एक प्रयत्न दिसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा